सोमवार, एप्रिल 28, 2025
Home Blog Page 2

पारदर्शक, गतिमान व कालबद्ध सेवेसाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम

राज्यातील नागरिकांना दिल्या जाणा-या सेवा पारदर्शक, गतिमान व कालबध्द पध्दतीने देण्याकरीता महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ पारित करण्यात आला आहे.  हा अधिनियम २८ एप्रिल, २०१५ रोजी अंमलात आला आहे. त्यानुषंगाने राज्यामध्ये २८ एप्रिल हा दिवस सेवा हक्क दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिनाच्या अनुषंगाने हा विशेष लेख…

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ हा एक क्रांतीकारी कायदा असून त्यामध्ये अनेक वैशिष्ठ्ये आहेत जी इतर राज्यांच्या तद्अनुषंगिक कायद्यांपेक्षा वेगळी आहेत. लोकसेवा वितरित करताना विविध बाबी साध्य करण्याचा या कायद्याचा उद्देश आहे.  पारदर्शकता, उत्तरदायित्व, कालबध्दता, कार्यक्षमता, डिजिटल मंचाचा उपयोग करुन लोकसेवा वितरणामध्ये सक्षमता व पारदर्शकतेच्या संस्कृतीस चालना देण्यावर या कायद्याचा भर आहे. नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सार्वजनिक सेवांचा दर्जा उंचावणे व त्या विहित कालावधीत व जबाबदारीपुर्वक पुरविल्या जातील याची खात्री करणे हे या कायद्याचे प्राथमिक उद्दिष्ट आहे. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ च्या कलम ३ नुसार, प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरण या अधिनियमाच्या प्रारंभाच्या दिनांकापासून तीन महिन्यांच्या कालावधीच्या आत आणि त्यानंतर वेळोवेळी ते पुरवीत असलेल्या लोकसेवा, पदनिर्देशित अधिकारी,  प्रथम अपीलिय प्राधिकारी आणि द्वितीय अपीलीय प्राधिकारी यांचा तपशिल आणि नियत कालमर्यादा या अधिनियमाखाली अधिसूचित करील.  प्रत्येक पात्र व्यक्तीस (कायदेशीर, तांत्रिक, आर्थिक व्यवहार्यतेच्या अधीन राहून) या अधिनियमानुसार राज्यातील लोकसेवा नियत कालमर्यादेच्या आत प्राप्त करण्याचा हक्क असेल.

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ नुसार कोणतीही अधिसूचित लोकसेवा मिळविण्यासाठी कोणत्याही पात्र व्यक्तीस पदनिर्देशित अधिका-याकडे अर्ज करता येईल. असा अर्ज निकाली काढण्यासाठी नियत केलेल्या कालमर्यादेसह अर्ज मिळाल्याचा दिनांक एका विशिष्ट अर्ज क्रमांकासह अर्जदारास देण्यात येईल. प्रत्येक अर्जदार त्याला प्रदान केलेल्या विशिष्ट अर्ज क्रमांकासह त्याच्या ऑनलाइन अर्जाच्या स्थितीची पाहणी करू शकतो. या अधिनियमानुसार कोणतीही पात्र व्यक्ती ज्याचा अर्ज फेटाळला गेला आहे किंवा ज्याला नियत कालमर्यादेच्या आत लोकसेवा प्रदान केली गेली नसेल अशी कोणतीही पात्र व्यक्ती, अर्ज फेटाळल्याचा आदेश मिळाल्याच्या किंवा नियत कालमर्यादा समाप्त झाल्याच्या दिनांकापासून तीस दिवसांच्या कालावधीच्या आत प्रथम अपीलीय प्राधिकाऱ्याकडे अपील दाखल करू शकते.

प्रथम अपीलीय प्राधिकारी, आपल्या आदेशात पात्र व्यक्तीला सेवा देण्यासाठी पदनिर्देशित अधिका-याला निर्देश देऊ शकतात किंवा त्यास अपील दाखल केल्याच्या दिनांकापासून तीस दिवसांच्या कालावधीच्या आत अपील फेटाळण्याची कारणे लेखी नमूद करून अपील फेटाळू शकतात. प्रथम अपीलीय प्राधिका-याच्या आदेशाविरुद्ध अर्जदार प्रथम अपील प्राधिकाऱ्याचा आदेश प्राप्त झाल्यापासून तीस दिवसांच्या कालावधीत द्वितीय अपीलीय प्राधिकाऱ्यांकडे द्वितीय अपिल दाखल करू शकतो. पदनिर्देशित अधिकारी पुरेशा आणि वाजवी कारणाशिवाय लोकसेवा प्रदान करण्यात अयशस्वी झाल्यास  ५०० पेक्षा कमी नसेल परंतु ५ हजार  रूपयांपर्यंत असू शकेल एवढी शास्ती संबंधित पदनिर्देशित अधिकाऱ्यावर लादली जाऊ शकते.

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ अंतर्गत शासनाच्या अधिसूचित सेवा कालमर्यादेत मिळाव्या यासाठीआपले सरकार पोर्टल सेवेत आहे. यानुषंगाने https//:aaplesarkar.mahaonline.gov.in हे संकेतस्थळ उपलब्ध आहे.

०००००

– माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, नागपूर

 

महाराष्ट्रातील जनतेचा तसेच प्रशासनाचा ‘सेवा हक्क दिन’

महाराष्ट्र शासनाने दिनांक १ एप्रिल २०२५ रोजी ‘२८ एप्रिल’ हा दिवस महाराष्ट्र राज्याच्या जनतेसाठी तसेच सर्व शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी सेवा हक्क दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. १० वर्षांपूर्वी म्हणजे दिनांक २८ एप्रिल २०१५ रोजी महाराष्ट्र शासनाने विशेष करुन तत्कालीन मा.मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणविस यांनी पुढाकार घेऊन महाराष्ट्रातील जनतेला  नियत कालमर्यादेच्या आत लोकसेवा प्राप्त करण्याचा हक्क देणारा ‘महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५’ अंमलात आणला आहे. या  अधिनियमातील कलम ४ अन्वये महाराष्ट्र शासनाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर अशा नियत कालमर्यादेतच जनतेला लोकसेवा देण्याची जबाबदारी दिली आहे आणि त्यासाठी आवश्यक असणारे त्याचे उत्तरदायित्व निश्चित केले आहे. हा कायदा प्रशासकीय अधिकाऱ्यांना कर्तव्य भावनेतून जनतेची सेवा करण्यासाठी प्रेरीत करत आहे. या कायद्याने नव्याने निर्मित केलेल्या राज्य सेवा हक्क आयोगाने आपले ब्रीदवाक्य “आपली सेवा आमचे कर्तव्य ” असे निर्धारित केलेले आहे.

शासनाने आयोगाच्या शिफारशी नुसार आयोगाने निर्धारीत केलेले बोधचिन्ह व ब्रीदवाक्य हे नागरीकांना दिल्या जाणाऱ्या सर्व अधिसूचित सेवांच्या प्रमाणपत्रांवर मुद्रित केले जात आहे. हे बोधचिन्ह आणि ब्रीदवाक्य शासकीय विभागांकडून त्यांच्या अधिकाऱ्यांचा व कर्मचाऱ्यांचा सेवाभाव हेच कर्तव्य ही कर्मयोगाची भावना उर्धृत तर करतेच शिवाय ती त्यांनी अवलंबलेली पारदर्शकता, संवेदनशिलता व कार्यक्षम समयोचितता अशा सर्वेात्तम गुणवत्तेची ग्वाही सुध्दा देत आहे.

सेवा हक्क अधिनियमाची जडणघडण

महाराष्ट्र शासनाने सन २००५ मध्येच दफ्तर विलंबास प्रतिबंध अधिनियम २००५ अंमलात आणला. या कायद्यांतर्गत सुध्दा सर्व विभागांबाबत ते जनतेला देत असलेल्या सर्व लोकसेवांची नागरिकांची सनद त्यांच्या कार्यालयाच्या बाहेर फलकाच्या स्वरुपात दर्शनी भागात प्रदर्शित करतील असे प्राविधान आहे.  या नागरीकांच्या सनदेमध्ये लोकसेवा देणा-या अधिका-यांचे पदनाम लोकसेवा देण्यासाठी विहित केलेला कमाल कालावधी तसेच अशा लोकसेवा देणाऱ्या पदनिर्देशित अधिकारी यांचेकडून विलंब झाल्यास किंवा सेवा नाकारल्यास अपील करावयाच्या अधिका-यांचे म्हणजेच प्रथम अपीलीय प्राधिकारी यांचे पदनाम (त्याच विभागाचे गट-ब चे राजपत्रित अधिकारी) तसेच जर प्रथम अपीलामध्ये अपीलार्थिचे समाधान झाले नाही तर द्वितीय अपीलीय प्राधिका-याचे पदनाम (त्याच विभागाचे गट-अ चे राजपत्रित अधिकारी)   दर्शविण्यात यावे असे प्राविधान आहे.  परंतु विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी स्वत: पुढाकार घेऊन या दफतर विलंबास प्रतिबंध अधिनियम या कायद्याचा परिणाम होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर दिनांक २८ एप्रिल, २०१५ रोजी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ हा कायदा अंमलात आणला.

‘महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५’ कायद्याच्या कलम ५(२) नुसार पदनिर्देशित अधिकारी अर्ज मिळाल्यावर नियत कालमर्यादेत एकतर थेट लोकसेवा देईल किंवा ती सेवा मंजूर करील किंवा फेटाळण्याची कारणे लेखी नमूद करुन अर्ज फेटाळील. पदनिर्देशित अधिकारी, अर्जदाराला त्याच्या आदेशाविरुध्द अपील करण्याचा कालावधी आणि ज्याच्याकडे पहिले अपील दाखल करता येईल त्या प्रथम अपील प्राधिका-याचे नाव व पदनाम त्या कार्यालयीन पत्यासह लेखी कळविल अशी जबाबदारी पदनिर्देशित अधिकाऱ्यावर  निश्चित केलेली आहे. तसेच कलम १० नुसार, या कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये पदनिर्देशित अधिकारी व प्रथम अपिलीय प्राधिकारी यांनी कसूर केल्यास ५०० रुपयांपेक्षा कमी नसेल परंतू ५ हजार रुपयां पर्यंत असू शकेल एवढ्या शास्ती चे प्राविधान आहे.

महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोग

या कायद्याने या कायद्यातील सेवा हक्क प्राविधानांच्या अंमलबजावणीचे सनियंत्रण करण्यासाठी एक निष्पक्ष,स्वतंत्र आयोगाची निर्मिती केली गेली.   हा आयोग मुख्य आयुक्त तसेच सहा महसूल विभागांसाठी प्रत्येकी एक आयुक्त यांचा बनलेला आहे. सदर आयुक्तांची नियुक्ती ही  सेवानिवृत्त असलेल्या शासन किंवा सार्वजनिक प्राधिकरण यातील प्रशासनाचे व्यापक ज्ञान व अनुभव असलेल्या सार्वजनिक जीवनातील प्रख्यात अशा व्यक्तींमधून केली जाते. या अधिनियमाच्या कलम १६ अनुसार या कायद्याची अंमलबजावणीची सुनिश्चिती करणे व अधिक चांगल्या रितीने लोकसेवा देण्याची सुनिश्चिती करण्यासाठी राज्य शासनाला सूचना करणे हे आयोगाचे कर्तव्यच असल्याचे नमूद केले आहे.  लोकसेवा देण्याच्या कार्यपध्दतीमुळे ज्यामुळे लोकसेवा देण्यामध्ये अधिकाधिक पारदर्शकता व सुलभता येईल असे बदल करण्याची शिफारस करणे तसेच लोकसेवा कार्यक्षमपणे देण्यासाठी सार्वजनिक प्राधिकरणांनी करावयाच्या उपाययोजनांसाठी शिफारस करणे अशा सर्व उपाययोजनां द्वारे आयोगाला सार्वजनिक प्राधिकरणांच्या लोकसेवा देण्याबाबत कामगिरीचे सनियंत्रण करणे असे अधिकार दिलेले आहेत.

आपले सरकार पोर्टल व मोबाईल ॲप

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ चे कलम २०(२) मध्ये पात्र व्यक्तींच्या अपेक्षांच्या प्रती पदनिर्देशित अधिका-यांना संवेदनशिल करणे आणि नियत कालमर्यादेत पात्र व्यक्तींना लोकसेवा देण्यासाठी माहिती व तंत्रज्ञानाचा वापर करणे हे या कायद्याचे प्रयोजन व उद्दिष्ट असल्याचे नमूद केले आहे. याच कलमाचा अवलंब करुन महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांनी आपण देत असलेल्या जास्तीत जास्त सेवा या त्यांच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर देण्याचे अवलंबिले आहे. अशा सर्व विभागांच्या सर्व ऑनलाईन सेवा दिनांक २८ एप्रिल, २०२५पर्यंत ३३ विभागांच्या अधिसूचित करण्यात आलेल्या एकूण १०२७ सेवांपैकी ५८३ सेवा आपले सरकार पोर्टल व मोबाईल ॲपद्वारे ऑनलाईन देण्यात येत आहेत. अधिसूचित केलेल्या सेवांमध्ये नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील आवश्यक सेवा उदा.जन्म/मृत्यू प्रमाणपत्र,उत्पन्न दाखला,वाहन परवाना, जात प्रमाणपत्र, मृद व जल नमुना तपासणी, बियाणे नमुना चाचणी,किटकनाशके नमुना चाचणी, जेष्ठ नागरिक प्रमाणपत्र,शेतकरी दाखला, वय राष्ट्रीयत्व व अधिवास प्रमाणपत्र, अपंगत्व प्रमाणपत्र,रेशनकार्ड,ध्वनिक्षेपण परवाना, सभा-मिरवणूकांची परवानगी, विवाह नोंदणी प्रमाणपत्र,नमुना ८ अ चा उतारा देणे इ. लोकोपयोगी सेवा समाविष्ट आहेत.

सध्या प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये उपलब्ध असलेल्‍या आपले सरकार सेवा केंद्रामार्फत त्यांच्या विभागाच्या फक्त ७ अधिसूचित सेवांसाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे. परंतु दिनांक २८ जानेवारी, २०२५ च्या शासन निर्णयाद्वारे आता या ग्रामपंचायतीतील केंद्रांना, महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या ऑनलाईन सेवेचे लॉगीन क्रेडेन्शियल्स देऊन त्यांच्या मार्फत सर्व विभागांच्या सर्व ऑनलाईन सेवांना अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.  यामुळे ग्रामिणांना हव्या असलेल्या कोणत्याही सेवेसाठी कोणत्याही विभागाच्या जिल्हास्तरीय वा तालुकास्तरीय कार्यालयात स्वत: जाऊन आपल्या अर्जाचा पाठपुरावा करण्याची आवश्यकता उरली नाही.

तसेच दिनांक २७ मार्च, २०२५ रोजी माहिती व तंत्रज्ञान विभागाचे सन्मा.मंत्री महोदय यांनी घोषणा केल्याप्रमाणे १०० रुपये अतिरिक्त शुल्क भरुन नागरीकांना त्यांच्या मागणीनुसार आपले सरकार सेवा केंद्र चालकाद्वारे त्यांच्या घरी जाऊन त्यांचा अर्ज त्यांच्या समक्ष ऑनलाईन भरण्याची तसेच सेवा मंजूर झाल्यानंतर त्या सेवेचे प्रमाणपत्र / मंजूरी आदेश त्यांच्या घरी वितरीत करण्याची “सेवादूत योजना “सुरु केली आहे.

२८ एप्रिल ‘सेवा हक्क दिन’ महोत्सव

शासनाच्या महसूल विभागाकडून १ ऑगस्ट हा दिवस महसूल दिन म्हणून साजरा करण्यात येतो, तसेच एप्रिल महिन्यामध्ये २१ एप्रिल रोजी नागरी सेवा दिन तर २४ एप्रिल हा राष्ट्रीय पंचायतराज दिन म्हणून साजरा केला जातो परंतु या सर्व विभागांच्या विविध दिनांचा परिपाक म्हणजे २८ एप्रिल सेवा हक्क दिवस हा आहे. हा सेवा हक्क दिन महाराष्ट्र शासनाच्या प्रत्येक कार्यालयाकडून त्यांनी या वर्षभरात जनतेला दिलेल्या सेवांचा तसेच त्यांच्या सेवा हक्कांच्या अंमलबजावणीच्या कार्यवाहीचा वार्षीक लेखाजोखा त्यांच्या लाभार्थिाना बोलावून किंवा जनतेच्या लोकप्रतिनिधींना बोलावून साजरा करायचा आहे. या दिवशी सर्व जिल्हा मुख्यालयांमध्ये सर्व जिल्हाधिकारी आपल्या जिल्हयाचे पालकमंत्री, खासदार, आमदार यांना विशेष आमंत्रित करुन तसेच सर्व जिल्हयांच्या विविध विभागांच्या अधिका-यांना बोलावून समारंभपूर्वक सर्व विभागांच्या विगत वर्षाच्या कामाचा आढावा घेतील.तसेच उपस्थित सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारीही या दिवशी त्यांच्या सेवानिष्ठेची,सचोटीची, सौजन्यतेची कटिबध्दता अधोरेखीत करणारी त्यांना नेमून दिलेली सेवा हक्क शपथ सुद्धा घेतील.

तसेच या महोत्सवी कार्यक्रमात ज्या अधिकारी /कर्मचा-यांनी या अधिनियमाच्या अनुसार सचोटीने व १००% प्रकरणांमध्ये नियत कालावधीत जनतेला अधिसूचित सेवा दिल्या असतील त्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांचा विशेष प्रशस्तीपत्र देऊन मा. पालकमंत्री यांच्या हस्ते सन्मान करण्यात येईल. तसेच या दिवशी महाराष्ट्र शासनातर्फे मा. पालकमंत्री हे जनतेला तसेच शासकीय अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील.

महाराष्ट्र शासनाने आपले सरकार सेवा पोर्टल हे पात्र व्यक्तींसाठी बहुतांश विभागांच्या कोणत्याही अधिसूचित लोकसेवेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी संयोजित व्यासपीठ आहे.  http://aaplesarkar:mahaonline.gov.in आजवर ०१,०७,५१,००० नागरीकांनी या संकेतस्थळावर नोंदणी करुन सेवा घेतली आहे.  याखेरीज आरटीएस महाराष्ट्र हे मोबाईल ॲप प्ले स्टोअर / ॲपल स्टोअर वर विनामूल्य उपलब्ध आहे.  अर्जदार मराठी किंवा इंग्रजी पर्याय निवडू शकतो.  पात्र व्यक्ती स्वत: अर्ज करु शकत नसल्यास महाराष्ट्रातील सर्व जिल्हयामध्ये कार्यान्वित असलेल्या ३९७८३ आपले सरकार सेवा केंद्रांद्वारेही अर्ज करुन सेवा घेता येते.  ही केंद्रे खासगी केंद्रचालक चालवितात व  त्यांच्यावर त्यांच्या निवडीपासूनच जिल्हाधिकाऱ्यांचे नियंत्रण असते.  काही विभागांची स्वतंत्र पोर्टल्स आहेत उदा. महसूल विभागाचे महाभूलेख, परिवहन विभागाचे वाहन, सारथी इ.

हा अधिनियम लागू झाल्यापासुन १७ एप्रिल, २०२५ पर्यंत ऑनलाईन सेवांसाठी १८,७६,५२,११३ अर्ज प्राप्त झाले त्यांच्या निपटा-याचे प्रमाण ९४.१५% आहे. सन २०२४-२५मध्ये एकूण ०२,७७,२८,०११  सेवा अर्ज प्राप्त झाले असून निपटाऱ्याचे प्रमाण ९२.३३% आहे.  अनेक अर्ज ऑफलाईन स्वरुपातही येतात.  मात्र आयोगाने अनेक प्रयत्न करुन सुध्दा ऑफलाईन प्राप्त झालेल्या व निपटारा केलेल्या अर्जांची आकडेवारी संबंधित विभागांकडून उपलब्ध झालेली नाही.  तथापि ही संख्या जवळपास  ऑनलाईन आकडेवारीच असल्याचा अंदाज आहे.

मा.मुख्यमंत्री महोदयांनी अशा ऑफलाईन सेवा देण्याच्या प्रवृत्तींना आळा बसविण्यासाठी सर्व विभागांच्या सर्व सचिवांची विशेष बैठक घेऊन पुढील ३१ मे २०२५ पर्यंत सर्व विभागांच्या सर्व सेवा या आपले सरकार पोर्टलवर उपलब्ध करुन द्याव्यात तसे च उर्वरित ३०६ अधिसूचित सेवा ज्या सध्या ऑफलाईन आहेत त्या ऑनलाईन उपलब्ध करुन आपले सरकार या एकल पोर्टलवर संलग्न करुन १५ ऑगस्ट,२०२५ पर्यंत नागरीकांना उपलबध करुन देण्याविषयी निर्देश दिलेले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या तसेच आयोगाच्या वतीने मी महाराष्ट्राच्या सर्व जनतेला सेवा हक्क दिनाच्या शुभेच्छा देत आहे.

००००

– डॉ.किरण जाधव,

राज्य सेवा हक्क आयुक्त

छत्रपती संभाजीनगर विभाग

(संकलन : जिल्हा माहिती कार्यालय, छत्रपती संभाजीनगर)

पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा क्रीडा संकुल समितीची बैठक संपन्न

धुळे, दिनांक 26 एप्रिल, 2025 (जिमाका वृत्तसेवा) : जिल्ह्यातील खेडाळूंना चांगल्या क्रीडा सुविधा उपलब्ध होण्यासाठी धुळे जिल्हा क्रीडा संकुलात विविध सुविधा निर्माण करण्याच्या 16 कोटी रुपयांच्या कामांना मंजूरी देण्याबरोबरच तालुका क्रीडा संकुलाच्या धर्तीवर अपर तहसिल कार्यालयाच्या ठिकाणीही क्रीडा संकुल उभारण्यास शासनाची मंजूरी मिळावी याकरीता क्रीडा विभागास प्रस्ताव सादर करण्याच्या सुचना जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी दिल्या.

येथील जिल्हा क्रीडा संकुल कार्यालयात पालकमंत्री श्री. रावल यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा क्रीडा संकुल समितीची बैठक संपन्न झाली, यावेळी ते बोलत होते. बैठकीस आमदार अनुपभैय्या अग्रवाल, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, महापालिका आयुक्त अमिता दगडे पाटील, शिक्षणाधिकारी मनिष पवार, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, जिल्हा परिषदेचे समजाकल्याण अधिकारी नितीन खंडेराय, उप कार्यकारी अभियंता श्री. झाल्टे, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश टिळे यांच्यासह समितीचे सदस्य,  विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. रावल म्हणाले की, जिल्ह्यातील अपर तहसिलदार कार्यक्षेत्रात नविन क्रीडा संकुल उभारण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी राज्याच्या क्रीडा विभागाकडे  प्रस्ताव सादर करावा. तसेच क्रीडा संकुल उभारण्यासाठी महसूल विभागाने जागा उपलब्ध करुन द्यावी. धुळे जिल्ह्यातून आंतरराष्ट्र्रीय खेळांडू निर्माण करण्यासाठी क्रीडा संकुलात खेळांडूसाठी नियमित 7 दिवसांचे विविध खेळांचे प्रशिक्षण सत्राचे आयोजन करावे. यासाठी क्रीडा प्रशिक्षक, संघटनाची एक समिती बनवावी. क्रीडा संकुलातील जलतरण तलावात लाईफ गार्डसह तज्ञ प्रशिक्षिक नियुक्त असणे आवश्यक आहे. क्रीडा संकुलात नवीन कामे घेतांना दर्जेदार कामे करावेत. खेळांडूना निवास व्यवस्थेसह आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. क्रीडा संकुलात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होणेसाठी महापालिकेने आवश्यक ती कार्यवाही करावी. संकुलात सोलर युनिट, सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यात यावीत. क्रीडा संकुलातील गाळे धारकांच्या प्रश्नावर योग्य तो तोडगा काढण्याबरोबरच गरुड मैदान क्रीडा संकुलात लिफ्टची सोय करावी अशा सूचना पालकमंत्री श्री.रावल यांनी बैठकीत दिल्यात.

या बैठकीत क्रीडा संकुलाच्या प्रगतीसाठी सुधारित प्रशासकीय मान्यता, भौतिक सुविधा, कर्मचारी मानधनवाढ, क्रीडा स्पर्धांचे आयोजन, गाळेधारकांचा करारनामा, तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील दालनामध्ये फर्निचर व इतर सुविधा संदर्भातही निर्णय घेण्यात आले.

या बैठकीस विविध विभागांचे अधिकारी, समिती सदस्य, क्रीडा अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

00000

“जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना

धुळे, दिनांक 26 एप्रिल, 2025 (जिमाका वृत्तसेवा) :  राज्य शासनाच्या मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेतंर्गत विशेष रेल्वे गाडी जिल्ह्यातील आठशे भाविकांना घेऊन अयोध्येच्या दिशेने जय श्री राम”च्या गजरात रवाना झाली. राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी या विशेष रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून यात्रेची सुरुवात केली.

धुळे रेल्वे स्थानक येथे झालेल्या या कार्यक्रमांस खासदार डॉ. शोभा बच्छाव, आमदार मंजुळा गावित, अनुपभैय्या अग्रवाल, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त संजय सैंदाणे, जि.प समाज कल्याण अधिकारी नितीन खंडेराय, आयआरसीटीसीचे  नवीन कुमार सिन्हा, इंडियन रेल्वे कॅटरींग ॲण्ड टुरीझम कॉर्पोरेशन, मुंबई प्रतिनिधी श्रीमती मृण्ययी, माजी महापौर जयश्री अहिरराव, प्रदिप कर्पे, गजेंद्र अंपळकर यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी, यात्रेकरु, त्यांचे नातेवाईक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. रावल यांनी यात्रेनिमित्तच्या शुभेच्छा देताना सांगितले, राज्यातील सर्व धर्मियांमधील ज्येष्ठ नागरिक जे 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत, त्यांना भारतातील तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची इच्छा पूर्ण करण्याची इच्छा असते. परंतू गरीब, सर्वसामान्य कुटुंबातील ज्येष्ठ नागरिक त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे वा कोणी सोबत नसल्याने आणि पुरेशी माहिती नसल्याने अनेक ज्येष्ठ नागरिकांचे तीर्थयात्रा करण्याचे स्वप्न पूर्ण होत नाही. ही बाब विचारात घेऊन सर्वसामान्य ज्येष्ठ नागरिकांना देशातील मोठ्या तीर्थ स्थळांना जाऊन मनःशांती तसेच अध्यात्मिक पातळी गाठणे सुकर व्हावे, यासाठी राज्यातील 161 आणि भारतातील 88 तीर्थक्षेत्रांना मोफत भेटीची/दर्शनाची संधी देण्यासाठी “मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना” राज्य शासनाने सुरु केली आहे. मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना ही केवळ एक योजना नाही, तर वृद्धांचा सन्मान असून निवडणूकीवेळी जे बोललो ते करुन दाखविल्याचेही ते म्हणाले.

पालकमंत्री पुढे म्हणाले की, 1 कोटी 30 लाख रुपये खर्चातून तीर्थदर्शन यात्रा शासनामार्फत करण्यात येत आहे. तीर्थयांत्रामधून ज्येष्ठ नागरिकांना आयुष्याचे पुण्य मिळणार आहे, आणि त्याच्या माध्यमातुन आम्हालाही थोडे पुण्य लाभणार आहे. शासन तीर्थयात्रेच्या माध्यमातून श्रावण बाळाच्या भुमिकेत आहे. या देशाला मोठा सांस्कृतिक इतिहास आम्ही निभावत आहे. सर्वांची चारधाम यात्रा झाली पाहिजे त्यासाठी आमचे सरकार काम करत आहे. आपण सर्वजण सुखरुप जा आणि सुखरुप या, काही अडचण आली तर संपर्क साधण्याचे आवाहन करुन त्यांनी यात्रेकरुवर पुष्पवृष्टी केली.

यावेळी खासदार डॉ. बच्छाव यांनी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरीकांना अयोध्येतील प्रभु श्रीरामाचे दर्शनाची संधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल केंद्र आणि राज्य सरकारचे आभार मानले. यावेळी आमदार मंजुळा गावित, अनुपभैय्या अग्रवाल यांनीही आपले मनोगत व्यक्त करुन यात्रेकरुंना प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.

धुळे रेल्वे स्थानकावर सकाळपासून अयोध्येला जाणाऱ्या प्रवाशांची लगबग होती. सर्व प्रवाशांना समाज कल्याण विभागामार्फत ओळखपत्र देण्यात आले. तसेच त्यांच्या बसण्याच्या ठिकाणासह त्यावर बोगी क्रमांक लिहिला होता. सर्व ज्येष्ठ नागरिक असल्यामुळे श्रीराम मंदिर, अयोध्या धाम (उत्तर प्रदेश) प्रवास कालावधीत चहा, नाश्ता, भोजन, रहिवासची व्यवस्था राज्य शासनामार्फत मोफत करण्यात येणार आहे. तसेच त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी वैद्यकीय पथकासह प्रत्येक बोगीसाठी दोन समन्वयक नेमण्यात आले आहे. यावेळी ज्येष्ठ नागरिक लाभार्थ्यांचे पारंपरिक वाद्यांसह स्वागत करण्यात आले. यात्रेकरुंकडून जय श्रीरामचा जयघोष करण्यात येत असल्याने परिसर दुमदुमून गेला होता.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस पहलगाम येथे अतिरेकी हल्लयात मृत्युमुखी पडलेल्या नागरीकांना श्रध्दाजंली अर्पण करण्यात आली.

00000

 

पाणी टंचाईच्या कामात हयगय केल्यास संबंधितांवर कारवाई – पालकमंत्री संजय राठोड

  • टंचाईस जबाबदार असणाऱ्यांची वेतनवाढ थांबविणार
  • मागील वर्षाचा अधिग्रहणाचा मोबदला ३० एप्रिलपर्यंत द्या
  • एसडीओंनी तालुकास्तरावर टंचाई आढावा घेण्याचे निर्देश

यवतमाळ, दि. 26 (जिमाका) : उन्हाळ्यात ग्रामीण भागात पाणी टंचाईची परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी फार पुर्वीपासून आपण आराखडा करतो. आवश्यक निधी देखील उपलब्ध करून दिला जातो. असे असतांना देखील बऱ्याच ठिकाणी टंचाईची परिस्थिती निर्माण होते. असे बिल्कूल होता कामा नये. पाणी टंचाईच्या कामात हयगय केल्यास संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करू. प्रसंगी वेतनवाढ थांबवू, असे सक्त निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले.

महसूल भवन येथे पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील पाणी टंचाईचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आ.बाळासाहेब मांगूळकर, आ.संजय देरकर, जिल्हाधिकारी विकास मीना, सहाय्यक जिल्हाधिकारी अमित रंजन, निवासी उपजिल्हाधिकारी सुदर्शन गायकवाड यांच्यासह पाणी पुरवठा, जलसंपदा, जलसंधारण, वीज वितरण आदी विभागांच्या अधिकाऱ्यांसह सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी उपस्थित होते.

आवश्यक उपाययोजनांचे नियोजन पुर्वीपासूनच होत असतांना देखील काही ठिकाणी टंचाईचा प्रश्न निर्माण होतो. ही अतिशय गंभीर बाब आहे. जिल्ह्यात कुठेही टंचाई जाणवणार नाही, याची दक्षता संबंधितांनी घेतली पाहिजे. रोज वर्तमानपत्रांमध्ये टंचाईच्या बातम्या येतात. अशा बातम्या आल्यानंतर त्याची शहानिशा करून संबंधितांवर वेतनवाढ थांबविण्याची कार्यवाही करा. यात ग्रामसेवक ते संबंधित अभियंता यांना जबाबदार धरा, अशा सूचना देखील पालकमंत्र्यांनी केल्या. टंचाईचा विषय अतिशय गंभिरतेने घ्या, असे ते म्हणाले.

पाणीपट्टी थकल्याने काही ठिकाणी वीज पुरवठा खंडीत करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे संबंधित गावाचा पाणी पुरवठा देखील खंडीत होतो. उन्हाळ्याच्या दिवसात पाणीपट्टी थकल्याने वीज पुरवठा तोडू नये, असे शासनाचे निर्देश आहे, त्यामुळे वीज पुरवठा तोडू नये, असे आढळून आल्यास त्याची गंभीर दखल घेतल्या जाईल. काही कारणास्तव वीज पुरवठा नसल्याने ज्या ठिकाणी पाणी पुरवठा योजना बंद आहे, तेथे सौरऊर्जेद्वारे पाणी पुरवठा सुरु करण्याचे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

टंचाईकाळात शेतकरी किंवा नागरिकांच्या विहीरी अधिग्रहीत करण्यात येतात. अशा अधिग्रहनाचे मागील वर्षाचे प्रलंबित देयके थकीत असल्याच्या तक्रारी आहे. ही देयके संबंधितांना येत्या 30 एप्रिल पर्यंत कोणत्याही परिस्थितीत अदा करा. उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गटविकास अदिाकारी यांनी ग्रामीण भागात भेटी देऊन टंचाईची परिस्थीती व कामांवर लक्ष ठेवले पाहिजे. उपविभागीय अधिकाऱ्यांनी तालुकास्तरावर सरपंच, ग्रामसेवक व संबंधित यंत्रणांच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची बैठक घ्यावी, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.

प्रकल्पातून पाणी सोडणे किंवा विहीरी अधिग्रहणाची मागणी असल्यास त्याची संबंधित अधिकाऱ्यांनी खात्री करूनच त्यावर कारवाई करावे. टंचाई भागात टॅंकरची किंवा अन्य उपाययोजनांची मागणी असल्यास त्यावर तातडीने कार्यवाही होणे आवश्यक आहे. मंजूरीची फाईल फार काळ प्रलंबित राहू नये, यासाठी वेळापत्रक निश्चित करा. मंजूरीस विलंब करणाऱ्यांवर देखील कारवाई करा. जिल्ह्यात कुठेही नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार नाही, त्यांना त्रास होणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश दिले.

यावेळी पालकमंत्र्यांनी तालुकानिहाय टंचाई स्थिती, सुरु असलेल्या उपाययोजनांचा सविस्तर आढावा तहसिलदार व गटविकास अधिकाऱ्यांकडून घेतला. जिल्ह्यात एकून 468 गावे, वाड्यांमध्ये टंचाई उपाययोजनांसाठी 4 कोटी 31 लक्ष रुपयांचा टंचाई आराखडा राबविण्यात येत आहे. त्यात एकून 539 उपाययोजनांचा समावेश आहे. सद्या जिल्ह्यात 12 गावांमध्ये टॅंकरने पाणी पुरवठा सुरु आहे. 61 गावांमध्ये 71 विहीरी, विंधनविहीरीचे अधिग्रहण करण्यात आल्याचे बैठकीत सांगण्यात आले. बैठकीत आ.बाळासाहेब मांगूळकर व आ.संजय देरकर यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांवर तातडीने कारवाई करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी केल्या.

जिल्ह्यात टंचाईग्रस्त गावांसाठी ‘पाणीदार गाव योजना’

जिल्ह्यात ठराविक गावांमध्ये दरवर्षी उन्हाळ्यात पाणी टंचाईचा फटका बसतो. या गावांची माहिती घेऊन तेथे ‘जलसमृद्ध, पाणीदार गाव अभियान’ राबवा. ही गावे कायमस्वरुपी टंचाईमुक्त होण्यासाठी सविस्तर आराखडा तयार करा. यासाठी लागणारा निधी उपलब्ध करून देऊ, असे पालकमंत्री म्हणाले. या गावांमध्ये भविष्यात टंचाई जाणवणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश देखील त्यांनी दिले.

0000

 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतले श्री नृसिंहाचे दर्शन

परभणी, दि. 26 (जिमाका) : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पोखर्णी येथे भेट देवून श्री नृसिंहाचे दर्शन घेतले. सर्वत्र चांगला पाऊस पडू दे आणि सर्व जनतेला सुख-समृध्दी लाभू दे, अशी  प्रार्थना त्यांनी यावेळी केली.

विधानपरिषद सदस्य विक्रम काळे, आमदार रत्नाकर गुट्टे, आमदार राजेश विटेकर, पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, उपविभागीय अधिकारी दत्तु शेवाळे, तहसिलदार संदीप राजापुरे, श्री क्षेत्र नृसिंह देवस्थानचे अध्यक्ष मंचकराव वाघ व भाविक उपस्थित यावेळी उपस्थित होते.

श्री. पवार म्हणाले की, महाराष्ट्र ही साधूसंतांची भूमी आहे. येथील सर्व गड-किल्ल्यांचे संवर्धन व देवस्थानाचा विकास करण्यासाठी सहकार्य केले जाईल. श्री क्षेत्र नृसिंह देवस्थानचा विकास करण्यासही आपण कटीबद्ध आहे.  येथे येणाऱ्या भाविकांसाठी पिण्याचे पाणी, स्वच्‍छतागृह व इतर  मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातील. या देवस्थानचा जिर्णोद्धार करण्यासाठी देवस्थान समिती, लोकप्रतिनिधी, गावातील प्रतिष्ठीत व्यक्ती, भाविक, पुजारी, फुल व प्रसाद विक्रेते यांनी सर्वांनी एकत्र येवून श्री नृसिंह देवस्थानचा आराखडा तयार करुन सादर करावा. या कामासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

0000

सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार – विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे

अमरावती, दि. 26 : विधानपरिषदेचे सभापती पद हे संविधानिक पद आहे. या पदाला समन्वय साधण्याची जबाबदारी आहे. त्यामुळे या समन्वयातूनच येत्या काळात सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी केले.

आज छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात श्री. शिंदे यांचा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार डॉ. अनिल बोंडे, बळवंत वानखेडे, आमदार किरण सरनाईक, संजय खोडके, सुलभा खोडके, रवी राणा, प्रताप अडसड, राजेश वानखेडे, प्रवीण तायडे, उमेश यावलकर, गजानन लवटे, प्रवीण पोटे, ॲड. दिलीप एडतकर आदी उपस्थित होते.

श्री. शिंदे म्हणाले, सभापतीपदाने जनतेची कामे करण्यासाठी जबाबदारी दिली आहे. हा विश्वास आणखी काम करण्यासाठी ऊर्जा देणारा आहे. येत्या काळात सकारात्मकपणे कामे करण्यात येतील. प्रामुख्याने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी वर्षानिमित्त विविध कामे हाती घेण्यात येतील. अहिल्यादेवींनी केलेल्या मंदिराचा जिर्णोद्धार आणि धर्म जागविण्याचे कार्य ही यामागील संकल्पना आहे. अहिल्यादेवींनी काशी विश्वेश्वर, केदारनाथ मंदिराचा जिर्णोद्धार आणि असंख्य धर्मशाळा, अन्नछत्र आणि घाट बांधले आहे. त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव म्हणून अहिल्यानगर नामकरण आणि सोलापूर विद्यापीठाला त्यांचे नाव देण्यात आले आहे. धनगर समाजाच्या असलेल्या न्याय्य मागण्यासाठी कायम पाठिंबा राहील. तसेच दुर्लक्षित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगितले.

पालकमंत्री श्री. बावनकुळे यांनी श्री. शिंदे यांच्या रूपाने युवा नेतृत्व लाभले आहे. त्यांच्या माध्यमातून समाजाच्या कल्याणासाठी विविध विकास कार्य करण्यात येतील. विधिमंडळातही सदस्य आणि शासनाचा समन्वय साधून त्यांनी आपल्या कार्याची छाप उमटवली आहे. सभागृहाचे कामकाज सुरू असताना ते पूर्ण झाल्याशिवाय सभागृह सोडत नाहीत. समाजात कार्य करत असताना आई-वडील, माती आणि समाजाचे ऋण चुकविणे गरजेचे आहे. हाच वसा श्री. शिंदे जपून कार्य करीत आहे. तसेच समाजातील प्रत्येक समस्या सोडवण्यासाठी विधिमंडळात कायदा होणे गरजेचे आहे. यासाठी श्री. शिंदे यांची सभापती म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे सांगितले.

श्री. एडतकर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी डॉ. अनिल बोंडे, बळवंत वानखेडे, किरण सरनाईक, सुलभा खोडके, रवी राणा यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पहलगाम येथील मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

00000

सामान्य नागरिकांना लवकर न्याय मिळण्यासाठी आवश्यक तो विचार आणि उपाययोजना आवश्यक – सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक

ठाणे,दि.26(जिमाका):- आपल्या घटनेला 75 वर्षे पूर्ण झाल्यानंतरही आपण सामान्य नागरिकांना वेळेवर न्याय देवू शकत नाही, याची आपल्याला जाणीव असली पाहिजे. आजच्या परिस्थितीत सामान्य माणसाला लवकर न्याय मिळण्यासाठी आवश्यक तो विचार आणि उपाययोजना करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांनी आज येथे केले.

सध्याच्या जिल्हा न्यायालय, ठाणे आवारातील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांच्या हस्ते तर उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे, न्यायमूर्ती गिरीष कुलकर्णी, न्यायमूर्ती श्रीराम मोडक, न्यायमूर्ती शार्मिला देशमुख, न्यायमूर्ती गौरी गोडसे, न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे, न्यायमूर्ती अद्वैत सेठना, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, ठाणे श्रीनिवास अग्रवाल, जिल्हा न्यायाधीश-1 व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, ठाणे सुर्यकांत शिंदे, जिल्हा व तालुकास्तरीय न्यायालयांचे न्यायाधीश, तसेच बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे अध्यक्ष ॲड.सुदीप पासबोला व सदस्य ॲड.गजानन चव्हाण, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव ईश्वर सुर्यवंशी, ठाणे जिल्हा वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड.प्रशांत कदम, खासदार नरेश मस्के, आमदार संजय केळकर, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, पोलीस सह आयुक्त डॉ.ज्ञानेश्वर चव्हाण, अप्पर पोलीस आयुक्त विनायक देशमुख, उपायुक्त मीना मकवाना, अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, अधीक्षक अभियंता सिद्धार्थ तांबे, प्रांताधिकारी उर्मिला पाटील, कार्यकारी अभियंता सुनील पाटील व संजय पुजारी, सहायक पोलीस आयुक्त प्रिया ढाकणे, तहसिलदार उमेश पाटील, उप अभियंता स्नेहल काळभोर व रविशंकर सुर्यवंशी, जिल्ह्यातील वकील, विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी, नागरीक उपस्थित होते.

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक पुढे म्हणाले की, आजचा हा उद्घाटनाचा प्रसंग माझ्याकरिता विविध कारणांनी आनंदाचा आहे. जिथून वकीलीची सुरुवात केली तेथे सेवेच्या अखेरच्या टप्प्यात आल्यानंतर एका विधायक कामासाठी भेट देताना मला अत्यंत आनंद होत आहे. आधुनिक सोयीसुविधा असलेली जिल्हा व सत्र न्यायालयाची ही इमारत आहे. अनेक टप्पे गाठत या सुंदर इमारतीची निर्मिती झाली आहे. न्यायालयांमध्ये चांगला न्याय अपेक्षितच आहे. विचाराचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य जपले पाहिजे. न्यायव्यवस्थेचे हे प्रमुख कामच आहे. बंधुत्व टिकविण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहिला हवे. तालुका व जिल्हा न्यायालये ही विद्यापिठे आहेत. ठाणे जिल्ह्याने अनेक नामवंत न्यायाधीश दिले आहेत व यापुढेही देत राहील, असा मला विश्वास आहे. वकिलांना योग्य सोयी सुविधा मिळायला हव्यात.

ते म्हणाले की, ठाणे जिल्हा वकील संघटनेने विकेंद्रीकरणाला विरोध केला नाही. 2 वर्ष सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून जुने खटले निकाली कसे काढता येतील, याचा ॲक्शन प्लॅन तयार करण्यात आला आहे. या ॲक्शन प्लॅनच्या अंमलबजावणीत ठाणे अग्रेसर आहे. हे केवळ सर्व वकिलांनी सहकार्य केल्यामुळेच शक्य झाले आहे. सर्वसामान्य नागरिकांना “क्वालिटी जस्टीस” मिळायला हवा. त्याकरिता सर्वांनी मिळून सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळेल, असे काम करू या, असे आवाहनही त्यांनी शेवटी केले.

जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नूतन इमारतीचे काम उत्कृष्ट दर्जाचे होण्यासाठी मोलाचे योगदान दिलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे न्यायमूर्ती श्री.ओक यांनी विशेष कौतुकही केले.

याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ठाणेकरांच्या दृष्टीने हा आनंदाचा व समाधानाचा दिवस आहे. जिल्हा व सत्र न्यायालयाची एक अत्यंत चांगली इमारत निर्माण झाली असून सर्वजण येथे मोकळ्या वातावरणात काम करतील. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांचे ठाण्याशी अतूट नाते आहे. स्पष्टवक्ता, निर्भीड व्यक्तिमत्व तसेच कायम सर्वसामान्यांच्या हिताचे काम करणारे म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपले सरकार काम करीत आहे. हे न्यायाचे राज्य आहे. ठाण्यातील न्यायालय सर्वोत्तम व्हावे, असे श्री.ओक यांनी निश्चित केले.

नवीन इमारतीमुळे न्यायदानाचे काम अधिक जलदगतीने होईल. मागील अडीच वर्षात शासनाने 34 न्यायालये स्थापन केली आहेत. तसेच वेळोवेळी आवश्यक ती सर्व मदतही केली आहे. न्यायव्यवस्था लोकशाहीचा प्राण आहे तर संविधान हा पाया. सर्वसामान्यांना न्याय देणे, हा न्यायालयांचा हेतू आहे. त्याचप्रमाणे शासनही विविध योजना राबवून सर्वसामान्यांचे जीवन सुकर करण्याचा प्रयत्न करीत आहे. राज्यात फास्टट्रॅक कोर्ट वाढविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे तसेच संविधानाला अभिप्रेत मूल्य टिकवण्यासाठी आम्ही बांधील आहोत. शासन कायम तुमच्या मदतीसाठी सोबत आहे, अशी ग्वाही यावेळी उपमुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी दिली.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे, न्यायमूर्ती गिरीष कुलकर्णी, न्यायमूर्ती श्रीराम मोडक, न्यायमूर्ती अद्वैत सेठना, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे अध्यक्ष ॲड.सुदीप पासबोला यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाची सुरूवात मान्यवरांच्या हस्ते संविधान उद्देशिका प्रतिमा पूजनाने करण्यात आली. या कार्यक्रमप्रसंगी पहलगाम अतिरेकी हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक ठाणे जिल्हा वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड.प्रशांत कदम यांनी तर सूत्रसंचालन ॲड.राहुल घाग यांनी आणि आभार प्रदर्शन ॲड.गजानन चव्हाण यांनी केले.

00000

जम्मू कश्मीरच्या उपमुख्यमंत्र्यांची राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत बैठक

  • जम्मू-कश्मीरच्या रहिवाशांच्या सुरक्षेवर उपमुख्यमंत्र्यांचा भर
  • आपल्या लोकांची सुरक्षितता सरकारची सर्वोच्च प्राथमिकता : उपमुख्यमंत्री

मुंबई, २६ एप्रिल : जम्मू-कश्मीरचे उपमुख्यमंत्री सुरिंदर चौधरी यांनी आज मुंबईत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आणि महाराष्ट्र सरकारने जम्मू-कश्मीरच्या रहिवाशांसाठी घेतलेल्या सुरक्षात्मक उपाययोजनांवर समाधान व्यक्त केले.

उपमुख्यमंत्री चौधरी यांनी महाराष्ट्रात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांशी, व्यावसायिकांशी व व्यापाऱ्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या मनात सुरक्षिततेचा विश्वास निर्माण केला.

या बैठकीत चौधरी यांनी महाराष्ट्रात वास्तव्यास असलेल्या जम्मू-कश्मीरच्या नागरिकांच्या सुरक्षेचे महत्व अधोरेखित केले आणि त्यांच्या कल्याणासाठी सर्व आवश्यक पावले उचलण्याची विनंती एकनाथ शिंदे यांना केली.

त्यावर उत्तर देताना एकनाथ शिंदे यांनी संपूर्ण सहकार्याचे आश्वासन दिले आणि म्हटले की, महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्रातील जनतेचा जम्मू-कश्मीरच्या लोकांशी दृढ बंध आहे आणि त्यांच्या सुरक्षेसाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांच्या सूचनेनुसार, उपमुख्यमंत्री चौधरी यांनी विविध महाविद्यालये व विद्यापीठांतील विद्यार्थ्यांशी, खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांशी व व्यावसायिकांशी स्वतंत्ररित्या भेट घेतली आणि त्यांच्या सुरक्षेची व कल्याणाची माहिती घेतली. त्यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचीही भेट घेतली.

चौधरी यांनी पुन्हा एकदा सांगितले की जम्मू-कश्मीरच्या रहिवाशांची सुरक्षितता सरकारची सर्वोच्च प्राथमिकता आहे. त्यांनी म्हटले, “आमच्या लोकांच्या सुरक्षिततेसाठी आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न करू.”

एकजूट व्यक्त करताना चौधरी म्हणाले की, उमर अब्दुल्ला सरकार आपल्या लोकांच्या कल्याणासाठी सदैव चिंतीत आहे आणि त्यांच्या सुरक्षेसाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे. तसेच, विद्यार्थ्यांना व अन्य रहिवाशांना कोणत्याही मदतीसाठी प्रशासनाने प्रसारित केलेल्या अधिकृत हेल्पलाइन क्रमांकांवर संपर्क साधण्याचा सल्लाही त्यांनी दिला.

००००

महाराष्ट्राला देशातील पहिले बेघरमुक्त राज्य करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

पुणेदि. २६: प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ग्रामविकास विभागाने उत्तम कामगिरी केली असून केंद्राकडून आणखी १० लाख घरांना मान्यता मिळणार आहे. घर मंजूर झाल्यावर जमीन उपलब्ध करून देण्यासाठी मोहीम स्तरावर काम करण्यासह एकही व्यक्ती बेघर राहणार नाही यासाठी प्रयत्न करा. या माध्यमातून राज्याला देशातील पहिले बेघरमुक्त राज्य कराअसे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. प्रशासन लोकाभिमुख आणि गतिशील करण्यासाठी मनुष्यबळाचे योग्य व्यवस्थापन आणि तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करण्याचे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

यशदा‘ येथे ग्रामविकास व पंचायत राज विभागातर्फे आयोजित पंचायत राज राज्यस्तरीय कार्यशाळेत मुख्यमंत्री बोलत होते. कार्यक्रमाला ग्रामविकास पंचायत राज मंत्री जयकुमार गोरेराज्यमंत्री योगेश कदमप्रधान सचिव एकनाथ डवलेयशदाचे महासंचालक निरंजन सुधांशूमुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणालेउत्तम प्रशासनासाठी मनुष्यबळाचा विकास महत्त्वाचा आहे. त्यासाठी उपलब्ध मनुष्यबळाचा कार्यक्षम उपयोग कसा करता येईल याचा विचार करावा. आज उत्तम प्रकारचे तंत्रज्ञान उपलब्ध असून ते समजून घेत त्याचा उपयोग करणारी यंत्रणा उभारण्यावर भर द्यावा. इतर ठिकाणच्या चांगल्या कल्पनांचे अनुकरण करावे. राज्याच्या प्रशासकीय व्यवस्थेसाठी कार्यशाळेत शिकायला मिळणाऱ्या बाबी महत्त्वाच्या ठरतील. अनुभवी अधिकाऱ्यांचे विविध प्रयोग इतरांना मार्गदर्शक आहेतते संकलित झाले आणि समजून घेतले तर प्रशासन अधिक लोकाभिमुख करण्यास मदत होते.  

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत मंजूर घरांना पहिल्या दिवसापासूनच प्रधानमंत्री सूर्यघर योजनेतून सौर ऊर्जेवर विजेची सुविधा करायची आहे. या कामांसाठी विविध योजनांच्या माध्यमातून मनुष्यबळ आणि निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न अधिकाऱ्यांनी करावाअसे आवाहन त्यांनी केले. यातून रोजगाराची संधीही निर्माण होईल, असा विश्वासाही त्यांनी व्यक्त केला.

शंभर दिवस कार्यक्रमात उत्तम कामगिरीसाठी पुरस्कृत करणार

राज्य शासनाने १०० दिवसांचा कार्यक्रम सुरू केला असून सर्व क्षेत्रीय कार्यालयांनी त्यात उत्स्फूर्त सहभाग घेतला आहे. ग्रामविकास विभागाने या कार्यक्रमात अत्यंत उत्तम कामगिरी केली आहे. या कार्यक्रमाच्या अवलोकनानंतर राज्यासाठी उत्तम कार्यपद्धतीच्या अनुषंगाने मार्गदर्शन होणार आहे. ‘क्वालिटी कौन्सील ऑफ इंडिया’च्या परीक्षणानंतर उत्तम काम करणारे अधिकारी समोर येतीलत्यांच्या कामांची नोंद घेण्यात येईल. यातून सर्वांना चांगले काम करण्याची प्रेरणा मिळेल. राज्यातील साडेबारा हजार कार्यालयांमध्ये या कार्यक्रमाच्या माध्यमातून परिवर्तन घडवून आणणे आपल्याला शक्य झाले. त्यातून कामकाजात पारदर्शकता येण्याबरोबरच प्रशासनाबाबतची विश्वासार्हता वाढणार आहे.  

जलजीवन योजनेतील त्रुटी बाजूला करून ती योजना प्रभावीपणे राबवावी. योजना पूर्ण झाल्यानंतर ती चालविण्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळाचा विचार करावा. कार्यशाळेच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण कामासाठी काय करता येईल याचा विचार करावात्यासाठी क्षमतावाढ आणि प्रशिक्षणावर भर द्यावा. बांधकामाचा दर्जा सुधारण्यासाठी अधिकारी आणि कंत्राटदार यांचे प्रशिक्षण घ्यावे, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

येत्या पाच वर्षात आरोग्य सुविधांच्या सुधारणेवर भर

आरोग्य क्षेत्रात राज्याने मोठी गुंतवणूक केली असून या क्षेत्राला गती देणे आवश्यक आहे. येत्या पाच वर्षात नागरिकांच्या आरोग्य सुविधांवर लक्ष केंद्रित करायचे आहे. प्रत्येक पाच किलोमीटर क्षेत्रात उत्तम दर्जाच्या शासकीय आरोग्य सुविधा उपलब्ध होतील यासाठी प्रयत्न करावा लागेल. प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रात सुधारणा घडवून आणल्यास सामान्य नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा देता येतील, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

सर्वांगीण प्रगतीसाठी सामूहिक प्रयत्न गरजेचे

शैक्षणिक क्षेत्रातील सुधारणांसाठी संबंधित घटकांचे सहकार्य घेणे महत्त्वाचे आहे. अंगणवाडीपासून या सुधारणांना सुरुवात करावी.  सेवाभावी संस्थांच्या सहभागातून चांगल्या सुविधा करता येतील. जलसंधारणउद्योगाला प्रोत्साहनविविध योजनांचे अभिसरण आणि घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनावर भर द्यावा. नदी-नाल्यात प्रदूषण होणार नाही याची दक्षता घ्यावी. लखपती दीदी‘ सारख्या योजनांच्या माध्यमातून महिलांना सक्षम करून मोठे परिवर्तन घडवून आणता येईल. बचत गटातील महिलांना फिरती बाजारपेठ उपलब्ध करून दिल्यास त्यांच्या उत्पादनाला ग्राहकांपर्यंत पोहोचविता येईलअसे मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले.

३० लाख घरे उभारण्याचे ग्रामविकास विभागाचे उद्दिष्ट – मंत्री जयकुमार गोरे

मंत्री श्री. गोरे म्हणालेआतापर्यंत साडे तेरा लाख घरांना मान्यता देण्यात आली आणि १० लाख घरांना पहिला हप्ता देण्यात आला,  त्यातील ४६ हजार घरे पूर्ण झाली आहेत. ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून ३० लाख घरे उभारण्याचे उद्दिष्ट आहेत्यासाठी जमीन उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

मुख्यमंत्री समृद्ध ग्राम योजना तयार करण्याची प्रक्रिया सुरू असून या गावांमध्ये शासनाच्या योजनांची १०० टक्के अंमलबजावणी करण्याचे उद्दिष्ट राहील. या योजनेच्या माध्यमातून गाव स्वयंपूर्ण होण्यास मदत होईल. योजनेअंतर्गत चांगले काम करणाऱ्या गावांना पुरस्कृत करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेवरील जनतेचा विश्वास वृद्धिंगत व्हावा यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रधान सचिव श्री. डवले यांनी प्रास्ताविकात कार्यशाळेची माहिती सादरीकरणाद्वारे दिली. १०० दिवसाच्या कार्यक्रमातील २१ पैकी २० मुद्यांवर कार्यवाही करण्यात आली आहे. विविध जिल्ह्यांनी नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून नागरिकांना चांगल्या सुविधा दिल्या आहेत. उमेद अभियानआरोग्य विमा योजनाशिक्षणकृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आदी विविध विषयांवर पहिल्या दिवशी चर्चा करण्यात आलीअशी माहिती त्यांनी दिली.

ग्रामविकास विभागाच्या १०० दिवस कार्यक्रमांतर्गत तयार करण्यात आलेले सिंगल युनिफाईड पोर्टलसंचालक ग्रामीण गृहनिर्माण कार्यालय यांनी तयार केलेल्या आवास वितरण ॲपभूमिलाभ पोर्टल,  महाआवास अभियान डॅशबोर्डआयुक्त मनरेगा नागपूर यांनी तयार केलेल्या पीएमएवाय आणि नरेगा डॅशबोर्डचे उद्घाटन आणि राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियानाअंतर्गत बनविलेल्या चित्रफितीचे अनावरण श्री. फडणवीस यांच्या हस्ते कारण्यात आले.

राज्यातील २० जिल्हा परिषदांनी राबविलेल्या नावीन्यपूर्ण उपक्रमांवर आधारित पुस्तिकेचे तसेच महाआवास त्रैमासिकाचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.  विविध विषयातील उत्तम कल्पना आणि कामकाजातील सुधारणांशी संबंधित दस्तावेज तयार करण्यासाठी विविध गटात चर्चा करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

कार्यक्रमाला राज्यातील सर्व विभागीय आयुक्तजिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारीअतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक उपस्थित होते.

0000

ताज्या बातम्या

दशकपूर्ती महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाची!

0
राज्यातील नागरिकांना पारदर्शक, गतिमान व कालबद्ध पद्धतीने लोकसेवा देता याव्या यासाठी शासनाने 'महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015' लागू केला आहे. यामुळे शासकीय आणि निमशासकीय...

देशाची आरोग्य व्यवस्था जगात सर्वात सक्षम आणि मोठी – केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी.नड्डा

0
छत्रपती संभाजीनगर, दि. २७ (जिमाका): जगात आपल्या देशाची आरोग्य व्यवस्था सर्वात मोठी असून या आरोग्यव्यवस्थेने प्रगती केली आहे. लसीकरण, महिलांचे आरोग्य, बाल आरोग्य तसेच...

सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार – विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे

0
अमरावती, दि. २६: विधान परिषदेचे सभापती पद हे संविधानिक पद आहे. या पदाला समन्वय साधण्याची जबाबदारी आहे. त्यामुळे या समन्वयातूनच येत्या काळात सर्व घटकांना...

महाहौसिंगने परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीचा वेग वाढवावा – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0
मुंबई दि. २७: महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळ म्हणजेच महाहौसिंगने प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलांच्या बांधकामांना गती देण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत. त्यांना येणाऱ्या अडचणींवर शासनाच्या स्तरावरून...

पनवेल महानगरपालिकेच्या क्रिकेट प्रशिक्षण केंद्रातून गुणवत्ताधारक खेळाडू घडतील – मंत्री ॲड. आशिष शेलार

0
मुंबई, दि. २७ : पनवेल महापालिकेने उभारलेल्या क्रिकेट प्रशिक्षण केंद्राची व्यवस्था उत्तम आहे. या प्रशिक्षण केंद्रासाठी महापालिकेने दिलीप वेंगसरकर यांची अगदी अचूक निवड केली...