गुरूवार, ऑगस्ट 7, 2025
Home Blog Page 1685

परिसंवाद : ‘उद्योन्मुख आणि व्यूहरचनात्मक तंत्रे’

नागपूर, दि.6-     राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपुर विद्यापीठात भारतीय विज्ञान काँग्रेस आयोजित करण्यात आली आहे. गुरुवारी (दि.5) ‘उदयोन्मुख आणि व्यूहरचनात्मक तंत्रे’ अर्थात ‘इमर्जिंग अँड स्ट्रॅटेजिक टेक्नॉलॉजीज’ या विषयावर परिसंवाद डॉ. ए.के. डोरले सभागृह येथे आयोजित करण्यात आला.

परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी श्रीहरी बाबू श्रीवास्तव हे होते.

पी शिवा प्रसाद, संचालक यांनी ‘असिमेट्रिक तंत्रज्ञान’याविषयावर मांडणी केली. त्यात त्यांनी विषम तंत्रज्ञान कसे किफायतशीर, सूक्ष्म आणि व्यत्यय आणणारे आहेत हे स्पष्ट केले. त्याने सामाजिक-आर्थिक, भू-राजकीय, लष्करी इत्यादीसारख्या विघटनाच्या विविध रणनीती आणि रणनीतिक, तांत्रिक आणि धोरणात्मक अशा बाबींवर माहिती दिली.

प्रा.आर पी सिंग, पीआरएल अहमदाबाद, यांनी ‘क्वांटम टेक्नॉलॉजीज आणि फोटोनिक्स: ॲप्लिकेशन ओरिएंटेड रिसर्च’ याबाबत माहिती दिली. क्वांटम टेक्नॉलॉजी आणि त्याची वैविध्यपूर्ण तत्त्वे याविषयी स्पष्टीकरण देऊन. त्यांनी क्लोनिंगची उदाहरणे आणि क्वांटम संशोधनाचे प्रमुख क्षेत्र याबाबत माहिती दिली. क्वांटम कॉम्प्युटिंग्ज आणि सेन्सिंग्सवरील अलिकडील अद्यतने आणि अंमलबजावणीसह क्यूबिट्स आणि त्यांचे महत्त्व याबद्दल बोलले गेले. भविष्यातील जागतिक कार्यक्रमांवरही चर्चा झाली.

‘सायबर-फिजिकल सिस्टीम्समधील कृत्रिम बुद्धिमत्ता’ याविषयावर आयआयटी जोधपूरचे संचालक प्रा.संतनू चौधरी यांनी सादरीकरण केले. ते म्हणाले की, ‘उच्च हमीसह CPS ची खात्री करण्यासाठी AI ची विश्वासार्हता, लवचिकता आणि व्याख्या करण्याच्या समस्या आव्हानात्मक आहेत आणि AI-आधारित CPS च्या वास्तविक जीवनात तैनातीसाठी खूप महत्त्वाच्या आहेत’.

प्रा.रोहन पॉल यांनी ‘कॉग्निटिव्ह टेक्नॉलॉजीज अँड ऑटोनॉमस सिस्टीम्स: इमर्जिंग अॅव्हेन्यूज’ या विषयावर त्यांचे संशोधन सादर केले. संज्ञानात्मक स्वायत्त प्रणाली प्रत्यक्षात काय आहेत आणि रोबोट आणि मानवी टीमिंगचे उदयोन्मुख युग याबाबत माहिती दिली. संज्ञानात्मक क्षमता आणि तंत्रज्ञानाची आवश्यकता मॉडेल आणि उदाहरणांद्वारे त्यांनी स्पष्ट केली.

परिचय श्रीमती अस्मिता आचार्य यांनी तर नारायण राव यांनी मान्यवर वक्त्यांना स्मृतीचिन्ह प्रदान केले आणि सत्राची सांगता झाली.

000000

बातम्यांबरोबरच राज्याच्या शाश्वत विकासातही पत्रकारांचे महत्त्वपूर्ण योगदान – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. ६ : पत्रकारांचे काम केवळ बातम्या देण्यापुरते मर्यादित नसून राज्याच्या शाश्वत विकासातही पत्रकारांची महत्त्वाची भूमिका असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

आज पत्रकार दिनानिमित्त मुंबई येथे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह येथे अप्रतिम मीडिया न्युज नेटवर्कने आयोजित केलेल्या चौथा स्तंभ राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार प्रदान कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव नंदकुमार, मुख्यमंत्री कार्यालयाच्या पायाभूत सुविधा कक्षाचे महासंचालक राधेश्याम मोपलवार, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील, मंत्रालय विधिमंडळ पत्रकार संघाचे अध्यक्ष मंदार पारकर, सिने अभिनेते आणि दिग्दर्शक मंगेश देसाई, विवेक देशपांडे, रंजीत कक्कड आणि अप्रतिम मीडियाचे संचालक डॉ. अनिल फळे आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती.

मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले की, बदलत्या तंत्रज्ञानाची नोंद घेऊन पत्रकारांनी वाटचाल केली पाहिजे. राज्य शासनही पत्रकारांसाठी वैद्यकीय सहायता योजना, अधिस्वीकृती योजना, पत्रकारांना निवृत्तीनंतर सन्मान अशा काही महत्त्वपूर्ण योजना राबविते. या योजनांमध्ये काही सुधारणा करण्याबाबत काही सूचना येत आहेत. लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या पत्रकारांच्या हितासाठी आवश्यक त्या सुधारणा या योजनांत जरूर करण्यात येतील, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, पत्रकारांचे काम केवळ बातमी लिहिणे नाही तर राज्याच्या शाश्वत विकासासाठी सुद्धा त्यांचे योगदान महत्वाचे आहे. गेल्या सहा महिन्यातील राज्य शासनाचे काम माध्यमांनी पाहिले आहे. लोकाभिमुख काम करण्याचा आमचा प्रयत्न आहे. अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यातल्या ७५ वर्षाच्या ज्येष्ठांना मोफत एसटी प्रवास, समाजामध्ये दुर्लक्षित दिव्यांगांसाठी स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग, समृद्धी महामार्ग, विदर्भासाठी नागपूर अधिवेशनात विविध निर्णय राज्य शासनाने घेतले. माध्यमांनी ते सर्वांपर्यंत पोहोचवण्याचे काम केले, असे त्यांनी सांगितले.

माध्यम क्षेत्रात गेल्या तीन – साडे तीन दशकात खूप बदल झाले आहेत, असे सांगून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, पत्रकारांनी या बदलाची नोंद घेतली पाहिजे. अर्थात या बदलांमुळे पत्रकारांचे महत्व कमी होणार नसल्याचेही त्यांनी नमूद केले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, स्वातंत्र्य संग्रामाच्या काळात वृत्तपत्रांनी मोठी भूमिका बजावली. आजही नागरिकांना, वाचकांना खऱ्या अर्थाने सज्ञान करणे आणि लोकशिक्षणाची भूमिका माध्यमांनी पार पाडण्याची गरज आहे. आपल्या समाजापुढील अंमली पदार्थांचा वाढता वापर, नक्षलवाद, दहशतवाद, रोजगार, बदललेल्या कुटुंब व्यवस्था, बाजारू चंगळवाद या समस्यांचा वेध घेऊन माध्यमांनी वस्तुनिष्ठ आणि मार्गदर्शक अशी भूमिका मांडली पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी गडचिरोली येथील नक्षलवादाचा बिमोड करण्याची राज्य शासनाची भूमिका असून तेथील नागरिकांना विकासाच्या प्रक्रियेत सामावून घेतले जात असल्याचे सांगितले.

यावेळी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग उभारणीत मोलाचा वाटा असणारे श्री. मोपलवार, मनरेगा मध्ये विविध सुधारणा करुन त्याची प्रभावी अंमलबजावणी करणारे अतिरिक्त मुख्य सचिव श्री. नंदकुमार यांचा विशेष सन्मान मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.

अप्रतिम मीडियाच्या वतीने प्रकाश कथले (वर्धा), हेमंत जोशी  आणि योगेश त्रिवेदी (मुंबई) यांना चौथा स्तंभ राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. याशिवाय, माध्यम उद्योजकता व संपादकीय नेतृत्व, पर्यावरण वृत्त, वने व इको टुरिझम वृत्त, टीव्ही न्यूज चॅनेल टीम लीडर, विकास वृत्त, स्थानिक पर्यटन वृत्त,  उद्योग/व्यापार वृत्त, कला-संस्कृती, कृषी, शैक्षणिक, आरोग्य, साहित्य, ग्रामीण विकास, सहकार अशा विविध विभागात पत्रकारांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते ‘अप्रतिम महावक्ता’ पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. फळे यांनी तर सूत्रसंचालन  सोनाली शेटे यांनी केले. आभार विवेक देशपांडे यांनी मानले.

000

दीपक चव्हाण/विसंअ/

चर्चासत्र : प्राचीन आणि आधुनिक वैद्यकीय विज्ञानाचे अनुप्रयोग

नागपूर, दि.6- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपुर विद्यापीठात भारतीय विज्ञान काँग्रेस आयोजित करण्यात आली आहे. गुरुवारी (दि.5) ‘प्राचीन आणि आधुनिक वैद्यकीय विज्ञानाचे अनुप्रयोग’, या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला.  या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी डॉ. गिरधर जी अग्रवाल हे होते.

परिसंवादात ‘भारतात न्यूमोकोकल कंज्युगेट लस – एक संभाव्य निरीक्षण अभ्यास’ या विषयावर प्रा. अवस्थी यांनी सादरीकरण केले. त्या म्हणाल्या की, न्यूमोकोकल लसीकरणाचा परिचय भारतात झाल्यास समुदाय अधिग्रहित न्यूमोनियाचा भार कमी करण्याची क्षमता आहे. न्यूमोनिया आणि न्यूमोकोकल लसीशी संबंधित काही प्रश्नांची उत्तरेही त्यांनी दिली.

दुसरे सादरीकरण प्रा.डॉ. शीला मिश्रा यांनी “विज्ञान आणि तंत्रज्ञानातील शाश्वतता आणि लैंगिक दृष्टीकोन” या विषयावर केले.

तिसरे सादरीकरण “अनुवादात्मक आयुर्वेद: रूटिंग आयुर्वेद प्रिन्सिपल्स थ्रू मेनस्ट्रीम सायन्स” या विषयावर डॉ. संजीव रस्तोगी, फिजिओथेरपी विभागाचे प्रमुख, शासकीय आयुर्वेदिक कॉलेज आणि हॉस्पिटल, लखनौ यांचे झाले, त्यांनी आयुर्वेद आणि आधुनिक औषध यांच्यातील संबंधांवर प्रकाश टाकला. वैद्यकीय विज्ञान. आपल्या भाषणात त्यांनी आयुर्वेदाचे वैद्यकीय शास्त्रातील महत्त्व आणि आयुर्वेद तंत्राची वैद्यकीय शास्त्रात अधिक चांगल्या प्रकारे अंमलबजावणी करण्याची गरज यावर प्रकाश टाकला.

सत्राचे संचालन डॉ. श्रद्धा जोशी, यांनी केले.

00000

कार्बन उत्सर्जन शून्यावर आणण्यासाठी भारताचे शर्थीचे प्रयत्न – शेखर मांडे

नागपूर, दि.6 – कार्बन उत्सर्जन ही मानवापुढील मोठी समस्या आहे. सन 2070 पर्यंत टप्प्या टप्प्याने कार्बन उत्सर्जन हे शून्यावर आणण्यासाठी भारताने शर्थीचे प्रयत्न सुरु केले असून देशात आगामी सर्व वैज्ञानिक व औद्योगिक धोरणांमध्ये ह्याच बाबीवर भर देण्यात आला आहे, असे सीएसआयआरचे माजी संचालक डॉ. शेखर मांडे यांनी आज पत्रकारांशी बोलतांना सांगितले.

तसेच निर्माल्यापासून अत्तर, अगरबत्त्ती इ. उत्पादन करण्याचे प्रयत्न नागपूर मनपामार्फत राबविण्यात येऊन त्यातून रोजगार निर्मिती होईल, अशी माहिती ‘निरी’ चे संचालक अतुल वैद्य यांनी दिली.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपुर विद्यापीठात भारतीय विज्ञान काँग्रेस आयोजित करण्यात आली आहे. आजच्या चौथ्या दिवशी डॉ. शेखर मांडे हे आज पत्रकारांशी वार्तालाप करत होते.  त्यांच्या समवेत ‘निरी’ चे संचालक अतुल वैद्य हे ही उपस्थित होते.

डॉ. मांडे म्हणाले की, मानवतेपुढे पर्यावरणीय बदल ही सगळ्यात मोठी समस्या आहे. त्यासाठी कार्बनचे उत्सर्जन शून्यावर आणणे हे 2070 पर्यंत साध्य करावयाचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी तशी वैज्ञानिक आणि औद्योगिक धोरणे आखली जात आहेत. कार्बनचे उत्सर्जन हे प्रामुख्याने ऊर्जानिर्मितीशी संबंधित आहे. त्यासाठी पर्यायी ऊर्जा स्त्रोत निर्माण करणे, तसेच अपरिहार्य असलेल्या ज्वलनातून निर्माण होणारा कार्बन पर्यावरणात जाऊ न देण्यासाठी पर्यावरणपूरक यंत्रणा निर्मिती करणे अशा दोन्ही पर्यायांवर सध्या विविध आघाड्यांवर कामे सुरु आहेत. अनेक पर्याय आहेत.  त्यातील अधिक योग्य पर्यायांची निवड करणे हे मोठे जिकीरीचे आहे. त्यासाठी निवडावयाच्या पर्यायातून आणखी काही दुष्परिणाम होऊ नयेत ही दक्षता घेणे आवश्यक आहे.

डॉ. मांडे म्हणाले की, जिमोन सेक्वेंसिंग करण्याचे महत्त्वाकांक्षी काम सुरु आहे. देशातील सात कोटी लोकांमध्ये जनुकीय आजार आहेत. त्यासाठी हे करणे आवश्यक असून त्यादृष्टीने महत्त्वाचे काम सुरु आहे.

औष्णिक विद्युत प्रकल्पांमधून निर्माण होणाऱ्या राखेच्या पुनर्वापरासाठी अनेक पर्याय निर्माण केले जात आहेत. त्यापासून विटा, रस्ते बांधणी, टाईल्स निर्मिती इ. कामांमध्ये या राखेचा पुनर्वापर करण्याचे तंत्र विकसित करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे पोलाद निर्मितीतून निर्माण होणारी मळी रस्ते बांधकामात वापरण्याबाबतचे तंत्रही विकसित करण्यात आले असून ते लाभदायक ठरत असल्याचे दिसून आल्याचे मांडे यांनी सांगितले.

निरीचे निदेशक अतुल वैद्य यांनी सांगितले की, सीएसआयआर, लखनौ येथील सीमॅप, निरी यांच्या सहयोगातून नागपूर मनपा शहरातील देवस्थाने, मंदिरे, तसेच सण उत्सवांच्या काळात वापरून वाया जाणाऱ्या फुले, निर्माल्यांपासून सुगंधी द्रव्ये, अगरबत्त्ती इ. सारखे पदार्थ तयार करुन त्यातून रोजगार निर्मितीसाठी प्रकल्प राबविला जाणार आहे. या प्रकल्पासाठी सर्व तांत्रिक सहाय्य नागपुर मनपाला निरी, सीमॅप, सीएसआयआर या संस्था देणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.

00000

विज्ञानाचे लाभ सामान्यांपर्यंत पोहोचणे गरजेचे – शेखर मांडे

नागपूर, दि.6 : विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे लाभ सामान्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक असून त्यामुळेच आपला समाज खऱ्या अर्थाने समृद्ध होईल, असे प्रतिपादन डॉ. शेखर मांडे यांनी आज येथे केले.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपपूर विद्यापीठात भारतीय विज्ञान काँग्रेस आयोजित करण्यात आली आहे. आजच्या चौथ्या दिवशी सकाळी विज्ञान आणि समाज या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी भारतीय विज्ञान काँग्रेसच्या महासचिव डॉ. विजयलक्ष्मी सक्सेना होत्या. प्रमुख वक्ते सीएसआयआरचे माजी संचालक शेखर मांडे, शिवकुमार राव तसेच कुलगुरु डॉ.सुभाष चौधरी, समन्वयक डॉ. सी.सी. हांडा,डॉ. एस. रामकृष्ण आदी मान्यवर उपस्थित होते.

शेखर मांडे म्हणाले की, विज्ञान समाजाच्या प्रगतीला मदत करु शकते. 1947 साली आपला देश स्वतंत्र झाला तेव्हा चर्मोद्योगात आपल्या देशातील 25 हजार लोक सहभागी होते. मात्र या उद्योगाच्या प्रक्रिया, उत्त्पादन इ. घटकांमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा अंतर्भाव झाल्याने आज आपण या उद्योगातील मोठे निर्यातदार आहोत. जवळपास 50 लाखांहून अधिक लोक या व्यवसायाशी निगडीत आहेत. थोडक्यात विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे लाभ हे सामान्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. त्यातूनच प्रगती साध्य होऊ शकते. याबाबत अधिक माहिती देतांना त्यांनी सांगितले की, देवळांमध्ये तसेच अन्यत्र पूजाविधीत वापरल्या जाणाऱ्या फुलांना नंतर निर्माल्य म्हणून पाण्यात सोडून दिलं जातं. हे नक्कीच हितावह नाही. म्हणून अशा फुलांवर प्रक्रिया करुन त्यापासून सुगंधी द्रव्ये, अगरबत्त्ती, रंग निर्मिती केल्यास लाभ होईल. असाच उपक्रम सध्या शिर्डी येथे सुरु असून त्यात 5 हजार महिलांना रोजगार उपलब्ध झाला आहे. नागपूर शहरातही असा प्रकल्प सुरु करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

शिवकुमार राव यांनी सांगितले की, समाज हा विज्ञान आणि तंत्रज्ञानातील विकासाचा लाभार्थी असतो. विदर्भात दुग्धव्यवसाय आणि मासेमारी सारख्या व्यवसायाला वाव आहे. यात आधुनिक तंत्राचा तसेच माश्यांच्या चांगल्या प्रजाती मिळाल्यास, त्याची साठवणूक, दुग्ध प्रक्रिया याबाबत चांगले व लघु प्रकल्प मिळाल्यास विकासाला चांगली गती मिळू शकेल.

अध्यक्षीय भाषणात डॉ. विजयलक्ष्मी सक्सेना म्हणाल्या की, शाश्वत विकासासाठी विज्ञान तंत्रज्ञान आणि समाज यांच्यातील घनिष्ठ संबंधांची गरज आहे.

प्रास्ताविक कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी केले. मान्यवरांच्या हस्ते विज्ञान आणि समाज या ई- स्मरणिकेचे अनावरणही करण्यात आले. समन्वयक सी.सी.हांडा यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. आभार डॉ. उज्ज्वल गुल्हाणे यांनी मानले.

नोबेल विजेत्या प्रा.ॲडा योनाथ यांची विशेष उपस्थिती

नोबेल पुरस्कार प्राप्त इस्त्रायलच्या ज्येष्ठ महिला शास्त्रज्ञ प्रा.ॲडा योनाथ यांनी या परिसंवादाला आवर्जून भेट दिली. नोबेल पुरस्कार मिळण्यापूर्वीपासूनच त्यांचा भारताशी स्नेह आहे. चेन्नईतील शास्त्रज्ञांसोबत काम केले आहे. आपल्या उत्साहाचे रहस्य काय? असे विचारले असता त्यांनी हा उत्साह ‘सिक्रेट’ असल्याचे गंमतीशीरपणे सांगितले.

00000000

केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांनी घेतला सातारा जिल्ह्यातील योजनांचा आढावा

सातारा, दि. 6 – केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांनी जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या योजनांचा सविस्तर आढावा फलटण दौऱ्यात  घेतला. या दौऱ्यादरम्यान फलटण येथील प्रांताधिकारी कार्यालयातील दरबार हॉल येथे जिल्हास्तरीय अधिकारी यांची आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीत श्री. मिश्रा यांनी हा आढावा घेतला.

यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माजी मंत्री बाळा भेगडे, माजी आमदार प्रशांत परिचारक, जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी, पोलीस अधीक्षक समीर शेख, प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप, तहसीलदार समीर यादव यांच्यासह सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

समाजातील वंचित व दुर्बल घटकांना मुख्य प्रवाहात आणणे ही सरकारची भूमिका असल्याचे सांगून श्री. मिश्रा यांनी यावेळी केंद्र सरकारच्या विविध योजनांचा सविस्तर आढावा घेतला. या योजना जिल्ह्यात चांगल्या प्रकारे राबविण्यात येत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.  तसेच अशाच प्रकारे या योजना वंचित व दुर्बल घटकांपर्यंत पोहचवा, असेही ते यावेळी म्हणाले.

दौऱ्याच्या सुरुवातीस श्री. मिश्रा यांनी निंभोरे येथे पालखी महामार्गाची पाहणी केली. तसेच फलटण शहरात विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी लाभार्थ्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले व योजनांचा लाभ चांगल्या प्रकारे मिळत असल्याचेही सांगितले.

                                                                                                                ०००००

भिडे वाड्यासाठी शासनाची भूमिका न्यायालयात प्रभावीपणे मांडावी – पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची महाधिवक्त्यांना विनंती

पुणे दि. ६ : पुण्यातील भिडे वाड्याचे महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक महत्त्व आहे. त्यामुळे या वाड्याचा राष्ट्रीय स्मारकाच्या रुपात विकास होण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. मात्र, सदर स्मारकाचा वाद उच्च न्यायालयात सुरू असल्याने त्याठिकाणी शासनाची भूमिका प्रभावीपणे मांडावी, अशी विनंती पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज राज्याच्या महाधिवक्त्यांना केली.

पालकमंत्री श्री. पाटील यांनी आज पुण्यातील भिडे वाड्यासंदर्भातील न्यायालयीन प्रकरणाबाबत राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांची मुंबईत भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. तसेच शासनाच्या भूमिकेसंदर्भात महाधिवक्त्यांना अवगत केले.

पुण्यातील भिडे वाडा येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. ही वास्तू महिला भगिनींसाठी प्रेरणास्थान आहे. येणाऱ्या पिढीनेदेखील इथून सामाजिक कार्याची आणि शिक्षणाची प्रेरणा घ्यावी यासाठी या वाड्याचा राष्ट्रीय स्मारक म्हणून विकास करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. मात्र, सदर जागेचे दोन मालक न्यायालयात गेले असल्याने सध्या हे प्रकरण उच्च न्यायालयात प्रलंबित आहे.

या प्रकरणाची सुनावणी जलदगतीने व्हावी असे शासनाचे प्रयत्न आहेत. त्यासाठी राज्याच्या महाधिवक्त्यांनी सदर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन स्मारकासाठीची शासनाची भूमिका प्रभावीपणे मांडावी, अशी विनंती पालकमंत्र्यांनी या भेटी दरम्यान केली.
0000

मातृमंदिराच्या नूतन इमारतीत अनुभवावर आधारित शिक्षणाला अनुरूप वातावरण  – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे, दि. 5 : नव्या शैक्षणिक धोरणात पूर्वप्राथमिक आणि प्राथमिक स्तरावर केवळ अभ्यासाचा विचार न करता ज्या-ज्या गोष्टींचा विकास होऊ शकतो त्याचा सर्वाधिक विकास करण्याचा विचार किंवा व्यक्तिमत्त्व फुलविण्याचा विचार केला असून मातृमंदिराच्या नूतन इमारतीत अशाप्रकारे अनुभवावर आधारित शिक्षणाला अनुरूप वातावरण तयार केले आहे. उद्याची पिढी घडविण्यासाठी अशा शिक्षणाचा फायदा होईल आणि त्यातून देशाच्या आणि समाजाच्या प्रगतीला हातभार लागेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

न्यू इंग्लिश स्कूल परिसरातील डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे मुरलीधर लोहिया मातृमंदिर नूतन वास्तूच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला क्रीडामंत्री गिरीष महाजन, संस्थेचे विश्वस्त जगदीश कदम, श्री मुकुंद भवन ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त पुरुषोत्तमदास लोहिया, डॉ.रवींद्र आचार्य, आशिष पुराणिक, कार्यवाह धनंजय कुलकर्णी, मुख्याध्यापिका माधुरी बर्वे आदी उपस्थित होते.

मोठा इतिहास लाभलेल्या ऐतिहासिक संस्थेत येण्याची संधी मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त करून श्री.फडणवीस म्हणाले, लोकमान्य टिळक, आगरकर आणि छत्रपती शाहू महाराज यांच्यासारख्या  द्रष्ट्या  महापुरुषांनी या संस्थेची स्थापना केली. आज ही संस्था एका वटवृक्षाप्रमाणे विविध शाखांमध्ये बहरली असून ५० हजार विद्यार्थ्यांच्या जीवनाला नवी दिशा देण्याचे कार्य करते आहे. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या परंपरेला साजेसे मातृमंदिर सुरू करण्यात आले आहे. राष्ट्रीय शिक्षणाची आवश्यकता असलेल्या काळात स्थापन झालेल्या या संस्थेने  देशात नवे शिक्षणाचे प्रयोग होत असताना आणि  नवे धोरण अंमलात येते तेव्हा अग्रेसर राहून त्याचा अवलंब आपल्याकडे करावे हेच अपेक्षित होते आणि ते मातृमंदिरने केले असल्याचे सांगून श्री.फडणवीस यांनी शाळेचे अभिनंदन केले.

विद्यार्थ्यांना शाळा हवीशी वाटेल असे वायुमंडल अपेक्षित

कुठल्याही संस्थेचे मूल्यमापन हे सुंदर इमारतीच्या आधारे किंवा पायाभूत सुविधांच्या आधारे करता येत नाही, तर  त्या शाळेची इमारत आपले बाहु उघडून प्रत्येक व्यक्तीला आपल्या कवेत घ्यायला तयार आहे का यावर होते.  विद्यार्थ्यांना तिथे जाण्याची इच्छा होईल असे वातावरण शिक्षक करतात का, तिथे गेल्यानंतर विद्यार्थ्यांना भीती न वाटता तिथले वातावरण हवेहवेसे वाटेल असे वायुमंडल तिथे तयार होते काय या आधारावर शाळेचे मूल्यमापन होते. जुन्या काळात शिक्षणाची पद्धत कठोर होती. आज शिक्षणाची ओढ तयार व्हावी, विद्यार्थ्यांना आवड निर्माण होईल असे शिक्षण अपेक्षित आहे. प्रत्येक व्यक्तीतील गुणांची अभिव्यक्ती करता येईल असा विचार नव्या शैक्षणिक धोरणाने केला आहे.

मातृभाषेला ज्ञानभाषा करायची आहे

इंग्रजी जगात बोलली जाणारी मोठी भाषा असल्याने तिचा तिरस्कार करून चालणार नाही, मात्र मातृभाषेचा पुरस्कार करावा लागेल. जगात प्रगत राष्ट्रांच्या विकासात मातृभाषेचा वाटा आहे, त्यामुळे मातृभाषेचा विचार इंग्रजी शिक्षण घेताना करावाच लागेल. त्यामुळे नव्या शैक्षणिक धोरणात मातृभाषेतल्या शिक्षणाचा समावेश सर्व विषयात करण्यात आला आहे. उच्च आणि  तंत्रशिक्षण, वैद्यकीय शिक्षण मातृभाषेत घेता येणार आहे. आपली भाषा ज्ञानभाषा केल्याने  आणि त्या भाषेत ज्ञान दिल्याने  प्रत्येक व्यक्तीला आपल्या गुणानुरूप विकसित होण्याची संधी मिळेल.  ग्रामीण युवकांनाही स्वतःची प्रगती साधता  येईल.

शिक्षणाच्या माध्यमातून आपण नवभारत घडवत आहोत. विद्यार्थ्यांना विजयाचा इतिहास शिकवायला हवा. आपली उज्ज्वल संस्कृती आणि परंपरेचा स्वीकार करत आणि त्याचवेळी संविधानाने दिलेल्या मुल्यांची जोपासना करत आपल्याला पुढे जायचे आहे. संविधानाची मूल्ये रुजवली आणि आपल्या संस्कृतीतील चांगल्या बाबी शिक्षणात आणल्यास भारत विश्वगुरू पदापर्यंत पेाहचेल. असा पाया भरण्याचे कार्य मातृमंदिर संस्थेने केले असल्याचे श्री.फडणवीस म्हणाले.

यावेळी श्री.लोहिया यांनीदेखील मनोगत व्यक्त केले. संस्थेची वाटचाल नव्या युगाला साजेशी असल्याचे ते म्हणाले.

संस्थेचे विश्वस्त कदम यांनी प्रास्ताविकात संस्थेची माहिती दिली. शाळेच्यावतीने राष्ट्रीय शिक्षण आणि अनुभवावर आधारित शिक्षण पद्धतीवर भर दिला जातो, असे त्यांनी सांगितले. नव्या शैक्षणिक धोरणाला अनुकूल नूतन इमारत असल्याचे ते म्हणाले.

नूतन इमारत उभी करण्यात योगदान देणाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

००००

मराठी विश्व संमेलनात ‘अभिशाप’ पुस्तकाचे प्रकाशन

मुंबई, दि. 5 : नॅशनल स्पोर्टस् क्लब ऑफ इंडिया, वरळी येथे आयोजित ‘मराठी तितुका मेळवावा’ विश्व मराठी संमेलनात मॉरिशसचे डॉ.बिडन आबा यांच्या ‘अभिशाप’ या मराठी पुस्तकाचे प्रकाशन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच गणेश वंदना या सिडीचे विमोचनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

प्रकाशन प्रसंगी राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक संजय पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.

००००

खेळाच्या विकासासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सुविधा आणि प्रशिक्षक शासनातर्फे देण्यात येतील – मुख्यमंत्री

पुणे, दि. 5 : राज्यात खेळाच्या विकासासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सुविधा आणि प्रशिक्षक शासनातर्फे देण्यात येतील. क्रीडा विकासासाठी कुठल्याही प्रकारची कमतरता भासू दिली जाणार नाही. खेळाडूंनी क्रीडा सुविधांचा लाभ घेऊन राज्याचा नावलौकिक जगात उंचवावा आणि राज्याचे नाव सातासमुद्रापार पोहोचवावे. खेळ आणि खेळाडूंच्या विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनद्वारा आयोजित महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेचे मुख्यमंत्री श्री.शिंदे यांच्या हस्ते म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, क्रीडा मंत्री गिरीष महाजन, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, विभागीय आयुक्त सौरभ राव, क्रीडा आयुक्त डॉ.सुहास दिवसे, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे महासचिव नामदेव शिरगावकर आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले, शासनाने क्रीडा क्षेत्राला प्राधान्य दिले आहे. राज्यातील उत्कृष्ट खेळाडूंचा डाटाबेस तयार करीत आहोत. यामुळे भविष्यात चांगले खेळाडू घडविण्यास मदत मिळेल. १५५ क्रीडा संकुल राज्यात असून त्यात आणखी १२२ संकुलांची भर घालण्यात येणार आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत यशस्वी खेळाडूंच्या बक्षिसाच्या रकमेत ५ पट वाढ केली आहे. जागतिक नेमबाजी स्पर्धेत यश मिळवलेल्या ठाण्याच्या रुद्रांश पाटील याला दोन कोटी रुपयांचे बक्षीस देण्यात आले. यातून खेळाडूंना प्रेरणा मिळेल, राज्याच्या क्रीडा संस्कृतीला चालना मिळेल.

जिद्द, कष्ट आणि चिकाटीच्या बळावर पदक मिळवा

राज्यात तालुका, जिल्हा आणि राज्य पातळीवर विविध स्पर्धांचे आयोजन होते. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचण्यासाठी हे टप्पे महत्त्वाचे आहेत. म्हणून खेळाडूंनी प्रत्येक टप्प्यावर जिद्द, कष्ट, चिकाटी दाखवली तर ऑलिम्पिकमध्ये नक्कीच यश मिळेल. अपयशी होणाऱ्या खेळाडूंनी खचून न जाता पुढील स्पर्धेत यश मिळविण्याची जिद्द बाळगावी. पुन्हा नव्या उत्साहाने खेळायला सुरूवात करावी. इंटरनेट-मोबाईलच्या जगात मैदानावर खेळणे अत्यंत आवश्यक आहे. खेळल्याने शरीर आणि मन कणखर होईल आणि आव्हाने पेलण्याची ताकद मिळेल.

स्पर्धा ही खेळाची दिंडी, झेंडा निराळा तरी रंग खेळाचा

ऑलिम्पिक शब्दात एक जादू आहे. स्पर्धेच्या निमित्ताने इथे खेळाची दिंडी आपण पाहतो आहे. प्रत्येकाच्या हातात वेगळा झेंडा असला तरी रंग एकच असतो, तो म्हणजे खेळाचा. म्हणून आपण खेळाडूंना महत्त्व देतो. १० हजारपेक्षा अधिक खेळाडूंचा या स्पर्धेत सहभाग आहे. सर्वाधिक पदके मिळविणाऱ्या जिल्ह्याला चषक प्रदान करण्यात येणार आहे असे सांगून उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी क्रीडा विभाग, महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक असोसिएशन आणि खेळाडूंचे अभिनंदन केले.

गुजरातमध्ये झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत १४० पदके मिळवून आपल्या खेळाडूंनी प्रथम क्रमांक मिळवून दिला. त्याबद्दल त्यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले. राज्य उद्योग किंवा पायाभूत सुविधेतच पुढे नाही तर आपले खेळाडूदेखील गुणवंत आहेत. आपल्याला नक्कीच ऑलिम्पिकमध्ये पदक मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

खेळाडूंना परदेशी प्रशिक्षकांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खेलो इंडियाच्या माध्यमातून प्रत्येक खेळाडूला संधी उपलब्ध करून दिली. राज्यातही महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिकच्या माध्यमातून शासनाने खेळाडूंना ती संधी उपलब्ध करून दिली आहे. जीवनात खेळ महत्त्वाचा आहे, त्यापेक्षाही खिलाडूवृत्ती महत्त्वाची आहे. त्यामुळे जिंकण्याची जिद्द तयार होते. पराजयातून उभे राहून जिंकण्याची जिद्द मनामध्ये खेळाच्या माध्यमातून निर्माण होते.

राज्यात खेळांसाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येत आहे. चांगले खेळाडू तयार करण्यासाठी परदेशी प्रशिक्षकांनाही आमंत्रित करण्यात येईल. त्याचा सर्व खर्च शासनाच्या माध्यमातून करण्याचा निर्णय राज्य शासन घेईल. आपला खेळाडू देशासाठी-राज्यासाठी खेळतो. निरज चोप्रासारखा खेळाडू जेव्हा सुवर्ण पदक मिळवतो आणि ऑलिम्पिकच्या मैदानावर राष्ट्रगीत वाजताना भारताचा तिरंगा वरवर जातो, तेव्हा संपूर्ण देशाला त्याचा गौरव वाटतो, तोच देशाचा गौरव असतो. हेच खरे खेळाडूला मिळालेले पदक असते. सहभागी खेळाडू असे पदक देशाला मिळवून देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मेहनतीने खेळा, ताकदीने खेळा, पूर्ण जोर लावून खेळा अशा शुभेच्छा देऊन त्यांनी पदक मिळवणाऱ्या खेळाडूंचे अभिनंदन केले. पराभूत होणाऱ्या खेळाडूंनी पदक मिळविण्याच्या जिद्दीने पुन्हा एकदा स्पर्धेत सहभागी व्हावे, त्यांना कोणी थांबवू शकणार नाही, असेही उपमुख्यमंत्री म्हणाले.

‘बाज की असली उडान अभी बाकी है, हमारे इरादो का इम्तिहान अभी बाकी है, अभी नापी है मुठ्ठीभर जमीं हमने, अभी तो पुरा आसमान बाकी है,’ अशा शब्दात त्यांनी खेळाडूंचा उत्साह वाढवला.

दर दोन वर्षांनी महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन – गिरीष महाजन

क्रीडा मंत्री श्री.महाजन म्हणाले, जोपर्यंत तंत्रशुद्ध पद्धतीने खेळ खेळला जात नाही तोपर्यंत पदके प्राप्त करता येणार नाही. त्यासोबत खेळाडूंना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. आधुनिक खेळ हा कौशल्य आणि क्षमतेवर आधारित आहे. त्यामुळे शालेय जीवनापासूनच हे कौशल्य देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. राज्य शासनाने राष्ट्रीय स्पर्धेतील पदक विजेत्या खेळाडूंच्या पुरस्कार रकमेत भरीव वाढ केली आहे. खेळाडूंना प्रथमच राष्ट्रीय स्पर्धांसाठी विमान प्रवासाची सुविधा देण्यात आली आहे. शासनाकडून खेळाडूंना विशेष सुविधा देण्यात येणार आहे. महाराष्ट्राला राष्ट्रकूल स्पर्धेत आठ पदके मिळाली. देशाच्या पंतप्रधानांनी खेळाडूंसोबत स्वत: संवाद साधला हे प्रथमच घडले. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात खेळासाठी चांगल्या सुविधा निर्माण करण्यात येत आहे. शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे ऑलिम्पिक भवन निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.

महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांनी वर्षाच्या सुरुवातीलाच ही राज्यस्तरीय मोठी स्पर्धा आयोजित केल्याबद्दल राज्य शासन तसेच महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन, क्रीडा संघटनांचे अभिनंदन केले. ते म्हणाले, क्रीडापटुंच्या कामगिरीवर क्रीडा चळवळ पुढे जात असते. राज्यातील ९ शहरात ही स्पर्धा आयोजित केल्याने संपूर्ण राज्यात खेळाची वातावरण निर्मिती झाली आहे. खेळात हार-जीत, जय पराजय होणारच. परंतु सर्वोच्च क्षमता पणाला लावून खेळाडूंनी कामगिरी करावी. खेळ भावनेने रसिकांची मने जिंकावित. चुकीचे काही घडणार नाही याची काळजी घावी, विजयाने माजू नये, पराभवातून खचू नये. क्रीडासंस्कृती वाढवणे, रुजवणे याकडे सर्वांनी लक्ष द्यावे. राज्यात प्रत्येकाने एक तरी मैदानी खेळ खेळला पाहिजे. खेळ वैयक्तिक पातळीवर निरोगी करत नाहीत तर समाजमन निकोप करण्यासाठी उपयुक्त होतात. देशी खेळांची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करू, असेही श्री. पवार म्हणाले.

प्रास्ताविकात श्री.दिवसे यांनी स्पर्धेच्या आयोजनाविषयी माहिती दिली. ते म्हणाले, राज्यात २३ वर्षानंतर या स्पर्धेचे आयोजन होत आहे. ऑलिम्पिक स्पर्धेच्या धर्तीवर ३९ खेळांचा समावेश या स्पर्धेत करण्यात आला असून त्यापैकी ७ खेळांचा प्रथमच समावेश होत आहे. राज्यातील ८ जिल्ह्यात विविध खेळांच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या सुरूवातीस मुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्पर्धेच्या क्रीडाज्योतीचे प्रज्वलन करण्यात आले. क्रीडा मंत्री श्री.महाजन आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार  यांनी राज्याने ३६ व्या राष्ट्रीय स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल राज्याला प्राप्त झालेला चषक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपूर्द केला. शेवटी तो मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी क्रीडा आयुक्तांकडे सुपूर्द केला. राज्याच्या ३६ जिल्ह्यातून आलेल्या खेळाडूंचे प्रातिनिधिक संचलन यावेळी करण्यात आले. यावेळी रिदमिक जिम्नॅसिटकच्या खेळाडूंनी शानदार प्रात्यक्षिके सादर केली. खेळाडूंना खेळाची शपथ देण्यात आली. प्रारंभी कलाकारांनी सादर केलेल्या गणेश वंदनेने कार्यक्रमाला सुरूवात झाली. सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत मल्लखांब खेळाडूंनी चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केली तसेच चित्ताकर्षक इलुमिनाती कार्यक्रमाचेही सादरीकरण करण्यात आहे.

000

ताज्या बातम्या

क्रांतिसिंह नाना पाटील, क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड यांना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी...

0
सांगली, दि. 7, (जि. मा. का.) : क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखाना लि. कुंडल येथे क्रांतिसिंह नाना पाटील व क्रांतिअग्रणी डॉ....

नागरिकांच्या सोयीसुविधा निर्माण कार्यात लोकसहभाग महत्वाचा – मंत्री छगन भुजबळ

0
नाशिक, दि. ७ : नागरिकांच्या विविध सोयी सुविधांचा विकास होण्यासाठी लोकसहभाग महत्वाचा आहे, असे प्रतिपादन अन्न, नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी...

बीड जिल्ह्याला हरित, समृद्ध बनविण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक – उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार

0
एकाच दिवशी जिल्ह्यात विविध ठिकाणी ३० लाखांहून अधिक रोपांची लागवड आकांक्षित तालुका कार्यक्रमात वडवणी तालुक्याची लक्षणीय कामगिरी बीड, दिनांक ०७ (जिमाका) :  हवामान बदल,...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते कौशल्यवर्धन केंद्राचे भूमिपूजन

0
बीड, दिनांक ०७ (जिमाका) :  महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ व टाटा टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने बीड शहरात कौशल्यवर्धन केंद्र (CIIIT) प्रकल्प उभारला जात आहे....

बीड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील – उपमुख्यमंत्री अजित पवार

0
बीड, दिनांक ७ (जिमाका) : जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून बीड जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी मी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असून, जिल्ह्याच्या विकास प्रक्रियेत पत्रकार बांधवांचे सहकार्य महत्वाचे...