Monday, December 23, 2024
Home Blog Page 3

दीक्षाभूमीवर आल्याने प्रेरणा व नवी ऊर्जा मिळते – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नागपूर, दि. 21 : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतींना वंदन करुन प्रेरणा व नवी ऊर्जा मिळते. दीक्षाभूमीला आल्यानंतर नेहमीच वेगळी अनुभूती व समाधानही मिळते, अशा भावना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे व्यक्त केल्या.

उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांचे दीक्षाभूमी स्मारक समितीच्या वतीने स्वागत करण्यात आले. यानंतर श्री.शिंदे यांनी बुद्ध प्रतिमा व बाबासाहेबांच्या अस्थिचे दर्शन घेवून अभिवादन केले. मंत्री सर्वश्री दादाजी भुसे, शंभुराज देसाई, उदय सामंत, प्रताप सरनाईक, योगेश कदम, माजी खासदार जोगेंद्र कवाडे, दीक्षाभूमी स्मारक समितीचे राजेंद्र गवई आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, दीक्षाभूमी ही तप आणि आदर्शाची भूमी आहे. बाबासाहेबांच्या विचारांनी प्रेरित होवून देश-विदेशातील अनुयायी येथे येतात व प्रेरणा घेतात. बाबासाहेबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच देशाचा व राज्याचा कारभार चालत आहे. बाबासाहेबांचे विचार सर्वसामान्यांना न्याय देणारे व जनसेवेला बळ देणारे आहेत. राज्यशासनाच्या वतीने तालुकानिहाय संविधानभवन बांधण्यात येत आहेत. तसेच चैत्यभूमीवर जागतिक दर्जाचे स्मारक बांधण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

0000

बालविवाह होऊच नयेत, यासाठी मुला-मुलींच्या समुपदेशनावर भर द्या – राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर

  • सर्व खासगी आस्थापनांनी युध्दपातळीवर अंतर्गत तक्रार समित्या स्थापन कराव्यात
  • अवैधरित्या होणारे गर्भपात रोखण्यासाठी सोनोग्राफी सेंटरच्या तपासण्या करा

कोल्हापूर, दि. 20 (जिमाका): बालविवाहामुळे मुलींच्या शिक्षण व आरोग्यावर परिणाम होतो. यासाठी बालविवाह होऊच नयेत, म्हणून शाळा, महाविद्यायांमध्ये मुलामुलींच्या समुपदेशनावर भर द्या, असे निर्देश देऊन अवैधरित्या होणारे गर्भपात रोखण्यासाठी सोनोग्राफी सेंटरच्या नियमित तपासण्या करा, अशा सूचना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर केल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन सभागृहामध्ये श्रीमती चाकणकर यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली, यावेळी त्या बोलत होत्या. बैठकीला प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, इचलकरंजी महानगरपालिकेचे आयुक्त ओमप्रकाश दिवटे, कोल्हापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुहास वाईंगडे, जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्या जिल्हा कार्यक्रम अधिकारी शिल्पा पाटील, आयोगाचे जिल्हा समन्वयक आनंद शिंदे तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी “महिला आयोग आपल्या दारी” उपक्रमांतर्गत झालेल्या सुनावणीत राज्यात सर्वाधिक 26 केसेस सामोपचाराने मिटल्याबद्दल आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग, महिला व बाल विकास विभाग, विधी व प्राधिकरण तसेच जिल्हा परिषदेचे कौतुक केले.

श्रीमती चाकणकर म्हणाल्या, शासकीय व निमशासकीय आस्थापनांमध्ये अंतर्गत तक्रार समित्या स्थापन झाल्या आहेत. तथापि खासगी आस्थापनांत महिलांना कामाच्या ठिकाणी त्रास होवू नये, यासाठी अंतर्गत किंवा स्थानिक तक्रार समित्या स्थापन झालेल्या नाहीत, अशा आस्थापनांनी युध्दपातळीवर  अशा समित्या स्थापन कराव्यात. तसेच या समित्या स्थापन झाल्याची खात्री करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने धाडसत्र अवलंबावे व अशा आस्थापनांवर दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

त्या म्हणाल्या, कौटुंबिक हिंसाचार, अंतर्गत कलह तसेच अन्य बाबींमुळे कुटुंब व्यवस्थेचे विघटन होत आहे. कुटुंब व्यवस्था राखण्यासाठी पोलीस विभागाने भरोसा सेलच्या माध्यमातून समुपदेशनावर भर द्यावा. समाजात बलात्कारासारख्या घटनांचे प्रमाण वाढत असून त्या रोखण्यासाठी समाजाची मानसिकता बदलण्यासाठी प्रयत्न करा. मिशन वात्सल्य योजनेतून लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून द्या. जिल्ह्यात बालविवाह रोखण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक असून बालविवाह रोखण्यासाठी शिक्षण, आरोग्य, पोलीस विभागाने मुलामुलींच्या समुपदेशनावर भर द्यावा. तसेच प्रिंटींग प्रेस, मंदिरे, समाज मंदिरांमध्ये प्रभावी उपाययोजना राबवा. ऊसतोड महिला कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करा. अवैधरित्या होणारे गर्भपात रोखण्यासाठी जिल्ह्यातील सोनोग्राफी सेंटरची नियमीत तपासणी करा, यासाठी आरोग्य विभागाने वेळोवेळी धाडसत्राची मोहिम राबवावी. ॲसिड हल्ल्यातील महिलांना मनोधैर्य योजनेतून लाभ द्या, असे सांगून त्या म्हणाल्या, सीमा भागात मोठ्या प्रमाणात मिसिंग केसेस आढळत आहेत. अशा घटना रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवा. सोशल मीडियाव्दारे मुलींची व महिलांची फसवणूक होऊ नये म्हणून समुपदेशन केंद्राच्या माध्यमातून शाळा, कॉलेज मधील मुलींचे त्याचबरोबर कौटुंबिक हिंसाचार होणाऱ्या महिला, मुलींच्या समुपेदशनावर भर द्या. निर्भया पथकाच्या माध्यमातून शाळा, कॉलेजच्या मुलींना संरक्षण द्या, बसस्थानकांवरील महिलांच्या स्वच्छतागृहाबाहेर महिला कामगारच असल्याची खात्री करा,  तसेच सर्व  शाळांमध्ये असणाऱ्या स्वच्छता गृहांमध्ये पुरेशा पाण्याची सोय करा. तसेच सखी वन स्टॉप सेंटरसाठी तात्काळ ॲम्बुंलन्स उपलब्ध करुन देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.

यावेळी सर्व संबंधित विभाग प्रमुखांनी आपापल्या विभागांशी संबंधित माहिती दिली.

0000

दीक्षाभूमी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकास मंत्री जयकुमार रावल यांनी भेट देऊन केले अभिवादन

नागपूर,दि. 20 : राज्याचे कॅबीनेट मंत्री जयकुमार रावल यांनी आज दीक्षाभूमी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास भेट देऊन अभिवादन केले. यावेळी डॉ. राजेंद्र गवई, विलास गजघाटे, नारायण पाटील, बबन चौधरी, डी. एस. गिरासे, बंटी नगराळे आदी उपस्थित होते. श्री. रावल यांनी भगवान गौतम बुद्ध यांच्या मुर्तीला अभिवादन केले.

00000

देवकिसन सारडा यांच्या निधनाने सेवाव्रती उद्योगपती गमावला

नागपूर, दि.20 :  दैनिक ‘देशदूत’चे संस्थापक आणि प्रख्यात उद्योजक देवकिसन सारडा यांच्या निधनाने सेवाव्रती उद्योगपती आपण गमावला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस आपल्या शोकसंदेशात म्हणतात,  श्री. सारडा यांचे  नाशिक शहर, जिल्हा आणि महाराष्ट्राच्या औद्योगिक, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रांतील योगदान मोठे आहे. विविध संस्थांची निर्मिती करताना त्यांनी मूल्य जोपासण्यावर भर दिला. त्यांनी ‘देशदूत’, ‘सार्वमत’ वृत्तपत्रांची स्थापना करून लोकभावनेला आणि लोकप्रश्नांना व्यासपीठ मिळवून दिले. त्यांनी १९५९ मध्ये श्री सिन्नर व्यापारी बँकेची स्थापना करून सहकार क्षेत्रात पदार्पण केले. नाशिक, अहमदनगर, सोलापूर व बुलढाणा जिल्ह्यांतील नागरी सहकारी बँका सुरू होण्यास त्यांचा हातभार लागला आहे.  सहकार चळवळ वाढविण्यात आणि रूजविण्यात त्यांनी दिलेले योगदान कायम स्मरणात राहील. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.

००००

ताम्हिणी घाट बस दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबाला पाच लाखांची मदत

नागपूर, दि. 20 :- ताम्हिणी घाटातील बस दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी विधानसभेत सांगितले.

पुणे येथून महाडकडे जाणाऱ्या बसला ताम्हिणी घाटात अपघात झाला. ही दुर्घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

०००

नगरविकास, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या २०२४-२५ वर्षाच्या पुरवणी मागण्या विधानसभेत मंजूर

मुंबई, दि. २० :- नगरविकास व सार्वजनिक आरोग्य विभागाच्या २०२४-२०२५ या वर्षासाठीच्या ३ हजार ४६२ कोटी १७ लाख रुपयांच्या पुरवणी मागण्यांना विधानसभेत मंजुरी देण्यात आली. त्यामध्ये नगर विकास विभागाच्या २ हजार ७७४ कोटी ४३ लाख आणि सार्वजनिक आरोग्य विभागाच्या ६८७ कोटी ७४ लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आल्या.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तर देतांना सांगितले की, पुरवणी मागण्यांवरील चर्चेत ३४ सदस्यांनी सहभाग घेतला. या सदस्यांनी मांडलेल्या प्रश्नांना संबंधित मंत्र्यांच्या माध्यमातून लेखी उत्तरे दिली जातील, असेही उपमुख्यमंत्र्यांनी सभागृहात सांगितले.

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, पुरवणी मागणीवरील चर्चेत काही सदस्यांनी महानगरपालिका नगरपालिकांच्या अखत्यारीत असलेले प्रश्न उपस्थित केले. हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी संबंधित यंत्रणेला सूचना देण्यात येतील. तसेच नागरिकांच्या दृष्टिकोनातून सदस्यांनी उपस्थित केलेले सर्व प्रश्न सोडविले जातील.

या खेरीज सामान्य प्रशासन, गृह, महसूल व वन, शालेय शिक्षण व क्रीडा, वित्त, जलसंपदा, विधी व न्याय, ग्राम विकास, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, नियोजन, गृहनिर्माण, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य, आदिवासी, सहकार पणन व वस्त्रोद्योग, उच्च व तंत्रशिक्षण, महिला व बालकल्याण विकास, पाणी पुरवठा व स्वच्छता, कौशल्य, रोजगार,उद्योजकता व नाविन्यता, महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालय, पर्यटन व सांस्कृतिक कार्य, इतर मागास बहुजन कल्याण, मृद व जलसंधारण आणि दिव्यांग कल्याण विभागाच्या पुरवणी मागण्याही विधानसभेत मंजूर करण्यात आल्या.

००००

मुंबईतील मनोरा आमदार निवास इमारतीच्या कामाला गती देऊन जानेवारी २०२७ पर्यंत बांधकाम पूर्ण करण्याचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे निर्देश

नागपूर, दि. २० : विधिमंडळ अधिवेशनासह मंत्रालयातील विविध कामांसाठी मुंबईत येणाऱ्या आमदारांसाठी निवासाची व्यवस्था होण्याकरिता उभारण्यात येत असलेल्या मनोरा आमदार निवास इमारतीच्या बांधकामाला गती देऊन ते जानेवारी 2027 पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी उच्चाधिकार समितीच्या बैठकीत दिले.

मुंबई येथील मनोरा आमदार निवास प्रस्तावित पुनर्विकास प्रकल्पाचा आढावा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार मनोरा आमदार निवासाच्या बांधकाम आराखड्यात बदल करण्यात येत आहे. त्यामुळे हरित पट्टा, वाहनतळ, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प यासारख्या सुविधांचे ठिकाण आणि क्षेत्र यामध्ये बदल झाला आहे. या पार्श्वभूमीवर कामाच्या स्वरुपात झालेला बदल आणि त्याच्या वाढीव खर्चास मान्यता देण्यात आली. मनोरा इमारतीच्या बांधकामाचा वेग वाढवून ठरलेल्या वेळेच्या आता सर्व कामे दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्यात यावीत, असे निर्देशही अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले.

या बैठकीस विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्य सचिव सुजाता सौनिक, विधानमंडळ सचिव जितेंद्र भोळे, महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेशकुमार, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ओ.पी. गुप्ता, मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे,  सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव संजय दशपुते, लार्सन अँड टुब्रो कंपनीचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी लार्सन अँड टुब्रो कंपनीतर्फे सादरीकरण करण्यात आले.

००००

संतोष तोडकर/विसंअ/

मधुमक्षिका पालकांना मधुक्रांती पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

मुंबई, दि.20 : कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाद्वारे राष्ट्रीय मधुमक्षिका मंडळ, नवी दिल्ली अंतर्गत विकसित केलेल्या https://madhukranti.in/nbb या मधुक्रांती पोर्टलला या वेबसाईटवर मधुमक्षिका पालकांनी नोंदणी करण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळाचे संचालक किसन मुळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. मध आणि मधमाशी संबंधित अन्य उत्पादनांच्या योग्य स्त्रोताचा शोध घेण्याच्या दृष्टीने व अद्यायावत नोंदी ठेवण्यासाठी मधुक्रांती पोर्टल विकसित करण्यात आलेले आहे.

राज्यात राष्ट्रीय मधुमक्षिकापालन व मध अभियान ही केंद्र पुरस्कृत योजना राबविण्यात येत आहे. त्यानुषंगाने पुणे येथील महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळास यांना राष्ट्रीय मधुमक्षिका पालन व मध अभियान राबविणारी राज्यस्तरीय अंमलबजावणी यंत्रणा म्हणून केंद्र शासनाने मान्यता दिली आहे. सदर अभियानांतर्गत  लघु अभियान 1,2 आणि 3 समाविष्ट असून यामध्ये विविध उपक्रम राबविले जाणार आहेत.

मधुक्रांती पोर्टलमुळे मधुमक्षिका पालकांना मिळणार लाभ

मधुक्रांती पोर्टलवर नोंदणी केल्यास विविध लाभ मिळणार आहेत. यात मधुमक्षिकापालकाला नोंदणीकृत/मान्यताप्राप्त मधुमक्षिकापालक म्हणून ओळख मिळणार आहे. नोंदणी धारकांना 1 लाखापर्यंत मोफत विमा उपलब्ध होणार आहे. तसेच विना अडथळा मधुमक्षिका पेटयांचे स्थलांतर करता येणार आहे.

मधुक्रांती पोर्टलवर नोंदणीसाठी आधार कार्ड, अद्ययावत भ्रमणध्वनी क्रमांक (आधार क्रमांकाशी जोडलेला), मधुमक्षिका पालनासंबंधित तपशील, मधुमक्षिकापालन प्रशिक्षण प्रमाणपत्राची सॉफ्ट प्रत (आकार-200 kb पर्यंत), मधुमक्षिकापालकाचा मधुमक्षिका पेट्यांसमवेत फोटो (आकार-100 kbपर्यंत) ही कागदपत्रे आवश्यक असणार आहेत.

या नोंदणीसाठी फक्त ऑनलाईन पद्धतीने भरता येणार आहे. स्वमालकीच्या मधुमक्षिका पेट्यांमधील मधुमक्षिका वसाहतींची संख्या 10 ते 100 फ्रेमसाठी 250 नोंदणी शुल्क, 101 ते 250 फ्रेम साठी 500 रुपये, 251 ते 500 फ्रेम साठी एक हजार, 501 ते 1 हजार फ्रेम साठी दोन हजार, 1001 ते दोन हजार फ्रेम साठी दहा हजार, 2001 ते 5 हजार फ्रेम साठी 25 हजार, 5001 ते दहा हजार फ्रेम साठी एक लाख तर दहा हजारापेक्षा अधिक फ्रेम साठी दोन लाख नोंदणी शुल्क भरणे आवश्यक आहे.

नोंदणीबाबत अधिक माहितीसाठी राष्ट्रीय मधमाशी मंडळ, नवी दिल्ली 011-23325265, 23719025, मधुक्रांती पोर्टल- Tech Support-18001025026, महाराष्ट्र राज्य फलोत्पादन व औषधी वनस्पती मंडळ, पुणे- (020)29703228 यावर संपर्क करावा. जास्तीत जास्त मधुमक्षिका पालकांनी मधुक्रांती पोर्टलवर नोंदणी करावी, असे आवाहन या पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.

0000

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत संधी

मुंबई, दि. 20 : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना कम्बाईंड डिफेन्स सर्विसेस (CDS) या परीक्षेच्या पूर्व तयारीसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण दिले जाते. नाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्रातील युवक व युवतीसाठी २० जानेवारी २०२५ ते ४ एप्रिल २०२५ या कालावधीत सी.डी.एस.(CDS) प्रशिक्षणाचे क्र. ६४ आयोजन करण्यात येणार आहे. या प्रशिक्षणात निशुल्क प्रशिक्षणासह, निवास व भोजन उपलब्ध असेल अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

मुंबई शहर जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी सैन्यदलातील अधिकारी पदाच्या संधीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, मुंबई शहर येथे ६ जानेवारी २०२५ रोजी मुलाखतीस सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत हजर  रहावे. Department of Sainik Welfare, Pune (DSW) यांच्या वेबसाईटवरील सी.डी.एस.-६४ कोर्ससाठी (किंवा संबंधीत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने प्रिंट दिलेल्या) प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट संपूर्ण माहितीसह आणावी.

सी.डी.एस. वर्गामध्ये प्रवेश मिळण्यासाठी खालील नमूद पात्रता असणे आवश्यक आहे व त्यासंबधीचे पात्रता प्रमाणपत्र प्रशिक्षण वर्गाला येतांना सोबत घेऊन यावे.

उमेदवार हा कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा. उमेदवार केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) नवी दिल्ली यांचे मार्फत घेण्यात येणाऱ्या सी. डी. एस. (CDS) या परीक्षेकरिता ऑनलाईन द्वारे अर्ज केलेला असावा.

अधिक माहीतीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व  प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांचा ईमेल आय डी training.pctcnashik@gmail.com व दूरध्वनी क्र.  ०२५३-२४५१०३२ किंवा व्हॉट्सअॅप क्र. 9156073306 (प्रवेश मिळविण्यासाठी) असून कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष किंवा दूरध्वनीवर संपर्क करावा असे आवाहन, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मुंबई शहर यांनी केले आहे.

000

विधानपरिषदेत सन २०२४-२५ च्या पुरवणी मागण्या मंजूर

मुंबई, दि. 20 : विविध विभागाच्या 2024-25 या वर्षासाठीच्या पुरवणी मागण्यांना विधानपरिषदेत मंजुरी देण्यात आली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तर देतांना सांगितले की, संबंधित विभागांच्या पुरवणी मागण्यांवरील चर्चेत सभागृहातील सदस्यांनी सहभाग घेतला. या सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना संबंधित मंत्र्यांच्या माध्यमातून लेखी उत्तरे दिली जातील. सदस्यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांची शहानिशा करुन त्यासंदर्भात आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, असेही उपमुख्यमंत्र्यांनी सभागृहात सांगितले.

००००

राजू धोत्रे/विसंअ/

ताज्या बातम्या

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या जनसंपर्क विभागाला सर्वोत्कृष्ट सोशल मीडिया अँड पीआर विशेष पुरस्कार

0
रायपूर, दि. 22 : पब्लिक रिलेशन्स सोसायटी ऑफ इंडियाच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरील पारितोषिकांचे वितरण लोकसभेचे माजी सदस्य डॉ. नंदकुमार साय व छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री विजय...

विद्यार्थ्यांनी एकाग्रतेने अध्ययनाचे काम करावे – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

0
मुंबई दि.22- मुंबईतील दादर येथील शारदाश्रम विद्यामंदिरचा ७५ वा वर्धापन दिन सोहळा राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत आज झाला. विद्यार्थ्यांनी आयुष्यात यशस्वी...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अहिल्यानगर येथे स्वागत

0
अहिल्यानगर : दि.२२- राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशनचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या हेलिपॅड येथे आगमन झाले. त्यांच्या समवेत विधानपरिषद सभापती...

धोबीघाट परिसरात परीट समाजासाठी सुसज्ज सभागृह उभारणीकरीता आराखडा तयार करा – उपमुख्यमंत्री अजित पवार

0
बारामती, दि. २२: परीट समाजातील नागरिकांसाठी अधिकाधिक सुविधा मिळण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना विश्वासात घेत धोबीघाट परिसरात सुसज्ज सभागृह उभारणीच्या अनुषंगाने आराखडा तयार करा, असे निर्देश...

राज्य मंत्रिमंडळ खातेवाटपाची अधिसूचना जाहीर

0
मुंबई, दि.२२ : - राज्य  मंत्रिमंडळाचे खातेवाटप २१ डिसेंबर रोजी जाहीर करण्यात आले आहे. याबाबतची अधिसूचना राज्य शासनाने प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र...