शनिवार, ऑगस्ट 23, 2025
Home Blog Page 1649

पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत यांच्या हस्ते वैद्यकीय उपकरण व मोबाईल क्लिनिकचे लोकार्पण

उस्मानाबाद,दि.19(जिमाका): आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत यांंनी आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त जिल्हा सामान्य रुग्णालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे भेट देऊन सी.एस.आर अंतर्गत प्राप्त वैद्यकीय साहित्य,उपरकणे या बरोबर मधु मेह उच्च रक्तदाब,फिट्स,मेनोपॉझ (रजो निवृत्ती) संदर्भातील क्लिनिकचे उदघाटन केले.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे, जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.राजाभाऊ गलांडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन बोडके,शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.उज्वला सरोदे-गवळी आदी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री यांनी मोबाईल मेडिकल क्लिनिकच्या व्हॅनला हिरवी झेंडी दाखवत त्याचे लोकार्पण केले.तत्पूर्वी डॉ.सावंत यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सोयी सुविधांची सखोल पाहणी केली, यावेळी येथील डॉक्टर्स परिचारिका व इतर कर्मचाऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या कामकाजाबाबत माहिती विचारली तसेच त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि उपस्थित अधिकाऱ्यांना या अनुषंगाने आवश्यक त्या सूचना केल्या.

सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सव पर्यावरण रक्षणाची चळवळ होईल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 कोल्हापूर, दि. 19 (जिमाका) : सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सवाची न भूतो न भविष्यती अशी संकल्पना कणेरीमठाचे श्री काडसिध्देश्वर स्वामीजी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. येणाऱ्या 7 दिवसामध्ये लाखो लोक या लोकत्सवात भेट देतील आणि हा लोकोत्सव पर्यावरण रक्षणाची चळवळ होईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सवाअंतर्गत पंचगंगा नदीची महाआरती मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर, राज्य नियोजन मंडळाचे राजेश क्षीरसागर, कणेरीमठाचे श्री काडसिध्देश्वर स्वामीजी, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महापालिका आयुक्त डॉ.कादंबरी बलकवडे, मठाचे विश्वस्त उदय सावंत, संतोष पाटील, माणिक पाटील-चुयेकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

नदीला माता मानण्याची भारतीय संस्कृतीची पुरातन परंपरा आहे. नदीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा सोहळा म्हणून नदीची आरती करण्याची पध्दत संपूर्ण भारतात पाळली जाते. गंगा नदीच्या आरतीप्रमाणेच या ठिकाणी पंचगंगा नदी आरतीचे आयोजन केल्याबद्दल मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी काडसिध्देश्वर स्वामीजींना धन्यवाद दिले.

या कार्यक्रमाद्वारे पाणी, ध्वनी प्रदुषण टाळूया, पाण्याच्या, उर्जेचा अतिरिक्त वापर टाळूया, गरजेपुरतेच वाहने वापरूया, माती आणि वृक्ष याचे संवर्धन करूया असा संदेश देण्यात आला.

छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव संपूर्ण महाराष्ट्रभर मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. ज्या आग्रा येथील लाल किल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला सडेतोड उत्तर दिले तिथे महाराजांची जयंती साजरी होणे संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे.

यावेळी पंचगंगा नदीच्या आरतीने सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सवाची अनौपचारिक सुरूवात झाली असून येत्या 7 दिवसात 30 ते 40 लाख लोक यासाठी उपस्थित राहतील, असा विश्वास श्री काडसिध्देश्वर स्वामीजी यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी या लोकोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले.

000

चंद्रपूर नगरीतून महाराष्ट्राच्या राज्यगीताचा शुभारंभ

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाचे ३५० वे वर्ष साजरे करणार

चंद्रपूर, दि. 19: सांस्कृतिक कार्य विभागाच्या पुढाकाराने कविवर्य राजा बढे लिखीत ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या गिताला राज्यगीताचा दर्जा देण्यात आला व त्याची अंमलबजावणी शिवजयंतीपासून करण्याचा निर्णय मंत्रीमंडळाने घेतला. त्यानुसार हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून या राज्यगीताचा शुभारंभ चंद्रपूर नगरीतून होत असल्याचा आपल्याला मनस्वी आनंद होत आहे, असे सांस्कृतिक कार्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

सांस्कृतिक कार्य विभागाच्या पुढाकाराने महाराष्ट्राच्या राज्यगीताचा अधिकृत शुभारंभ झाला, असे घोषित करून मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, सामान्य प्रशासन विभागाच्या 1 फेब्रुवारी 2023 च्या शासन निर्णयान्वये, महाराष्ट्राच्या राज्यगीताची घोषणा करण्यात आली आहे. शिवजयंती हा केवळ एक उत्सव नव्हे तर छत्रपतींच्या 350 व्या राज्याभिषेकाच्या पर्वावर रयतेचे राज्य आणण्यासाठी संकल्प करण्याचा हा दिवस आहे. या राज्यगीताचा प्रत्येक शब्द पराक्रम गाजवतो, गीतामधून विरतेचा मंत्र दिसतो. जगातील सर्वात जास्त वाघ असलेल्या भुमीतून या राज्यगीताचा शुभारंभ होत आहे, याचा आपल्याला मनस्वी आनंद आहे.


‘जय भवानी…जय शिवाजी’ हे केवळ शब्द नाही तर उर्जा, उत्साह देणारे शब्द आहेत. शिवाजी महाराजांचे नाव घेतले तरी रक्तामध्ये चैतन्य निर्माण होते, वीरता जाणवते. शिवाजी महाराज या नावामध्ये एक वेगळीच शक्ती आहे. शिवाजी महाराज हे सर्वधर्माचा सन्मान करणारे राजे होते.

‘चांदा पासून बांदा’ पर्यंत आणि ‘भामरागड पासून रायगडपर्यंत’ छत्रपतींच्या राज्याभिषेकाचे 350 वे वर्ष संपूर्ण राज्यभर अतिशय उत्साहात साजरे करण्याचा आपला संकल्प आहे. एवढेच नाही तर आपल्यासाठी प्राणप्रिय व कोहीनुर हिऱ्यापेक्षाही जास्त महत्वाची असलेली शिवाजी महाराजांची ‘जगदंबा’ तलवार आणि वाघनखे इंग्लंडवरून भारतात परत आणण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. त्यासाठी इंग्‍लंडचे पंतप्रधान, भारत सरकारचे गृहमंत्री, राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे सहकार्य घेण्यात येणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार, त्यांचे आचरण भावी पिढीला माहित होण्यासाठी पुढील वर्षभरात प्रत्येक जिल्ह्यात ‘जाणता राजा’ या नाटकाचे प्रयोग नि:शुल्क सुरू करण्यात येईल. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर असलेला चित्रपट महोत्‍सव जिल्ह्याजिल्ह्यात करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय संग्रहालय आपण तयार करीत आहोत. शिवसाहित्य संमेलन, शिवगीत स्पर्धा लवकरच सुरू करण्यात येणार आहे.

मंत्री श्री. मुनगंटीवार पुढे म्हणाले, शिवजयंतीनिमित्त आग्र्याला आज विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. येथे 100 एकर जागेत छत्रपतींचे स्मारक करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारचे सहकार्य घेण्यात येईल. 2 जून 2023 पासून एक कोटी तरुण – तरुणी शिवभक्तांची पोर्टलवर नोंदणी करण्याचा आपला संकल्प आहे. सुर्य – चंद्र असेपर्यंत शिवाजी महाराजांचे नाव राहणार आहे. त्यामुळे जात, पात, धर्म, पंथ याच्या पलिकडे जाऊन प्रत्येकाच्या हृदयात फक्त ‘शिवबा’ च असू द्या, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाच्या सुरवातीला सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते लखोटा उघडून राज्यगीताचा शुभारंभ करण्यात आला. तत्पूर्वी शिवस्मारकाला अभिवादन करून मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी रक्तदान शिबिराचे उद्घाटन केले. यावेळी भगव्या ध्वजाचे ध्वजारोहण करून भगवे फुगे आकाशात सोडण्यात आले. जगदंबा ढोल – ताशांच्या निनादात ‘जय भवानी…जय शिवाजी’ चा जागर करण्यात आला. यावेळी विक्की दुपारे व विजय पारखी यांनी राज्यगीत सादर केले. प्रास्ताविक डॉ. मंगेश गुलवाडे यांनी केले, तर कार्यक्रमाचे संचालन रवी गुरनुले यांनी केले.

000

 

सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सव : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य शोभायात्रा संपन्न

कोल्हापूर, दि. 19 (जिमाका) : कणेरी मठावरील श्री क्षेत्र सिद्धगिरी येथील सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सवांतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारी भव्य शोभायात्रा काढण्यात आली. दरम्यान शिवाजी पेठेतील महात्मा गांधी मैदान येथे पालकमंत्री दीपक केसरकर व उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते या शोभायात्रेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी काडसिध्देश्वर स्वामीजी, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, मठाचे विश्वस्त उदय सावंत, संतोष पाटील तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

शोभायात्रेचा मार्ग महात्मा गांधी मैदान -बिनखांबी गणेश मंदिर – महाद्वार रोड- पापाची तिकटी -गंगावेश- पंचगंगा नदी असा होता. या शोभायात्रेत मोठ्या प्रमाणावर नागरिक सहभागी झाले. महात्मा गांधी मैदान येथे सुरु झालेली शोभायात्रा पंचगंगा नदी घाट येथे विसर्जित झाली.

देशभरातील चौदा राज्यांतील पारंपरिक लोकवाद्यांसह कलाकारांनी विविध कलांचे सादरीकरण केले. तसेच छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित चित्रे, त्यांचे पर्यावरण विषयक विचार यांचे प्रदर्शन हे या मिरवणुकीचे वैशिष्ट्य होते. सातारा जिल्ह्यातील गोजेगाव येथील घडशी – गुरव समाजाचे सामुदायिक तुतारी वादन पथक हे शोभायात्रेचे मुख्य आकर्षण ठरले.

२० ते २६ फेब्रुवारी दरम्यान कणेरी मठ परिसरात होणाऱ्या या पंचमहाभूत उत्सव सोहळ्यात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केले.

 

000

विद्यार्थ्यांनो संकल्पाला कष्टाची जोड देवून यशाला गवसणी घाला! – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

कोल्हापूर येथील न्यू एज्युकेशन सोसायटीचा शतक महोत्सवी सांगता समारंभ व शतसंवत्सरी स्मरणिका प्रकाशन सोहळा संपन्न

कोल्हापूर, दि. 19 (जिमाका) : शिक्षण संस्था विद्यादानाचे काम करुन उज्वल भावी पिढी घडवित असल्याने अशा शिक्षण संस्थांना शासन नेहमीच मदत व सहकार्य करते. याच भावनेतून न्यू एज्युकेशन सोसायटीची वरिष्ठ महाविद्यालय सुरु करण्याची मागणी विशेष बाब म्हणून मान्य केली जाईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केले.

न्यू एज्युकेशन सोसायटी कोल्हापूरचा शतक महोत्सवी सांगता समारंभ व शतसंवत्सरी या स्मरणिकेचे प्रकाशन केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह आणि त्यांच्या पत्नी सोनलजी शाह, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, दि न्यू एज्युकेशन सोसायटीच्या शतक महोत्सव समिती व सल्लागार नियामक मंडळाचे कार्याध्यक्ष विनोदकुमार लोहिया यांच्यासह संस्थेचे मान्यवर पदाधिकारी, माजी विद्यार्थी आणि नागरिक उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, कोल्हापूर येथील न्यू एज्युकेशन सोसायटीने गेल्या 100 वर्षात केलेले ज्ञानदानाचे काम कौतुकास्पद आहे. संस्थेची ज्ञानदानाची चळवळ अखंड तेवत रहावी यासाठी न्यू एज्युकेशन सोसायटीने नवनवीन तंत्रज्ञानावर आधारित नवीन अभ्यासक्रम सुरू करुन विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनाची सोय उपलब्ध करून द्यावी, त्यास शासन स्तरावरुन आवश्यक ते सहकार्य केले जाईल. न्यू एज्युकेशन सोसायटीने चांगल्या नि:स्वार्थी भावनेने शिक्षण क्षेत्रात ज्ञानदानाचे काम केले असल्यामुळेच संस्थेने 100 वर्षाचा यशस्वी टप्पा पूर्ण केला आहे. संस्थेचे विद्यार्थी सर्व क्षेत्रात नावलौकीक मिळवित आहेत हे संस्थेच्या व भावी विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अलौकिक आहे, असे त्यांनी म्हंटले.

विद्यार्थ्यांच्या मनात परीक्षेची भीती असू नये, यासाठी देशाच्या प्रधानमंत्री महोदयांनी परीक्षा पे चर्चा हा कार्यक्रम घेतला. या कार्यक्रमामुळे आपणास लहानपणी ज्या शाळेत शिक्षण घेतले त्या ठिकाणी उपस्थित राहता आले. या कार्यक्रमामुळे लहाणपणीच्या आठवणी जाग्या झाल्या हा माझ्यासाठी आनंदाचा क्षण होता, असे श्री. शिंदे यांनी सांगितले. मागील दोन वर्षात सर्व कार्यक्रम बंद होते, पण आता आपल्या शासनाने सर्व कार्यक्रम करण्यास मान्यता दिली असल्याने विविध सण, उत्सव, समारंभ आपण मोठ्या उत्साहाने व दिमाखात साजरे करत आहोत, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले.

संकल्पाला कष्टाची जोड देवून यशाला गवसणी घाला – केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांचा विद्यार्थ्यांसाठी संदेश

विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातच जीवनाचे लक्ष निर्धारित करुन हे लक्ष्य साध्य करण्यासाठी संकल्प करावेत. संकल्पाला कष्टाची जोड देवून यशाला गवसणी घाला, असा संदेश विद्यार्थ्यांना केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी यावेळी बोलताना दिला.

केंद्रीय गृह मंत्री श्री. शाह म्हणाले, शालेय जीवनात विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार होत असतात. या संस्कारातूनच त्यांची चांगली जडण-घडण होते. यासाठी विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातच छोटे-छोटे संकल्प करावेत. एखादी गोष्ट सलग 21 दिवस केल्यास त्याची सवय लागते. हीच गोष्ट 90 दिवस केल्यास त्याची शैली बनते, यासाठी लहाणपणीच छोटे-छोटे संकल्प करुन त्याच्या पूर्तीसाठी प्रयत्न करा. शिक्षण, व्यायाम व योगाला जीवनात महत्वाचे स्थान द्या, असेही श्री. शाह यावेळी बोलतांना म्हणाले.

देशाने सर्व क्षेत्रात क्रांती केली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली देश सर्व क्षेत्रात उल्लेखनीय काम करीत आहे. पुढील 25 वर्षात देश जगात सर्व क्षेत्रात अव्वल असेल, असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री श्री. शाह यांनी यावेळी व्यक्त केला.

न्यू एज्युकेशन सोसायटीने 100 वर्षात ज्ञानदानाबरोबरच खेळ, क्रीडा यासह सर्व क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमठविला आहे. संस्थेने शिक्षण क्षेत्रात चांगले काम केले असून त्यांचे लाखो विद्यार्थी आज वेगवेळ्या क्षेत्रात काम करीत आहेत. संस्था समाजाप्रती चांगले काम करीत असून माझ्या पत्नीचे शिक्षण या  संस्थेत झाले याचा आपणास अभिमान वाटतो. शतक महोत्सवी सांगता समारंभ व शतसंवत्सरी या स्मरणिका प्रकाशन सोहळ्यास आपणास निमंत्रित केल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री श्री. शाह यांनी संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना धन्यवाद दिले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या पत्नी सोनल शाह यांनी मनोगत व्यक्त केले. आपण ज्या शाळेत शिकलो, घडलो त्या शाळेच्या समारंभास आपणास उपस्थित राहता आले हा माझ्यासाठी गौरवाचा क्षण आहे, असे त्यांनी सांगितले.  यावेळी त्यांनी शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा दिला.

न्यू एज्युकेशन सोसायटी शिक्षण संस्थेमार्फत सध्या १२ वी पर्यंतचे शिक्षण देण्यात येत आहे. संस्थेमार्फत कला, वाणिज्य, विज्ञान, कृषी, वैद्यकीय, विधी शाखेची वरिष्ठ महाविद्यालये सुरू करण्याचा मानस असून  यासाठी शासन स्तरावरून मदत मिळावी, अशी अपेक्षा दि न्यू एज्युकेशन सोसायटीच्या शतक महोत्सव समिती व सल्लागार नियामक मंडळाचे कार्याध्यक्ष विनोदकुमार लोहिया यांनी प्रास्ताविकात व्यक्त केली.

 

000

जुन्नरच्या पर्यटन विकासासाठी पुढील दोन वर्षात १०० कोटी – पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा

पुणे, दि.१९ : जुन्नरच्या पर्यटन विकासासाठी पुढील दोन वर्षात १०० कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात येतील; तसेच यावर्षीच्या हिंदवी स्वराज्य महोत्सवासारखे आयोजन यापुढे शिवजयंतीनिमित्त दरवर्षी करण्यात येईल, असे राज्याचे पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले.

शिवजयंतीनिमित्त राज्य शासनाकडून आयोजित हिंदवी स्वराज्य महोत्सव अंतर्गत भव्य महाशिव आरतीचे जुन्नर येथे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला आमदार प्रवीण दरेकर, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक अंकित गोयल,  माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार शरद सोनवणे, जिल्हा नियोजन समिती सदस्य आशा बुचके आदी उपस्थित होते.

मंत्री श्री. लोढा म्हणाले, यावर्षी शिवजयंतीला  उत्साहाचे वातावरण आहे. जुन्नरच्या पर्यटन विकासासाठी या ठिकाणी कायमस्वरूपी शिवकालीन गाव उभे करण्यात येईल. पर्यटन विभागाकडून येथे कायमस्वरूपी टेन्ट सिटी उभी करु, असेही ते म्हणाले.

यावेळी हातात दिवे, पणती घेऊन शिवनेरी किल्ल्याच्या दिशेने महाशिव आरती, शिव वंदना करण्यात आली. त्यानंतर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. यावेळी  आमदार श्री. दरेकर, ह.भ.प. पंकज महाराज गावडे, ह.भ.प. राणा महाराज वासकर यांनी मनोगत व्यक्त केले.

000

छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य जगाला प्रेरणादायी – अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील

सोलापूर, दि. 18 (जि. मा. का.) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगी कुशल नेतृत्व, कर्तृत्व, संघटन हे गुण होते. तसेच प्रजाहितदक्ष, एक प्रखर योध्दा, कुशल राज्यकर्ता, उदार व लोककल्याणकारी राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य भारत देशालाच नव्हे तर संपूर्ण जगाला प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी  आज येथे केले.

रंग भवन येथे छत्रपती संभाजी आरमारच्या वतीने आयोजित शिव रॅली व पालखी सोहळ्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर,  उपजिल्हा निवडणूक अधिकारी भारत वाघमारे, राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक नितीन धार्मिक, राज्य उत्पादन शुल्कचे  उपविभागीय अधिकारी आदित्य पवार, पोलीस उपायुक्त विजय कबाडे, महापालिकेचे लक्ष्मीकांत चलवादी तसेच मान्यवर पदाधिकारी, शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अध्यक्ष नरेंद्र पाटील म्हणाले,  छत्रपती शिवरायांनी रायरेश्वर वरती स्वराज्याची स्थापना करण्याची शपथ घेतली होती आणि त्यांच्या पराक्रमाने संपूर्ण महाराष्ट्र छत्रपती शिवरायांच्या अधिपत्याखाली आला. शिवरायांनी देशाला आदर्श निर्माण करून दिला. स्वतःचे आरमार, स्वतःचे सैन्य निर्माण केले. शिवरायांनी केलेले कार्य कधीही विसरता येणार नाही. आज संपूर्ण भारत देशात विविध माध्यमातून छत्रपती शिवरायांनी केलेल्या कार्याचा गुण गौरव होत आहे. राज्य शासनाकडूनही राज्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराज प्रशासनाचे, राज्यकर्त्याचे व समाजाचे आदर्श आहेत. शिवाजी महाराजांनी राष्ट्रनिर्माणाचे कार्य केले आहे. हे राष्ट्र निर्माण करताना शिवरायांनी सर्व समाजातील घटकांना न्याय दिला. ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला आदर्श दिला आहे, त्याचे सर्वांनी पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी यावेळी केले.

छत्रपती संभाजी आरमारच्या वतीने आयोजित शिव रॅली व पालखी सोहळ्याची सुरुवात रंगभवन चौक ते  पार्क चौक मार्गे छत्रपती  शिवाजी चौका पर्यंत काढण्यात आली. यावेळी  जय जिजाऊ , जय शिवराय या जयघोषांनी संपूर्ण परिसर  दुमदुमला होता.

                                                                    000

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन

कोल्हापूर दि. 19 (जिमाका) : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास तसेच राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

छत्रपती शिवाजी महाराज व लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण व अभिवादन कार्यक्रमाप्रसंगी जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार प्रकाश आवाडे, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, आमदार विनय कोरे,  आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार अमल महाडिक, माजी आमदार चंद्रदीप नरके, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्यासह मान्यवर, पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.

०००

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे कोल्हापूर विमानतळावर मान्यवरांकडून स्वागत

कोल्हापूर, दि. 19 (जिमाका) : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत आज कोल्हापूर येथे विविध कार्यक्रम होत असून या कार्यक्रमात उपस्थित राहण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे कोल्हापूर विमानतळावर आगमन झाले. त्यांच्या समवेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचेही आगमन झाले.

कोल्हापूर विमानतळावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार धनंजय महाडिक,खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने सांगलीचे खासदार संजय पाटील यांनी त्यांचे स्वागत केले.

जिल्हाधिकारी राहुल रेखावार, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, महापालिका आयुक्त तथा प्रशासक कादंबरी बलकवडे, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनीही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे स्वागत केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही पालकमंत्री दीपक केसरकर व  जिल्हाधिकारी राहुल रेखावार  यांच्यासह मान्यवरांनी  स्वागत केले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी कोल्हापूर विमानतळावर राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार प्रकाश आवाडे, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, आमदार विनय कोरे,  आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार अमल महाडिक, माजी आमदार चंद्रदीप नरके, यांच्यासह योगेश जाधव, समरजीत घाटगे व मान्यवर पदाधिकारी आणि अधिकारी उपस्थित होते.

000

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सपत्नीक घेतले श्रीअंबाबाईचे दर्शन

कोल्हापूर, दि. 19 (जिमाका): केंद्रीय गृह मंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज श्री अंबाबाईचे दर्शन घेतले.

यावेळी केंद्रीय गृह मंत्री श्री. शाह यांनी पत्नी सौ. सोनल अमित शाह यांच्यासह कुंकूमार्चन पूजा केली. तसेच ‘आई अंबाबाई, सर्वांना सुख, समृध्दी दे !’  अशी प्रार्थना केली. यावेळी मराठी भाषा मंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, आमदार गोपीचंद पडळकर, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी राहुल रेखावार, विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, समरजितसिंह घाटगे, महेश जाधव, राहुल चिकोडे, देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे आदी उपस्थित होते.

दरम्यान गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा श्री अंबाबाईची प्रतिमा देवून पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

000

ताज्या बातम्या

शासनातर्फे सुरू असलेला १५० दिवसांचा कार्यक्रम ही प्रशासकीय मोहीम नसून जनतेशी शासनाला जोडणारा सेतू...

0
पुणे, दि. २२ : शासनातर्फे सुरू असलेला १५० दिवसांचा कार्यक्रम ही प्रशासकीय मोहीम नसून जनतेशी शासनाला जोडणारा सेतू आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या ‘मी विकासयात्री’ पुस्तकाचे प्रकाशन

0
पुणे, दि. २२: ग्रामीण विकासाच्या क्षेत्रात डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी हे नाव अत्यंत आदराने घेतले जाते. लोकांच्या सहभागातून शासनाच्या योजना कशा यशस्वी होऊ शकतात हे...

गणेशोत्सवापूर्वी रस्त्यांवरील खड्डे बुजवावेत – वनमंत्री गणेश नाईक 

0
ठाणे,दि. २२ (जिमाका):- गणेशोत्सवामध्ये भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी रस्त्यावरील खड्डे त्वरित बुजवा, असे निर्देश राज्याचे वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गणेश...

आयुष्मान भारत योजनेचा लाभ वेळेत द्यावा – पालकमंत्री संजय शिरसाट

0
छत्रपती संभाजीनगर, दि. २२ (जिमाका)- आरोग्य विभागाच्या विविध योजनांचा लाभ गरजू रुग्णांना वेळेत मिळावा यासाठी आयुष्यमान भारत योजनेचा लाभ वेळेत द्यावा, त्यासाठी रुग्णालयांनी तत्पर...

करचुकवेगिरी प्रकरणात दोन जणांना अटक ३० कोटी ५२ लाख रुपयांची फसवणूक

0
मुंबई, दि. २२ : महाराष्ट्र जीएसटी विभागाने देवरा एक्झिम एलएलपी या फर्मचे भागीदार मेहुल जैन व ऑपरेटर कमलेश जैन यांना ३० कोटी ५२ लाख...