सोमवार, जुलै 7, 2025
Home Blog

विधानसभा प्रश्नोत्तरे

पीएमजीपी इमारतींच्या पुनर्विकासाबाबत एक महिन्याच्या आत बैठक – मंत्री शंभूराज देसाई

मुंबई, दि. ७: पीएमजीपी (प्रधानमंत्री गृह प्रकल्प) योजनेतील इमारतींच्या पुनर्विकासाबाबत येत्या एक महिन्याच्या आत बैठक आयोजित करण्यात येणार आहे. या बैठकीत लोकप्रतिनिधी समितीचे सदस्य आणि म्हाडाचे वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार असल्याची माहिती, मंत्री शंभूराज देसाई विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

याबाबत सदस्य हरीश पिंपळे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी सदस्य अमीन पटेल योगेश सागर, ज्योती गायकवाड यांनीही उपप्रश्न उपस्थित केला.

मंत्री देसाई म्हणाले, उमरखाडी पुनर्वसन समितीच्या वतीने समूह पुनर्विकास प्रकल्पाबाबत प्रस्ताव सादर केला होता. मात्र, या प्रस्तावासोबत खासगी मालकांची आवश्यक संमती सादर करण्यात आली नव्हती. त्यामुळे खासगी मालकांच्या इमारतींचा समावेश समूह पुनर्विकास योजनेमध्ये करणे शक्य नसल्याचे मंडळाने त्यांना कळविले होते. त्यानंतरही उमरखाडी पुनर्वसन समितीने एकूण ८१ इमारतींच्या समावेशासह सुधारित प्रस्ताव ३ डिसेंबर २०२४ रोजी म्हाडा प्राधिकरणाकडे सादर केला आहे.

या प्रस्तावाच्या अनुषंगाने प्रकल्पाची व्यवहार्यता पुन्हा एकदा तपासण्याचे काम सुरू करण्यात आले असून, यासाठी वास्तुविशारदाची नियुक्ती करण्यात आली आहे. संबंधित वास्तुविशारदाकडून सादर होणाऱ्या अहवालाच्या आधारे, समूह पुनर्विकासाबाबतची पुढील कार्यवाही म्हाडामार्फत करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

या इमारतींपैकी ३७ म्हाडाच्या मालकीच्या असून उर्वरित ४४ इमारती खासगी जमिनींवरील आहेत. या सर्व इमारतींचा क्लस्टर करून पुनर्विकास करण्याचे नियोजन आहे. मात्र, खासगी मालकांची आवश्यक संमती मिळालेली नाही. या पार्श्वभूमीवर नवीन पर्यायांचा विचार करण्यासाठी वित्तीय आणि तांत्रिक सल्लागारांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या अहवालाच्या आधारे पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे मंत्री देसाई यांनी यावेळी सांगितले.

०००

शैलजा पाटील/विसंअ

 

नंदुरबारमध्ये अयोग्य दर्जाचे खाद्यतेल प्रकरणात दोषींवर कारवाई करण्यात येणार – मंत्री नरहरी झिरवाळ

मुंबई, दि. ७ : नंदुरबार जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) केलेल्या तपासणीत काही खाद्यतेल नमुने अयोग्य दर्जाचे आढळून आले असून, याप्रकरणी दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात येणार असून संबंधित कंपनी बंद करण्याची कार्यवाही केली जाईल, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

याबाबत सदस्य आमश्या पाडवी यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी सदस्य समीर कुणावार, हिरामण खोसकर यांनीही उपप्रश्न उपस्थित केला.

मंत्री श्री.झिरवाळ म्हणाले, दि. १० मार्च २०२५ रोजी अक्कलकुवा येथील मे. गोपाल प्रोव्हिजन या आस्थापनाची तपासणी करताना महिका ब्रँडचे रिफाईन्ड सोयाबीन तेल व कमला ब्रँडचे शेंगदाणा तेल या अन्नपदार्थांचे नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले होते. प्राप्त झालेल्या प्राथमिक अहवालानुसार हे नमुने अन्न सुरक्षा मानकांनुसार अप्रमाणित आढळले. विक्रेत्याने अपील केल्यामुळे नमुने फेरविश्लेषणासाठी सेंट्रल फूड टेक्नॉलॉजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट, मैसूर येथे पाठविण्यात आले आहेत. सन २०२४-२५ या कालावधीत नंदुरबार जिल्ह्यात खाद्यतेलाचे एकूण १२ नमुने तपासण्यात आले असून त्यापैकी ५ नमुने अयोग्य दर्जाचे घोषित करण्यात आले आहेत. त्यातील २ प्रकरणांमध्ये अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ अंतर्गत कारवाई सुरू असून उर्वरित ३ नमुने रेफरल प्रयोगशाळेकडून तपासणी अहवालाच्या प्रतीक्षेत आहेत.

अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर पावले उचलली जातील असे मंत्री झिरवाळ यांनी यावेळी सांगितले.

०००

शैलजा पाटील/विसंअ

विधानपरिषद प्रश्नोत्तरे

बांधकामापूर्वी रक्कम अदा केल्याप्रकरणी शाखा अभियंता आणि  कार्यकारी अभियंत्याचे निलंबन – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे

मुंबई, दि. ७ : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मौजे लासूर येथील शाळा बांधकाम आणि मौजे गुरुधानोरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र बांधकामाच्या पूर्वीच १४७ लाख रुपये ठेकेदाराला अदा करण्यात आले. या प्रकरणाच्या प्राथमिक चौकशीअंती संबंधित जिल्हा परिषद बांधकाम विभागातील शाखा अभियंता तसेच कार्यकारी अभियंता यांचे निलंबन करण्यात आले आहे. या अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी पुढील दोन महिन्यात करण्यात येणार असून यात जे तथ्य आढळेल त्यानुसार कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

विधानपरिषद सदस्य सतीश चव्हाण यांनी याबाबतचा प्रश्न विचारला होता. यात विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, सदस्य ॲड.अनिल परब, भाई जगताप यांनीही उपप्रश्न विचारला.

मंत्री गोरे म्हणाले की, या बांधकामांदर्भात चौकशी करण्यात आली असून प्रत्यक्षात झालेल्या कामापेक्षा अधिकचे मूल्यांकन मोजमाप पुस्तिकेत नोंदविण्यात आले आहे. कामाचे फोटो, टेस्ट रिपोर्ट नसतानाही देयके मंजूर करण्यात आली आहे. यासंदर्भात आदर्श कार्यपद्धती असूनही त्यानुसार ही देयके अदा केली असल्याचे त्यांनी आपल्या उत्तरात सांगितले आहे.

०००

संजय ओरके/विसंअ

पंढरपूरची वारी जगातील अद्भुत परंपरा – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

मुंबई, दि.७ :  राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आषाढी एकादशी निमित्त चेंबूर येथील श्री शृंगेरी शंकर मठ शारदा मंदिराला भेट देऊन मंदिरातर्फे रविवारी (दि. 6 जुलै) आयोजित आषाढी एकादशी सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेतला. यावेळी उपस्थित भाविकांशी संवाद साधताना राज्यपालांनी महाराष्ट्राच्या अध्यात्मिक व सांस्कृतिक परंपरांचा गौरव केला. अनेक शतकांपासूनअव्याहत सुरु असलेली पंढरपूरची वारी ही जगातील अद्भुत लोकपरंपरा असून श्रद्धा, भक्ती व समतेची ही वारी सर्व प्रकारचे भेदाभेद मिटवणारी असल्याचे सांगितले.

राज्यपाल म्हणाले, महाराष्ट्र ही संतांची भूमी असून या भूमीने जगाला संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, समर्थ रामदास असे अनेक संतश्रेष्ठ दिले आहे. संत नामदेवांनी भागवत धर्माची पताका पंजाबपर्यंत पोहोचवली आहे. महाराष्ट्र भूमीने देशाला छत्रपती शिवाजी महाराजांसारखे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक दिले असून महाराजांनी स्वधर्माचे रक्षण करताना इतर धर्मांचा यथायोग्य आदर केला. छत्रपती शिवाजी महाराज सच्चे धर्मनिरपेक्ष शासक होते. भारतीय लोक देखील स्वभावत:च धर्मनिरपेक्षतेचा स्वीकार करणारे आहेत, असे राज्यपालांनी सांगितले.

मंदिरातर्फे चालविल्या जाणाऱ्या मानवतावादी कार्याबद्दल विश्वस्तांचे अभिनंदन करून सुवर्ण भारती आरोग्य केंद्राच्या माध्यमातून वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉक्टर्स व आरोग्य सेवकांना राज्यपाल राधाकृष्णन यांनी कौतुकाची थाप दिली. यावेळी राज्यपालांच्या उपस्थितीत अन्नछत्र चालविण्यात योगदान देणाऱ्या महिला स्वयंसेविकांचा सत्कार करण्यात आला.

श्री शृंगेरी शंकर मठ शारदा मंदिराचे मानद व्यवस्थापक डॉ. जी. मुथुकृष्णन यांनी आपल्या प्रास्ताविकात मंदिरातर्फे चालविल्या जाणाऱ्या धार्मिक अनुष्ठानाची तसेच सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. श्री शृंगेरी शंकर शारदा पिठाचे जगद्गुरू शंकराचार्य श्री भारती तीर्थ यांच्या सन्यास दीक्षेचे यंदा पन्नासावे वर्ष असून त्यांच्या प्रेरणेने मंदिरातर्फे धार्मिक अनुष्ठानाशिवाय अन्नदान व वैद्यकीय सेवा देण्याचे कार्य केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. मंदिरातर्फे गरजू रुग्णांसाठी वैद्यकीय सेवेकचे मोठे कार्य केले जात असून आतापर्यंत 1 लाख लोकांनी त्याचा लाभ घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.

श्री शृंगेरी शंकर मठ शारदा मंदिरातर्फे 300 महिलांना शिलाई यंत्र देण्यात आले असून मानसिकदृष्ट्या दिव्यांग मुलांसाठी कार्य करणाऱ्या नाशिक, बदलापूर व  सातारा येथील संस्थेला मदत केली जात असल्याचे मंदिराच्या सुवर्ण भारती आरोग्य केंद्राचे विश्वस्त डॉ. कुमारस्वामी  यांनी सांगितले.

सुरुवातीला राज्यपालांनी श्री शृंगेरी शंकर मठ येथील देवी शारदा, श्री गणेश व शंकराचार्य यांच्या प्रतिमांचे दर्शन घेतले. कार्यक्रमाला मंदिराचे विश्वस्त मोहन सुब्रमण्यम, जुना हनुमान मंदिर ट्रस्टचे विश्वस्त सुबोध आचार्य, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, उपसचिव एस. राममूर्ती आदी उपस्थित होते.

यावेळी आषाढी एकादशीनिमित्त गायिका पूजा गोपालन व त्यांच्या संगीत कला चमूने यांनी मराठी, हिंदी व तामिळ अभंग व भक्तिगीतांचा कार्यक्रम सादर केला.

०००

आता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोफत जेईई – सीईटीची कोचिंग

चंद्रपूर, दि. 6 : ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाखाणण्याजोगी असते. मात्र आर्थिक परिस्थितीमुळे किंवा संधी उपलब्ध न झाल्यामुळे असे विद्यार्थी स्पर्धेच्या युगात मागे राहून जातात. यावर तोडगा काढण्यासाठी तसेच हुशार विद्यार्थ्यांच्या पंखांना बळ देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने ‘चांदा – ज्योती सुपर 100’ अभ्यासिकेचा अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या अभ्यासिकेच्या माध्यमातून आता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोफत जेईई – सीईटीची कोचिंग मिळणार आहे.

राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते या अभ्यासिकेचे उद्घाटन शनिवारी (दि.5) करण्यात आले. शहरातील ज्युबली हायस्कुलच्या परिसरात पार पडलेल्या या कार्यक्रमाला आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. मनपा आयुक्त विपीन पालीवाल, प्रभारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी गिरीश धायगुडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मिना साळूंके, शिक्षणाधिकारी राजेश पाताळे, अश्विनी सोनवणे, उपशिक्षणाधिकारी विशाल देशमुख आदी उपस्थित होते.

ग्रामीण विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी जिल्हा परिषदेने अतिशय चांगला आणि नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केला आहे, असे सांगून पालकमंत्री डॉ. अशोक उईके म्हणाले, इयत्ता 11 वीचे 50 आणि इयत्ता 12 वीचे 50 असे एकूण 100 विद्यार्थ्यांना मोफत जेईई – सीईटीचे मार्गदर्शन मिळणार आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागातील या विद्यार्थ्यांची राहण्याची आणि जेवण्याची सोयसुध्दा जिल्हा परिषदेमार्फत मोफत आहे. या उपक्रमाचा फायदा नक्कीच जिल्ह्यातील होतकरू आणि मेहनती विद्यार्थ्यांना होईल.

आज या अभ्यासिकेचे उद्घाटन झाले असले तरी, येथील विद्यार्थी पुढील वर्षीच्या जेईई – सीईटी परिक्षेत उल्लेखनीय कामगिरी करतील तेव्हा खरे सार्थक होईल. 100 विद्यार्थ्यांची निवड करताना अतिशय काटेकोरपणे करा. चाचणी परिक्षेद्वारेच निवड व्हावी, कोणाच्याही शिफारसीने विद्यार्थ्यांना अजिबात प्रवेश देऊ नका. या अभ्यासिकेसाठी ग्रामाीण भागातील हुशार आणि चांगले विद्यार्थी निवडले गेले पाहिजे. विद्यार्थ्यांच्या भविष्याबाबत केवळ एकच उद्दिष्ट न ठेवता जेईई – सीईटी प्रमाणेच इतरही स्पर्धा परिक्षेचे मोफत मार्गदर्शनसुध्दा या अभ्यासिकेतून मिळण्यासाठी नियोजन करावे, अशा सुचनाही पालकमंत्री डॉ. उईके यांनी दिल्या.

तत्पुर्वी पालकमंत्र्यांच्या हस्ते अभ्यासिकेच्या परिसरात वृक्षारोपन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी फित कापून अभ्यासिकेचे उद्घाटन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षणाधिकारी अश्विनी सोनवणे यांनी केले. यावेळी विद्यार्थी व इतर पालक उपस्थित होते.

या मिळणार सुविधा : ग्रामीण विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्याची दिशा ठरविण्यासाठी ‘चांदा – ज्योती सुपर 100’ या अभ्यासिकेमध्ये दर्जेदार कोचिंग व मार्गदर्शन, निवासी व जेवणाची मोफत सोय, अभ्यास साहित्य, समुपदेशन व टेस्ट  सिरीज, क्षेत्रभेटी व प्रेरणादायी संवाद.

पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्याकडून आदिवासी विकास विभागाचा आढावा

चंद्रपूर, दि. 6 : पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी शनिवारी, जिल्ह्यातील आदिवासी विकास विभागाचा आढावा घेतला. तसेच राज्य शासनाने सुरू केलेल्या 100 दिवस प्रशासकीय सुधारणा मोहिमेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांचासुध्दा सन्मान केला.

नियोजन भवन येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मनपा आयुक्त विपीन पालिवाल, अतिरिक्त पोलिस अधिक्षक ईश्वर कातकाडे, उपसंचालक आनंद रेड्डी, उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू, प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार, श्री. लाटकर आदी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री डॉ. श्री. उईके म्हणाले, आदिम जमातीला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पी.एम. जनमन आणि धरती आबा ग्राम उत्कर्ष अभियान सुरू केले आहे. या अंतर्गत विविध शासकीय विभागामार्फत आदिवासींना एकत्रितपणे योजनांचा लाभ देण्यात येत आहे. यात घरकुल, वनपट्टे, मतदान ओळखपत्र, आधार कार्ड, आयुष्मान कार्ड, रेशन कार्ड, विद्युत जोडणी, जात प्रमाणपत्र, जॉब कार्ड, राष्ट्रीयत्व व अधिवास प्रमाणपत्र, सातबारा, पीएम किसान, उत्पन्न दाखला, जनधन खाते आदींचा समावेश आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात 18 टक्के लोकसंख्या आदिवासींची असून दोन प्रकल्प कार्यालय आहेत. जिल्हाधिका-यांच्या मार्गदर्शनात चंद्रपूरची टीम मन लावून काम करीत आहे. धरती आबा ग्राम उत्कर्ष अभियानाच्या माध्यमातून 17 विभागाच्या 25 सेवा देण्यात येत आहे. धरती आबा अभियान प्रत्येक घरापर्यंत पोहचले पाहिजे. यापुढेही आदिवासी समाजाला काय अपेक्षित आहे, त्यानुसारच योजना राबविली जाईल. आदिवासींना लाभ खरच मिळाला की नाही, याची प्रकल्प अधिका-यांनी शहानिशा करावी. योजनेमध्ये गैरप्रकार होऊ देऊ नका, गरजवंतांना योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सुक्ष्म नियेाजन करावे.

प्रास्ताविकात प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार म्हणाले, प्रधानमंत्री जनजातीय आदिवासी न्याय महाअभियान अंतर्गत 12360 लाभार्थ्यांना योजनांचा लाभ देण्यात आला आहे. या अभियानात जिल्ह्यातील 167 गावांचा समावेश असून चंद्रपूर प्रकल्प कार्यालय अंतर्गत 115 गावे तर चिमूर प्रकल्प कार्यालयअंतर्गत 52 गावांचा समावेश आहे. आतापर्यंत एकूण 87 गावांमध्ये धरती आबा ग्राम उत्कर्ष अभियानाचे शिबीर घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

उत्कृष्ट कामगिरी करणा-या अधिका-यांचा सन्मान

राज्य शासनाच्या 100 दिवस प्रशासकीय सुधारणा मोहिमेत उत्कृष्ट कार्य करून राज्यात अव्वल स्थान प्राप्त करणारे चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांचा पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सोबतच नागपूर विभागात जिल्ह्यातील 19 शासकीय कार्यालयांनी सर्वोत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल संबंधित अधिका-यांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यात प्रथम क्रमांक प्राप्त करणारे जिल्हा ग्रंथालय अधिकारी रत्नाकर नलावडे, सा.बां. उपअभियंता (मूल) राजेश चव्हाण, उपविभागीय कृषी अधिकारी (नागभीड) प्रफुल गव्हारे, तहसीलदार (नागभीड) प्रताप वाघमारे, तालुका वैद्यकीय अधिकारी (नागभीड) डॉ. विनोद मडावी, पशुधन विकास अधिकारी (वरोरा) डॉ. सतिश अघडते.

द्वितीय क्रमांक प्राप्त करणारे इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सहायक संचालक आशा कवाडे, जिल्हा अधिक्षक भुमी अभिलेख भुषण मोहिते, उपविभागीय अधिकारी (ब्रम्हपूरी) पर्वणी पाटील, महावितरण उपअभियंता (मुल) चंदन चौरसिया, उपजिल्हा रुग्णालय (ब्रम्हपूरी) डॉ. प्रितम खंडाळे, तालुका कृषी अधिकारी (कोरपना) गोविंद ठाकूर, बालसंरक्षण अधिकारी (मूल) आर्यन लोणारे, नगर परिषद मुख्याधिकारी (नागभीड) राहुल कंकाळ यांचा समावेश होता.

०००

भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचे प्रयाण

मुंबई, दि. ६ : भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई येथून विमानाने आज दुपारी २.०० वाजता कोची येथे प्रयाण झाले.

यावेळी  अतिरिक्त मुख्य सचिव व मुख्य राजशिष्टाचार अधिकारी श्रीमती मनीषा म्हैसकर पाटणकर यांनी त्यांना पुष्पगुच्छ दिला. मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती व इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.

०००

महाराष्ट्रधर्म..थांबलाच नाही..साखळी कधी तुटली नाही…!

ज्ञानेश्वरांच्या ओव्यांपासून, शिवरायांच्या तलवारीपर्यंत, महात्मा फुल्यांच्या साहसापासून, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दृष्टीकोनापर्यंत

मुंबई, दि.  : – ‘महाराष्ट्राचा इतिहास गौरवशाली आहे. आणि ती एक जबाबदारी देखील आहे. आपण ज्ञानेश्वरांचे, शिवरायांचे, क्रांतिज्योती सावित्रीबाईंचे आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे थेट वशंज नसलो, तरीही विचारांच्या वारश्याचे वाहक आहोत. या सर्वांनी आपल्या ज्ञानाने, त्यागाने आणि धैर्याने हे राज्य घडविले. त्याला जपणे, वाढवणे आणि पुढे नेणे हे आपले कर्तव्य आहे. महाराष्ट्रधर्म म्हणजे स्मरण रंजन नाही. तो आपला नैतिक मार्गदर्शक. आपण कोण आहोत, हे समजून घेऊन, आपल्याला काय घडवायचे आहे, ते ठरविणे, हाच महाराष्ट्रधर्म आहे,’ अशी मांडणी करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजपासून ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्ट मालिकेचा प्रारंभ केला. ही मुलाखत सुप्रसिद्ध विचारवंत, संत साहित्याचे अभ्यासक – लेखक आणि जगद्गुरू तुकाराम महाराज यांचे वंशज डॉ. सदानंद मोरे यांनी घेतली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2014 ते 19 या आपल्या पहिल्या कार्यकाळात ‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ हा टि.व्ही. शो केला होता. आता नवमाध्यमात लोकप्रिय अशा पॉडकास्टच्या माध्यमातून ते जनसंवाद साधणार आहेत.

पॉडकास्ट मालिकेचा प्रारंभ ‘महाराष्ट्रधर्म : पायाभरणी आणि उभारणी’ या विषयापासून झाला. आषाढी एकादशीच्या शुभमुहूर्तावर सुरू करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्रधर्म’ या विशेष पॉडकास्ट मालिकेचे हे पहिले चरण होते. यात रामायणापासून ते महाभारतापर्यंत, जगाला दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग दाखवणाऱ्या गौतम बुद्धांपासून ते भक्ती संप्रदायाच्या संतांपर्यंत आणि महाराष्ट्राची अध्यात्मिक पायाभरणी आणि उभारणी या विषयांवर मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी अभ्यासपूर्ण मांडणी केली. मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या समाज माध्यमावरून हे पॉडकास्ट करण्यात येत आहे.

या पहिल्याच पॉडकास्टमध्ये सहभागी झालेल्या श्रोत्यांचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी आभार मानले आहेत. तसेच यापुढेही महाराष्ट्राच्या इतिहासात, संस्कृतीमध्ये, साहित्यामध्ये देवभूमी, संतभूमी, वीरभूमी म्हणून विचार आहे. या सर्वांचा धांडोळा घेतानाच, महाराष्ट्र हा महाराष्ट्र का आहे, याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न राहणार असल्याचेही म्हटले आहे.

आजच्या पहिल्याच पॉडकास्टमध्ये मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी महाराष्ट्राची पायाभरणी आणि उभारणीच्या अनुषंगाने मांडणी केली.  ‘महाराष्ट्रधर्म हा धर्म नाही. ती आहे, एक जीवंत मुल्य संहिता. ती सांगते विवेकाने विचार करा. सेवाभावाने वागा, आणि शौर्याने उभे राहा. ज्ञानेश्वरांच्या ओव्यापासून शिवरायांच्या तलवारीपर्यंत फुल्यांच्या साहसापासून, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दृष्टीकोनापर्यंत ही साखळी कधी तुटलीच नाही. ती सतत पुढे सरकत राहिली,’ अशा मांडणीमुळे पॉडकास्टचा प्रारंभ अभ्यासपूर्ण आणि उत्कंठावर्धक झाला. त्याला मोठा प्रतिसादही लाभला.

महाराष्ट्राची कहाणी सुरु होते देवांच्या पावलांनी…

महाराष्ट्राची कहाणी सुरु होते, ते देवांच्या पावलांनी. रामायणात याचा उल्लेख आहे. राम वनवासात होते. त्यावेळी ज्या दंडकारण्याचा उल्लेख येतो. ते दंडकारण्य विदर्भ ते नाशिक-पंचवटी पर्यंत विस्तारले आहे. महाभारतात सुद्धा महाराष्ट्राची भूमी आहे. विदर्भात दमयंतीची गोष्ट घडली. कोकणातील गुहांमध्ये अर्जून धान्यस्थ बसले होते, असे लोककथांमध्ये सांगितले जाते. महाभारतातल्या रमणीय कथेचा भाग घडतो, तोही विदर्भातच. रुक्मिणीचे कौंडीण्यपूर आणि तिथून तिची भगवान श्रीकृष्णांनी केलेली सूटका, त्यासाठीचे युद्ध देखील या विदर्भाच्याच भूमित घडले. पांडव अज्ञातवासात राहीले, ते चिखलदऱ्यात. किचकाची जुलमी राजवट पांडवानी उधळून लावली. सत्याने असत्यावर मिळवलेल्या विजयाची ही रोमहर्षक कहाणी आहे. महाराष्ट्राची भूमी पुराणांमध्येही आहे. भगवान गौतम बुद्ध हे महाराष्ट्राच्या भूमीत शांततेचा संदेशाच्या रुपाने इथे पोहोचले. त्यांचे शब्द संदेश लोकांनी शांतपणे आत्मसात केले. ते शब्द जपले. अजिंठ्याच्या शांत डोंगररांगामध्ये भिक्खुंनी त्यांच्या कथा दगडात कोरल्या. जगाला दुःखातून मुक्त होण्याचा ज्यांनी मार्ग दाखवला त्या भगवान गौतम बुद्धांचे शब्द महाराष्ट्राने फक्त ऐकले नाहीत. त्यांना गुफांमध्ये, स्मृतीमध्ये आणि आत्म्यातही जपले. महाराष्ट्रातील दैवी ऊर्जेमुळे इथे सत्याचा, विश्वाचा शोध घेणारे साधक, संत, विचारवंत इथे आले आणि रमले. शंकराचार्यांनी भारतभर भ्रमण केले. त्यांनी त्यांचे एक महत्वाचे पीठ करवीर पीठाच्या रुपाने स्थापन केले. इथे साक्षात महालक्ष्मीचा निवास आहे. महाराष्ट्र हा उत्तर आणि दक्षिण भारताला जोडणारा दूवा आहे.

पंढरीची वारी चालती-बोलती संस्कृती

इथल्या मातीनेच बोलायला सुरुवात केली, ती संतांच्या रुपाने. तेराव्या शतकात चक्रधर स्वामींनी स्थापन केलेला महानुभव पंथ जाती-पातींना नाकारणारा आहे. त्यांनी साध्या-सोप्या भाषेत शिकवण दिली. नंतरच्या काळात नम्रता आणि श्रद्धा यावर आधारलेली वारीची परंपरा आली. जगात क्वचितच अशी यात्रा असेल. जी सामाजिक समतेचा झरा बनली आहे. संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी दिली. पसायदान ही जागतिक संस्कृतीतील सर्वोत्तम प्रार्थना आहे. निवृत्तीनाथांनी नाथ संप्रदायाची सुरुवात केली. मुक्ताईंच्या ओव्या तर मंत्रमुग्ध करणाऱ्या आहेत. संत नामदेवांच्या विचारांना गुरू ग्रंथसाहिबमध्येही स्थान आहे. पंजाबमध्ये आपण घुमान येथे साहित्य संमेलन घेतले. पंजाबमध्ये संत नामदेव यांच्याविषयी मोठा आदर, भक्तीभाव पाहायला मिळाला. संत एकनाथ, संत चोखोबा, त्यांच्या पत्नी सोयराबाई असे सर्व संत हे केवळ उपदेशक नव्हते, ते भक्तीचे लोकशाहीकरण करणारे, शस्त्र हाती न घेणारे योद्धे होते. आपली वारीची परंपरा ही चालती-बोलती संस्कृती आहे. एक अखंड स्मृती आहे, जी महाराष्ट्राचे आत्मभिमान जपते आहे. हजारो वर्षांपूर्वी परकीय आक्रमणाला न जुमानता, जिझिया कराचा जाच न बाळगता चालत राहीली. वारी न इस्लामी राजवटीत थांबली, न इंग्रजी आक्रमणात. हजारो दिंड्या या वारीत सहभागी होतात. यंदाही या वारीत देश-विदेशातून लोक सहभागी झाले आहेत. यावर्षी काहींनी या वारीत आर्टिफिशियल इंटेलिजन्सचाही वापर सुरु केला आहे. हा पंढरीचा महिमा थक्क करणारा आहे.

..मराठा तलवार यमुनेपर्यंत पोहाेचली

छत्रपती शिवाजी महाराज हे ध्येयाकरिता लढले. ते सत्तेकरिता लढले नाहीत. ते देव-देश आणि धर्माकरिता लढले. या वीर योद्ध्यांची तलवार धर्माच्या मार्गावरच चालणारी होती. त्यांचे युद्ध हे जिंकण्यासाठी नव्हते. ते चरित्र जपण्यासाठी होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य राजवाड्यातील जड-जवाहिरातून नव्हे, तर आईच्या गोष्टींतून साकारले. राजमाता जिजाऊंच्या स्वप्नांनी त्यांचे मन घडवले. छत्रपती शहाजीराजेची स्वराज्य संकल्पना त्यांनी साकारली. त्यांचा राज्यकारभार नैतिकतेवर आधारलेला होता. सर्व धर्मांबद्दल आदर, मंदिर-मशिद तोडण्यास बंदी, स्त्रियांचा हे सगळे त्याकाळाच्या पुढे होते. जगात असा राजा कुठे झालेला नाही. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज यांनीही कवी, योद्धा आणि विद्वान म्हणून स्वराज्य आणि धर्माचे रक्षण केले. प्रसंगी त्यासाठी बलिदान दिले. त्यानंतर थोरले बाजीराव पेशवे यांनीही असाच पराक्रम गाजवला. त्यांना घोड्यावरून येणारे वादळ म्हटले जायचे. आयुष्यात ते एकही लढाई हरले नाहीत. बाजीराव हे छत्रपतींचे सेनापती नव्हते, ते संस्कृतीचे द्रष्टे शिल्पकार होते. त्यानंतर योद्धे म्हणून महादजी शिंदे यांनी राखेतून मराठी साम्राज्य उभे केले. त्यांनी दिल्ली पुन्हा मराठ्यांच्या हातात दिली. शिंदे, होळकर, भोसले या मराठी माणसांनी संपूर्ण भारताचा कारभार हाती घेतला. ब्रिटीश, अफगाणांशी मुत्सद्दीपणे त्यांनी वाटाघाटी केल्या. मराठी अस्मिता जपली. राजकारणात मुत्सद्देगिरी जपली, त्याचे अधिष्ठान होते, संस्कृतीचा अभिमान. त्यांच्यामुळेच मराठा तलवार यमुनेपर्यंत पोहचली, आणि भारताच्या केंद्रस्थानी मराठा साम्राज्य पुन्हा प्रस्थापित झाले.

धैर्यशाली नारिशक्ती..

इथल्या धैर्यशाली स्त्रियांनाही विसरून चालणार नाही. जेव्हा साम्राज्य संकटात होते, त्यावेळी राजाराम महाराजांच्या पत्नी ताराबाईं तलवार घेऊन उभ्या राहिल्या. त्यांनी औरंगजेबाला वर्षानुवर्षे थोपवून धरले. संताजी जाधव-धनाजी घोरपडेंच्या काळात इथे गवतालाही पाते फुटले. पहिल्या सेनापती उमाबाई दाभाडे यांनी नेतृत्व केले. रणनिती आखली. त्याकाळात स्त्रियांना बोलण्याची संधी नसायची, अशा काळात पुण्यश्लोक अहिल्यादेवी या भारतीय संस्कृतीतील नारीशक्तीच्या प्रतिक ठरल्या.

महाराष्ट्र धर्म..थांबलाच नाही..साखळी कधी तुटलीच नाही…!

महाराष्ट्राने केवळ योद्धे निर्माण केले नाहीत, तर त्यांनी घडवले धर्माचे रक्षक, राष्ट्राच्या संकल्पनेचे उद्गाते आणि नव्या भारताचे शिल्पकार. महाराष्ट्र धर्म कधी थांबलाच नाही. पण तो बदलत गेला. काळानुसार त्यांनी स्वरूप बदलले पण आत्मा कधीच बदलला नाही. महात्मा जोतिबा फुले यांनी जात, पितृसत्ता आणि अंधश्रद्धा यांना थेट आव्हान दिले. धर्माच्या नावाने होणाऱ्या विषमतेला उघडपणे विरोध केला. त्यांच्या पत्नी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्री-शिक्षणासाठी सोसलेल्या धैर्याची परिभाषाच घालून दिली. लोकमान्य टिळक यांनी महाराष्ट्राला राजकीय गर्जना दिली. त्यांनी गणेशोत्सव, वृत्तपत्रे या मार्गानी त्यांनी परंपरेलाच प्रतिकारचे हत्यार बनविले. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मिळवणारच ही केवळ घोषणा नव्हती, ती होती एक जनचळवळ. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विरोध, अपमान, भेदभाव यावर बुद्धी आणि अभ्यासाने विजय मिळविला. कोलंबियामधून शिक्षण घेऊन आलेले डॉ. बाबासाहेब भारताच्या संविधानाचे शिल्पकार झाले. महाड सत्याग्रह, शिक्षणाचा आग्रह आणि जात व्यवस्थेच्या निर्मुलनाचा निर्धार हे सगळे संघर्ष नव्हते, तर नव्या भारताचे नैतिक बांधणी. याच मालिकेत पंडिता रमाबाईंनी विधवा महिलांकरिता शिक्षण आणि अधिकारांची चळवळ उभी केली. गोपाळ गणेश आगरकर यांनी रुढी आणि कर्मकांड यांना थेट प्रश्न विचारले. संत गाडगेबाबा सामाजिक स्वच्छता आणि अंतःकरणातील शुद्धतेचे सुंदर नाते जगासमोर आणले. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकरिता वसतीगृह, शाळा उभ्या केल्या. शिक्षणाच्या माध्यमातून समाजाला उभे केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीतेच्या माध्यमातून ग्रामीण भागातल्या महाराष्ट्राला जीवन शिकवले. म्हणूनच महाराष्ट्रधर्म हा धर्म नाही. ती आहे, एक जीवंत मुल्य संहिता. ती सांगते विवेकाने विचार करा.सेवाभावाने वागा, आणि शौर्याने उभे राहा. ज्ञानेश्वरांच्या ओव्यापासून शिवरायांच्या तलवारीपर्यंत फुल्यांच्या साहसापासून, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दृष्टीकोनापर्यंत ही साखळी कधी तुटलीच नाही. ती सतत पुढे सरकत राहीली.

रिद्धपूर हे चक्रधर स्वामींच्या गुरूंचे गोविंदप्रभूंचे क्षेत्र. महाराष्ट्र शासनाने येथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापन केले आहे. याच रिद्धपूरमध्ये मराठी भाषेतील अनेक ग्रंथ तयार झाले. काही दिवसांपूर्वी या विद्यापीठाने आपले कामकाज देखील सुरु केले आहे, अशी माहितीही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिली.

000

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून विद्यार्थ्यांच्या ‘एआय’ प्रकल्पांचे कौतुक

पंढरपूर दि. ६  : पंढरपूर येथील अरिहंत पब्लिक स्कूलतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘टेक वारी’ या आगळ्या-वेगळ्या उपक्रमाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच व्हिडिओ कॉलद्वारे केले.

आषाढी एकादशीनिमित्त शहरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असताना, अरिहंत शाळेने कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या साहाय्याने एक अभिनव पाऊल उचलले आहे. विद्यार्थ्यांनी तयार केलेले तंत्रज्ञानाधारित प्रकल्प ‘टेक वारी’ या नावाने सादर करण्यात आले.

यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत त्यांच्याकडून प्रकल्पांची माहिती घेतली. विद्यार्थ्यांनी एआय वापरून तयार केलेल्या उपकरणांचा वापर दैनंदिन जीवनात आणि विशेषतः पंढरपुरात येणाऱ्या वारकऱ्यांसाठी कसा करता येईल, यावरही चर्चा झाली.

स्वयंचलित वर्ग, खोल्या स्मार्ट हजेरी, ऊर्जा कार्यक्षम यंत्रणा वगैरे प्रकल्पांचे उपमुख्यमंत्र्यांनी कौतुक केलं.  यासंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे विशेष कार्य अधिकारी मंगेश चिवटे यांना हे प्रकल्प ग्रामीण भागातील शाळांमध्ये कसे राबवता येतील या संदर्भात अभ्यास करण्याच्या सूचना दिल्या.

यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी होते. यावेळी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षक आणि प्रकल्पात सहभाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.

“गिरगावच्या शाळेतील शिक्षकांमुळे मी घडलो” – सरन्यायाधीश भूषण गवई यांची शिक्षकांविषयी कृतज्ञता

मुंबई, दि. 6: देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी आज गिरगाव येथील चिकित्सक समूह शिरोळकर विद्यालयाला भेट देत आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. प्राथमिक ते माध्यमिक शिक्षण घेतलेल्या या विद्यालयात पुन्हा पाऊल ठेवतांना सरन्यायाधीश श्री. गवई यांनी आपली जडणघडण करणाऱ्या शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.

याप्रसंगी कौशल्य विकास मंत्री व मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती माधव जमादार, चिकित्सक समूहाचे अध्यक्ष किशोर रांगणेकर, सचिव डॉ. गुरूनाथ पंडित, मुख्याध्यापिका संचिता गावडे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

या विशेष प्रसंगी बोलताना सरन्यायाधीश श्री. गवई म्हणाले, आज मी ज्या उंचीवर पोहोचलो आहे, त्यामागे माझ्या शिक्षकांचे आणि शाळेचे फार मोठे योगदान आहे. याच शाळेतील शिक्षण आणि संस्कारामुळे माझ्या आयुष्याला योग्य दिशा मिळाली. माझ्या वक्तृत्वाची सुरुवातीची पावलं याच व्यासपीठावर पडली असल्याची आठवण सांगत, वक्तृत्व स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रमांमधून मला आत्मविश्वास मिळाला. त्या संधींमुळेच मी घडलो, असेही नमूद केले. मी स्वतः मराठी माध्यमातून शिकलेला विद्यार्थी आहे. मातृभाषेतून शिक्षण घेतल्यामुळे विषयांची समज अधिक पक्की होते. शिक्षणासोबतच संस्कारही रुजतात, हेच संस्कार आयुष्यभर साथ देतात, असा आत्मविश्वासही त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला.

शाळेतील वर्गखोल्या, वाचनालय, चित्रकला विभाग आदींची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच शालेय जीवनात त्यांच्या सोबत शिकलेल्या मित्रांशी गप्पा मारत जुन्या आठवणींना उजाळा दिला. तसेच शाळेतील विद्यार्थ्यांनी दिलेली मानवंदना हा त्यांच्या दृष्टीने अत्यंत भावनिक आणि अभिमानाचा क्षण ठरला. सरन्यायाधीश भूषण गवई यांची उपस्थिती शाळेसाठी अत्यंत गौरवाची व प्रेरणादायी ठरली.

०००

बा विठ्ठला… बळीराजाला सुखी व समाधानी ठेव, राज्यावरील संकटे दूर कर, सर्वांनाच सन्मार्गाने जगण्याची सुबुद्धी दे – मुख्यमंत्र्यांचे विठ्ठल चरणी साकडे

पंढरपूर, दि. ६- पांडुरंगाने राज्यावरची संकटे दूर करण्याची शक्ती द्यावी, सन्मार्गाने चालण्याची सुबुद्धी द्यावी, बळीराजाला सुखी समाधानी करण्याकरिता आशीर्वाद द्यावा, असे साकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घातले.

आषाढी शुद्ध एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री फडणवीस यांनी सपत्नीक तसेच मानाचे वारकरी श्री कैलास दामु उगले, सौ. कल्पना कैलास उगले यांच्या समवेत केली. त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने मुख्यमंत्री महोदय यांच्या सत्कार प्रसंगी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, सौ. अमृता फडणवीस, आमदार समाधान आवताडे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार बाबासाहेब देशमुख, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार संजय सावकारे, आमदार देवेंद्र कोठे, आमदार अभिजीत पाटील, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्यासह समितीचे सर्व सदस्य व अन्य मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, वारीची परंपरा सातत्याने वाढत आहे आणि यावर्षी तर वारीने एक नवीन विक्रम केलेला आहे.  इतक्या मोठ्या प्रमाणात वारकरी या वारीमध्ये चालत पांडुरंगाच्या दर्शनाकरीता या ठिकाणी आले. ज्या दिंड्या आहेत त्या सोबत तर वारकरी आलेच परंतु पायी चालत ही मोठ्या प्रमाणात वारकरी आले. विशेषत: या वारकऱ्यांमध्ये तरुणांची संख्या मोठी आहे. शासन व प्रशासनाने वारकऱ्यांना चांगल्या सुविधा दिल्या आहेत. पालकमंत्री गोरे यांच्या नेतृत्वात प्रशासनाने चांगले जर्मन हँगर तयार केल्याने वारकऱ्यांसाठी चांगली व्यवस्था झाली, असे त्यांनी सांगितले.

आषाढी एकादशीच्या निमित्ताने पांडुरंगाची पूजा करायला मिळणे हा सर्वांच्या जीवनातला आनंदाचा क्षण आहे. दिंड्या सोबत अनेक वारकरी स्वयंप्रेरणेने पायी चालत आले. वारीत प्रत्येक व्यक्ती इतरांमध्ये पांडुरंग पाहतो, ही प्रथा जगाच्या पाठीवर कुठेही नाही. वारीत हरीनाम गजर करतांना नवी ऊर्जा मिळते. वारीने खऱ्या अर्थाने  भागवत धर्माची पताका उंचावत ठेवली आहे. ही आपली संस्कृती अलौकिक आहे असे सांगून मानाच्या वारकऱ्यांना पांडुरंगाचा आशीर्वाद मिळत राहो, अशी सदिच्छा श्री. फडणवीस यांनी व्यक्त केली.

निर्मल वारीच्या माध्यमातून अतिशय चांगला आवश्यक व्यवस्था उपलब्ध केल्याने कुठेही अस्वच्छता पाहायला मिळाली नाही आणि निर्मल वारी सोबत हरित, पर्यावरण पूरक वारीदेखील झाली. खऱ्या अर्थाने आपल्या संतांनी जो स्वच्छतेचा संदेश दिलेला आहे तो या वारीमध्ये  प्रत्यक्ष अनुभवायला मिळाला.  राज्याच्या गतीमध्ये अध्यात्मिक प्रगती महत्त्वाची असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

यावेळी पालकमंत्र्यांनी आणि जिल्हा प्रशासनाने व्हीआयपी दर्शन बंद करण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे सर्वसामान्य भाविकांचा श्री विठ्ठल दर्शनाचा कालावधी पाच तासाने कमी झाल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

प्रारंभी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी प्रस्तावित केले. यामध्ये यावर्षीच्या आषाढी वारीमध्ये शासन व जिल्हा प्रशासनाने वारकऱ्यांसाठी खूप चांगल्या सुविधा दिल्यामुळे वारकरी वर्ग समाधानी असून वारकऱ्यांची संख्या वाढली आहे व त्यावर योग्य नियंत्रण ठेवले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

शासकीय महापूजेचे मानाचे वारकरी मु.पो. जातेगांव ता. नांदगांव जि. नाशिक येथील कैलास उगले आणि कल्पना उगले या वारकरी दाम्पत्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या सुविद्य पत्नी अमृता फडवणीस यांच्या हस्ते महापुजेनंतर यथोचित सन्मान करण्यात आला. तसेच एसटी महामंडळाकडून त्यांना मोफत वर्षभर एसटी पास मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते वितरित करण्यात आला.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्री विठ्ठल निर्मल दिंडी पुरस्कार वितरण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पायी स्वच्छता आणि सामाजिक विषयांवर प्रबोधन करणाऱ्या दिंड्यांचा ‘श्री विठ्ठल निर्मल दिंडी’ पुरस्काराने सन्मान करण्यात आला. प्रथम क्रमांक – श्री संत रोहिदास दिंडी क्रमांक १३, जगदगुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा. द्वितीय क्रमांक – श्री बाळकृष्णबुवा वारकरी दिंडी क्रमांक १९, श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा. तृतीय क्रमांक – श्री गुरु बाळासाहेब आजरेकर दिंडी क्रमांक २३, श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा.

000

ताज्या बातम्या

विधानसभा प्रश्नोत्तरे

0
पीएमजीपी इमारतींच्या पुनर्विकासाबाबत एक महिन्याच्या आत बैठक - मंत्री शंभूराज देसाई मुंबई, दि. ७: पीएमजीपी (प्रधानमंत्री गृह प्रकल्प) योजनेतील इमारतींच्या पुनर्विकासाबाबत येत्या एक महिन्याच्या आत...

विधानपरिषद प्रश्नोत्तरे

0
बांधकामापूर्वी रक्कम अदा केल्याप्रकरणी शाखा अभियंता आणि  कार्यकारी अभियंत्याचे निलंबन - ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे मुंबई, दि. ७ : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मौजे लासूर येथील...

पंढरपूरची वारी जगातील अद्भुत परंपरा – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

0
मुंबई, दि.७ :  राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आषाढी एकादशी निमित्त चेंबूर येथील श्री शृंगेरी शंकर मठ शारदा मंदिराला भेट देऊन मंदिरातर्फे रविवारी (दि. 6...

आता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोफत जेईई – सीईटीची कोचिंग

0
चंद्रपूर, दि. 6 : ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाखाणण्याजोगी असते. मात्र आर्थिक परिस्थितीमुळे किंवा संधी उपलब्ध न झाल्यामुळे असे विद्यार्थी स्पर्धेच्या युगात मागे...

पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्याकडून आदिवासी विकास विभागाचा आढावा

0
चंद्रपूर, दि. 6 : पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी शनिवारी, जिल्ह्यातील आदिवासी विकास विभागाचा आढावा घेतला. तसेच राज्य शासनाने सुरू केलेल्या 100 दिवस प्रशासकीय...