शुक्रवार, जुलै 18, 2025
Home Blog Page 432

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई दि. १५ : राज्य शासनाच्या क्रीडा विभागाद्वारे राज्यातील सर्वोत्कृष्ट क्रीडापटुंना व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या व्यक्तींना क्रीडा विभागाचा प्रतिष्ठेचा “शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार” प्रदान करण्यात येतो. या पुरस्कारासाठी सन २०२३-२०२४ करिता अर्ज करण्याचे आवाहन क्रीडा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

अर्ज सादर करण्या-या इच्छुक क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, साहसी उपक्रम व दिव्यांग खेळाडू यांनी विहित मुदतीत क्रीडा विभागाच्या http://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर स्क्रोलिंग लिंक (Scrolling Link) मध्ये उपलब्ध करुन दिलेल्या लिंकवर दि. १४ ते २६ जानेवारी, २०२५ या कालावधीत व दि. २६ जानेवारी, २०२५ रोजी रात्री १२.०० वाजेपर्यंत फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करण्यात यावेत.

क्रीडा क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ज्येष्ठ क्रीडा महर्षीकरिता जीवन गौरव पुरस्कार, क्रीडा मार्गदर्शकांकरिता उत्कृष्ठ क्रीडा मार्गदर्शक / जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार (महिला क्रीडा मार्गदर्शक), शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू), शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (साहसी उपक्रम), शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) असे पुरस्कार प्रदान करण्यात येतात.

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सुधारीत नियमावली २०२३ विहित केली आहे. या नियमावलीनुसार सन २०२३-२४ या वर्षाच्या पुरस्कारासाठी राज्यातील क्रीडा मार्गदर्शक, खेळाडु, दिव्यांग खेळाडू व साहसी उपक्रमात सहभागी झालेले खेळाडू / व्यक्ती यांच्याद्वारा दि. १५ जानेवारी ते २६ जानेवारी, २०२५ ह्या कालावधीमध्ये ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत असल्याचे प्रसिद्धी पत्रकाद्वारे मुंबई उपनगरचे जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी कळविले आहे.

००००

विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांची जपानच्या महावाणिज्यदूतांनी घेतली सदिच्छा भेट

मुंबई, दि. १५ : जपानचे भारतातील महावाणिज्यदूत यागी कोजी यांनी आज विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. सभापती पदी निवड झाल्याबद्दल श्री.कोजी यांनी प्रा.शिंदे यांचे अभिनंदन केले.

सभापती प्रा. राम शिंदे यांनी महावाणिज्यदूत श्री. कोजी यांचे स्वागत केले. यावेळी विधिमंडळाचे सचिव (कार्यभार २) विलास आठवले उपस्थित होते.

जपान भारत यांचे मैत्रीचे संबंध आहेत. महाराष्ट्रासारख्या प्रगतीशील राज्यामध्ये विविध पायाभूत प्रकल्पांमध्ये जपान सहभागी असल्याचा आपल्याला आनंद आणि अभिमान असल्याचे श्री. कोजी यांनी यावेळी सांगितले. तसेच मेट्रोच्या उभारणीत जपान संपूर्ण सहकार्य करीत असून लवकरच ते काम पूर्णत्वास येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

प्रा. शिंदे यांनी पर्यटन मंत्री असताना एप्रिल २०१६ मध्ये दिलेल्या जपान भेटींना उजाळा दिला. त्यावेळी प्रा.शिंदे यांनी याकोहामा मधील कोयासान विद्यापीठात दिलेल्या भाषणांची आठवण सांगितली. तसेच जपानच्या सहकार्याबद्दल आनंद व्यक्त केला.

००००

आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढविण्यासाठी ‘अटल’ उपक्रम- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील

मुंबई, दि. १५ : शिक्षणातील संधी आणि क्षमता ओळ्खण्याबरोबरच विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास वाढविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून ‘अटल’ उपक्रम सुरू करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना राज्य सामाईक प्रवेश कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी परीक्षांचा सराव करता यावा म्हणून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढविण्यासाठी उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी  केले.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते  महाराष्ट्र राज्य सीईटी सेलकडून सुरू करण्यात आलेल्या ‘अटल’ (ATAL – Assessment, Tests And Learning) ऑनलाइन नोंदणी प्रणालीचे उदघाटन करण्यात आले. यावेळी राज्य सामाईक परीक्षा कक्षाचे आयुक्त दिलीप सरदेसाई, सीईटी सेलचे घनश्याम केदार व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री. पाटील म्हणाले, या उपक्रमाअंतर्गत मॉक टेस्ट्स आणि सायकोमेट्रिक टेस्टच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमतांचा शोध घेता येणार आहे. या सराव परिक्षांमुळे विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास वाढण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर त्या विषयातील शैक्षणिक संधी आणि प्रवेश परीक्षांच्या पूर्वतयारीमुळे  विद्यार्थ्यांना परीक्षेला सामोरे जाताना येणारा ताण कमी होईल. शैक्षणिक आयुष्यात पुढे जाण्यास प्रोत्साहन मिळेल. सायकोमेट्रिक टेस्टद्वारे विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार व त्यांच्या क्षमतांनुसार योग्य शैक्षणिक आणि व्यावसायिक विषयांची निवड करण्यास मदत होईल. हा उपक्रम केवळ परीक्षा तयारीपुरता मर्यादित नसून, विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रोत्साहन देणारा आहे.असेही मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.

अधिक माहिती https://cetcell.mahacet.org  यावर उपलब्ध आहे.

0000

‘दिलखुलास’, ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात लीना बनसोड यांची मुलाखत

मुंबई दि. १५ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड यांच्या विशेष मुलाखतीचे प्रसारण होणार आहे.

‘दिलखुलास’ कार्यक्रमात ही मुलाखत सोमवार दि. २०, मंगळवार दि.२१, बुधवार दि. २२ आणि गुरूवार दि. २३ जानेवारी २०२५ रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआर’या मोबाईल अॅपवर सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे. तर ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ही मुलाखत मंगळवार दि.२१ जानेवारी २०२५ रोजी रात्री ८.०० वा. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारित होणार आहे. तसेच महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ही मुलाखत ऐकता येणार आहे. ज्येष्ठ निवेदक प्रसाद मोकाशी यांनी ही मुलाखत घेतली आहे.

एक्स – https://twitter.com/MahaDGIPR

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

राज्य शासन समाजातील सर्वच घटकांच्या उन्नतीसाठी सातत्याने प्रयत्न करीत आहे. प्रामुख्याने महिला, बालके, युवक, तसेच मागासवर्गीय व वंचित घटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध उपक्रम आणि योजना राबविण्यात आहे. याअनुषंगाने आदिवासी विकास विभागांतर्गत आदिवासी बांधवांच्या विकासासाठी शबरी कॉर्पोरेशन अंतर्गत ‘वन धन’ केंद्रांद्वारे उत्पादित केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी ‘शबरी नॅचरल्स’नावाचा ब्रँड तयार करण्यात आला आहे. यामुळे आदिवासी बांधवांना रोजगार उपलब्ध होऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे. याचबरोबर ‘वन धन’ केंद्रांद्वारे उत्पादित उत्पादनांसाठी ई-कॉमर्स वेब पोर्टल सुरू करणे, आदिवासी जिल्ह्यात गोदामांची संख्या वाढवणे या योजनांची अंमलबजावणी, ‘शबरी नॅचरल्स’ब्रँडच्या माध्यमातून उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे तसेच शंभर दिवसाच्या कामकाजाच्या अनुषंगाने विभागाचा आराखडा, याविषयी व्यवस्थापकीय संचालक श्रीमती बनसोड यांनी ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात माहिती दिली आहे.

०००

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे मुंबई येथून प्रयाण

मुंबई दि. १५ :- केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून भारतीय वायू सेनेच्या विमानाने आज दुपारी प्रयाण  झाले. यावेळी रिअर ॲडमिरल कुणाल राजकुमार उपस्थित होते.

0000

भारताची मोठ्या सागरी शक्तीच्या दिशेने वाटचाल- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

मुंबई, दि. १५ : निलगिरी युद्धनौका, सूरत विनाशिका आणि वाघशीर पाणबुडीचे लोकार्पण ही नौदलाच्या गौरवशाली परंपरेला भविष्यातील आकांक्षेशी जोडणारी ऐतिहासिक घटना आहे. यामुळे भारताची वाटचाल मोठ्या सागरी शक्तीच्या दिशेने सुरू असून भारताच्या सुरक्षा आणि प्रगतीला मोठे सामर्थ्य प्राप्त झाले असल्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

भारतात निर्मित सूरत आणि निलगिरी (युद्धनौका) तसेच वाघशीर (पाणबुडी) या तीन महत्वाच्या नौका मुंबईतील नेव्हल डॉकयार्ड येथे झालेल्या कार्यक्रमात प्रधानमंत्र्यांच्या हस्ते राष्ट्राला समर्पित करण्यात आल्या. राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, नौसेना प्रमुख दिनेशकुमार त्रिपाठी यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित होते.

प्रधानमंत्री श्री.मोदी म्हणाले की, संपूर्ण विश्व हा परिवार मानून भारत विकासाच्या भावनेने काम करतोय. तीन आघाडीच्या लढाऊ जहाजांचा नौदलामध्ये समावेश एक मजबूत आणि स्वावलंबी संरक्षण दल निर्माण करण्यासाठी भारताची अटल वचनबद्धता अधोरेखित करते. भारतीय समुद्र क्षेत्रात भारत प्रथम प्रतिसादकर्ता म्हणून उदयास आला आहे. नौदलाने अनेकांचे जीव वाचवले आहेत आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मालवाहतूक सुरक्षित केली आहे. यामुळे जगभरातून भारतावर विश्वास वाढला असून आज जागतिक स्तरावर, विशेषत: ‘ग्लोबल साउथ’मध्ये भारत एक विश्वासार्ह आणि जबाबदार भागीदार म्हणून ओळखला जातो. तीन युद्धनौकांचे राष्ट्रार्पण सैन्याबरोबरच आर्थिक दृष्टीने सुद्धा महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

जमीन, पाणी, हवा, खोल समुद्र किंवा अनंत अवकाश अशा सर्वच क्षेत्रात भारताने आपले हित जपून तिनही सेनादलांच्या माध्यमातून मागील काही वर्षात आत्मनिर्भर बनण्याची प्रशंसनीय वाटचाल सुरू ठेवली आहे. एकाच वेळी विनाशिका, युद्धनौका आणि पाणबुडी कार्यान्वित होत असल्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र भूमीवर भारतीय नौदलाने स्वावलंबी होण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असल्याचे प्रधानमंत्री श्री.मोदी यांनी यावेळी नमूद केले. भारतीय सैनिकांना आता भारतीय युद्ध सामग्री उपलब्ध होत असून १०० हून अधिक देशांना संरक्षण सामग्री निर्यात केली जात आहे. या माध्यमातून ‘मेक इन इंडिया’ योजनेचा विस्तार होत असून आर्थिक प्रगतीचे दार उघडून भारताच्या तिसऱ्या मोठ्या अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करण्याच्या प्रक्रियेत मोठा हातभार लागत असल्याचे गौरवोद्गार प्रधानमंत्री श्री.मोदी यांनी काढले.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंग म्हणाले की, एकाच वेळी तीन युद्धनौका राष्ट्राला अर्पण होत असल्याने भारतीय समुद्री क्षेत्रात देशाची ताकद आणि महत्व वाढले आहे. या क्षेत्रातून मोठे व्यापार होत असून संरक्षण क्षेत्रात भारत आत्मनिर्भर होत आहे. आधुनिकीकरणावर भर देण्यात येत असून या तिनही नौका त्यादृष्टीने सक्षम असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

नौदल प्रमुख ॲडमिरल श्री. त्रिपाठी यांनी नौदलासाठी गौरव आणि प्रतिष्ठेचा दिवस असल्याचे सांगून या निमित्ताने शक्ती, क्षमता आणि आत्मनिर्भरता साजरी केली जात असल्याचा उल्लेख केला.

युद्धनौकांविषयी थोडक्यात

आयएनएस सूरत – हे प्रकल्पातील चौथे आणि अंतिम जहाज आहे असून जगातील सर्वात मोठ्या आणि अत्याधुनिक विनाशिकांपैकी एक आहे. या जहाजामध्ये ७५ टक्के स्वदेशी घटक असून यात अत्याधुनिक शस्त्र-संवेदक प्रणाली आणि प्रगत नेटवर्क-केंद्रित क्षमता आहेत.

आयएनएस वाघशीर – स्कॉर्पीन प्रकल्पातील ही सहावी आणि अंतिम पाणबुडी आहे. ही भारताच्या पाणबुडी बांधणीतील वाढत्या कौशल्याचे प्रतिनिधित्व करते. फ्रान्सच्या नेव्हल ग्रुपच्या सहकार्याने ही तयार करण्यात आली आहे.

आयएनएस निलगिरी – स्टेल्थ युद्धनौका प्रकल्पातील ही पहिली नौका आहे. भारतीय नौदलाच्या युद्धनौका डिझाईन ब्युरोने याचे डिझाइन केले आहे. यात टिकाऊपणा, समुद्रात स्थिरता आणि स्टेल्थसाठी प्रगत वैशिष्ट्ये आहेत, जी स्वदेशी युद्धनौकांच्या पुढील पिढीचे प्रतिबिंब आहे.

0000

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे मुंबईत आगमन

मुंबई, दि. 15 :- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे विविध कार्यक्रमांसाठी सकाळी मुंबईत आगमन झाले. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय  विमानतळ येथे प्रधानमंत्री श्री.मोदी यांचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, मुख्य सचिव सुजाता सौनिक, अतिरिक्त मुख्य सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनीषा म्हैसकर यांनी स्वागत केले.

 यावेळी तिन्ही दलाचे अधिकारी व राजशिष्टाचार विभागाचे वरिष्ठ अधिकारी  उपस्थित होते.

वैद्यकीय पर्यटन सुरू करावे – पर्यटनमंत्री शंभूराज देसाई

मुंबई,दि.१४: अनेक परदेशी पर्यटक वैद्यकीय सोयी सुविधांसाठी भारतात येत असतात त्या दृष्टीने महाराष्ट्रात वैद्यकीय पर्यटन सुरू करावे, असे निर्देश पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

मंत्रालयात पर्यटन मंत्री श्री. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक मंडळाची १७३वी बैठक झाली. या बैठकीस पर्यटन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे, पर्यटन संचालक डॉ. बी. एन. पाटील तसेच विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

यावेळी टुरिस्ट गाईड प्रोग्राम, वैद्यकीय पर्यटन पुन्हा सुरू करणे, जंगल सफारी येथे कॅरॅव्हॅन सुरू करणे, इत्यादींविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. महाबळेश्वर येथे ११ महिन्यांसाठी प्रायोगिक तत्त्वावर हेलिकॉप्टर सुविधा सुरू करणे तसेच तापोळा, वासोटा, प्रतापगड येथे पर्यटकांच्या सोयीसाठी हेलिपॅड उभारण्यास परवानगी मिळवणे, महाबळेश्वर येथे टुरिस्ट गाईड, पर्यटकांकडून अतिरिक्त शुल्क आकारू नयेत यासाठी गाईड प्रोग्रामची अंमलबजावणी करावी. या प्रोग्राममध्ये अधिक सक्षम प्रमाणीकरण करावे, अशा सूचना पर्यटनमंत्री श्री. देसाई यांनी दिल्या.

000

संध्या गरवारे/विसंअ/

महिला व बालविकास विभागातील योजना, उपक्रमांना गती द्यावी – मंत्री आदिती तटकरे

मुंबई, दि. 14 : महिला व बालविकास विभागातर्फे महिला आणि बालकांच्या विकासासाठी विविध योजना व उपक्रम राबविण्यात येतात. या योजना व उपक्रमांना गती द्यावी, असे निर्देश महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी विभागाच्या आढावा बैठकीत दिले. यावेळी विभागाचे सचिव अनुपकुमार यादव उपस्थित होते.

यावेळी मंत्री कु. तटकरे यांनी राज्यातील महिला व बालकांच्या विकासासाठी राबविण्यात येणारा ‘सक्षम अंगणवाडी आणि पोषण’ उपक्रम, ‘ मिशन वात्सल्य ‘, ‘ मातृवंदना योजना ‘, ‘वन स्टॉप सेंटर (सखी)’ या योजना आणि उपक्रमांवर खर्च करण्यात येणाऱ्या निधी आणि विना खर्चित निधी याबाबत माहिती घेतली.

0000

काशीबाई थोरात/विसंअ/

वन्य प्राण्यांचे हल्ले रोखण्यासाठी उपाययोजना – वनमंत्री गणेश नाईक

मुंबई, दि. 14 :- वन्य प्राणी त्यांचा अधिवास सोडून मानवी वस्तीत येऊ नयेत यासाठी उपाययोजना करण्यात येत असून ब्रिटिश कालखंडात केलेल्या उपाययोजना करणे आवश्यक आहे. वन्य प्राणी हे खाद्यासाठी मानवी वस्तीत प्रवेश करत असल्याने त्यांच्या अधिवासातच खाद्याची व्यवस्था होणे गरजेचे आहे. यामुळे वन्य प्राण्यांचे मनुष्यावर हल्ले होणार नाही, अशी माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी मंत्रालयातील पत्रकार परिषदेत दिली.

वाघ तसेच बिबट्यांच्या झालेल्या मृत्यूप्रकरणी वनमंत्री श्री.नाईक यांनी आज पत्रकार परिषद घेतली. जंगलांच्या कोर क्षेत्रात विविध प्रकारची फळ झाडे लावल्यास शाकाहारी प्राण्यांना त्या ठिकाणी खाद्य उपलब्ध होऊन मांसाहारी प्राण्यांची देखील खाद्याची सोय होईल, असे मंत्री श्री. नाईक यांनी सांगितले.

नागपूर येथील गोरेवाडा प्राणीसंग्रहालयात 20 डिसेंबर तसेच 23 डिसेंबर 2024 रोजी 3 वाघ आणि एका बिबट्याचा मृत्यू हा कोंबडीचे मांस खायला दिल्यामुळे झाले असल्याचे प्राथमिकदृष्ट्या दिसून आले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या कोंबडीच्या मांसामध्ये बुरशीजन्य विषाणूचा प्रादुर्भाव असल्याचे आढळून आले आहे. याबाबतचा वैद्यकीय चाचणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. कर्तव्यात कसूर करणाऱ्या वन अधिकाऱ्यांना आवश्यकतेनुसार निलंबीत किंवा बडतर्फ करण्यात येईल, असे मंत्री श्री.नाईक यांनी सांगितले.

मंत्री श्री.नाईक म्हणाले की, ब्रम्हपुरी वन विभागाच्या शिंदेवाडी वनपरिक्षेत्रात 2 जानेवारी 2025 रोजी एका वाघाचा नैसर्गिक मृत्यू झाला असून या वाघाच्या शरिराचे सर्व अवयव सुस्थितीत होते. पांढरकवडा वन विभागाच्या वणी वनपरिक्षेत्रात दिनांक 7 जानेवारी 2025 रोजी एका वाघाचा शिकारीमुळे मृत्यू झाला. या वाघाचे शरीर पूर्णत: कुजलेले असल्याने त्याच्या मृत्यूचे कारण समजले नाही. तथापि, वाघाच्या शरीरातील दात तसेच नखे गायब झाल्याचे निदर्शनास आले आहे. या सर्व प्रकरणावर वन विभाग नजर ठेऊन तपास करत असल्याचेही त्यांनी सांगितले.

जंगलामध्ये लागणारी आग विझविण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. या विषयासंदर्भात आंतरराष्ट्रीय स्तरावर कशा प्रकारच्या उपाययोजना राबविण्यात येत आहेत त्यांचा अभ्यासही करण्याच्या सूचना दिल्याचे मंत्री श्री.नाईक यांनी सांगितले.

वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात झालेल्या मनुष्यहानीसंदर्भात आवश्यक त्या उपाययोजना करण्याबरोबरच योग्य ती नुकसान भरपाई देण्याचा शासन विचार करत आहे. तथापि, बफरझोनमध्ये कोणत्याही व्यक्तीने जाऊ नये, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्याचप्रमाणे, वनसफारी करतांना काही पर्यटक वन्य प्राण्यांची वाट रोखून त्यांना पाहत असल्याने दिसून आले. यावरही वन अधिकाऱ्यांना लक्ष ठेवण्याचे निर्देश देण्यात आल्याचे वनमंत्री श्री.नाईक यांनी यावेळी सांगितले.

000

संजय ओरके/विसंअ/

ताज्या बातम्या

महाराष्ट्रासाठी पर्यायी ऊर्जा प्रकल्पांची मांडणी – राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांची माहिती

0
राजधानीत ' ऊर्जा वार्ता' परिषद नवी दिल्ली 17 : महाराष्ट्र राज्य हे ऊर्जा क्षेत्रात आघाडीवर  ठेवण्यासाठी  पर्यायी ऊर्जा प्रकल्पांची आवश्यकता असल्याची धोरणात्मक मांडणी ऊर्जा...

विकसित महाराष्ट्र २०४७ मध्ये ‘आयएसओवा’ सक्रीय सहभागी – आयएसओवाचे अध्यक्ष अर्चना मीना

0
मुंबई, दि. 17 : सक्षमता, ज्ञान आणि अनुभवाची जोड देऊन आपण सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रात पूर्ण क्षमतेने योगदान देण्यास सक्षम आहोत. विकसित महाराष्ट्र २०४७ या...

उमराणेतील शेतकऱ्यांना कांद्याची थकीत बिले देण्यासाठी ४५ दिवसांत अहवाल सादर करा – पणन मंत्री जयकुमार...

0
मुंबई, दि. १७ : नाशिक येथील उमराणे रामेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील शेतकऱ्यांना कांद्याचे थकीत बिले अदा करण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश पणन मंत्री जयकुमार...

नागपूर-अमरावती जिल्ह्यातील नझूल निवासी भूखंडधारक अभय योजनेला ३१ जुलै २०२६ पर्यंत मुदतवाढ – महसूलमंत्री चंद्रशेखर...

0
मुंबई दि. १७ : नागपूर आणि अमरावती विभागातील निवासी प्रयोजनार्थ भाडेपट्ट्यावर दिलेल्या नझूल भूखंडांसाठी लागू करण्यात आलेल्या अभय योजनेला ३१ जुलै २०२६ पर्यंत मुदतवाढ...

पावसाळ्यात वाहून जाणारे अतिरिक्त पाणी सात गावांना देण्याबाबत प्रस्ताव सादर करावा – जलसंपदा मंत्री...

0
मुंबई, दि. १७ :- सीना-माढा उपसा सिंचन योजनेत बंद नलिका वितरण प्रणाली व ठिबक सिंचनाचा अवलंब केल्यामुळे होणारी पाण्याची बचत आणि पावसाळ्यात धरण भरल्यामुळे  वाहून...