‘आरोग्याची वारी पंढरीच्या दारी’ उपक्रमांतर्गत ११ लाख ६४ हजार ६८४ वारकऱ्यांची आरोग्य तपासणी

मुंबई, दि. ६ : पंढरपूर येथे आषाढी एकादशी सोहळ्यानिमित्त सार्वजनिक आरोग्य विभागाने वारकऱ्यांची आरोग्य तपासणीचा ‘आरोग्याची वारी – पंढरीच्या दारी’ उपक्रम राबविण्याचे ठरविले. त्यानुसार  देहू-आळंदी ते पंढरपूर दरम्यान निघालेल्या पालखी मार्गावर ६ लाख ६४ हजार ६०७, तर पंढरपूर येथील महाआरोग्य शिबिरांमध्ये ५ लाख ७७ अशा एकूण ११ लाख ६४ हजार ६८४ वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी आणि औषधोपचार करण्यात आले.

‘आरोग्याची वारी – पंढरीच्या दारी’ या उपक्रमाची अंमलबजावणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या उपक्रमांतर्गत देहू-आळंदी ते पंढरपूर या पालखी मार्गावर आणि पंढरपूर येथे वारकऱ्यांच्या आरोग्य तपासणीसाठी २७  ते २९ जून २०२३ या कालावधीत  वाखरी, गोपाळपूर व तीन रस्ता येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरांच्या माध्यमातून आरोग्य विभागामार्फत विविध आरोग्य विषयक सेवा पुरविण्यात आल्या.

मंदिर परिसरामध्ये, वाळंवट ठिकाणी ३ व ६५ एकर येथे एक ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ आरोग्य मंत्री प्रा. डॉ. सावंत यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आले.  आपला दवाखान्याच्या माध्यमातून सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत 10 खाटा क्षमतेच्या अतिदक्षता विभागासह व पंढरपूर शहरामध्ये 17 ठिकाणी अशा एकूण 20 ठिकाणी मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्यात आली होती.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी शिबिराला भेट देऊन रुग्णांना पुरविण्यात येणाऱ्या आरोग्य सेवांची माहिती घेतली व रुग्णांशी, डॉक्टर, कर्मचारी यांच्याशी संवादही साधला होता. रुग्णांना पुरवण्यात येणाऱ्या आरोग्य सेवांबाबत समाधान व्यक्त केले होते.

देहू-आळंदी ते पंढरपूर या पालखी मार्गावर एकूण 6,64,607 वारकऱ्यांना मोफत तपासणी व उपचार , प्रत्येकी दोन किलोमीटर अंतरावर 233 तात्पुरत्या ‘आपला दवाखाना’ मार्फत मोफत आरोग्य सेवा, पालखी मार्गावर 24×7 अशा एकूण 194 आणि अत्यावश्यक रुग्ण सेवेसाठी 108 एकूण 75 रुग्णवाहिकांमार्फत 19,853 वारकऱ्यांना सेवा, 847 अत्यावश्यक वारकऱ्यांना योग्य वेळी उपचार व संदर्भ सेवा,  पुणे परिमंडळ, पुणे व पुणे जिल्हा परिषद स्तरावरुन पालखी बरोबर एकूण 9 आरोग्य पथके, एकूण 124 आरोग्य दुतांमार्फत बाईक ॲम्बुलन्सने आरोग्य सेवा, 3,500 औषधी किटचे दिंडी प्रमुखांना मोफत किट वाटप, 7460 हॉटेल्स मधील 10450 कामगारांची आरोग्य तपासणी,  पालखी मार्गावर 156 टँकरव्दारे शुध्द पाणीपुरवठा, मुक्कामाच्या ठिकाणी धूर फवारणी, पाण्याच्या सर्व स्त्रोतांचे ओटी टेस्ट,  जैव कचरा विल्हेवाट, तसेच चित्ररथांच्या माध्यमातून आरोग्य विषयक जनजागृती करण्यात आली आहे.

त्याचप्रमाणे पंढरपूर येथे तीन महाआरोग्य शिबिर, आपला दवाखाना (वाळवंट व इतर) येथे  27 ते 30 जून 2023 दरम्यान 5 लाख 77 लोकांची मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार, आरोग्य विभागामार्फत 3,718, खासगी वैद्यकीय व्यावसायिक 500 व स्वयंसेवी संस्थांचे स्वयंसेवक 1500 असे एकूण 5,718 मनुष्यबळामार्फत मोफत आरोग्य सेवा,  नेत्रविकार, हृदयरोग, किडनी, पोटाचे विकार, त्वचेचे विकार, मधुमेह, उच्च रक्तदाब, त्वचारोग, दंतरोग, संसर्गजन्य रोग (क्षयरोग, कुष्ठरोग), कर्करोग सारख्या रोगांवर मोफत उपचार, रुग्णांच्या मोफत 40 प्रकारच्या प्रयोगशाळा तपासण्या, प्रयोगशाळा तपासणीचा अहवाल रुग्णांच्या मोबाईलवर उपलब्ध करून देण्यात आला.

तसेच वारकऱ्यांच्या आवश्यकतेनुसार  मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार असून रुग्णांना अतिविशेषतज्ञ मार्फत ऑन्कोलॉजी, न्युरो सर्जरी, गॅस्ट्रोन्टेरॉलॉजी यासारख्या वैद्यकीय सेवा पुरविण्यात आल्या.  शिबिरांमध्ये 77,854 मोफत चष्मे वाटप व नेत्र तपासणी करण्यात आली.  मोतिबिंदू झालेल्या रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. प्रत्येक शिबिराच्या ठिकाणी 5 बेड मनुष्यबळासह अतिदक्षता विभाग कार्यरत, त्यामध्ये 154 रुग्णांना सेवा, अत्याधुनिक रेडिओ डायग्नॉस्टीक सुविधा, उपचार व आरोग्य तपासणीसाठी येणाऱ्या भाविकांना अल्पोपहार व चहाची व्यवस्था,  मंदिर परिसरामध्ये आरोग्य दूतांमार्फत गर्दीच्या ठिकाणी बाईक ॲम्बुलन्स,  शिबिराकरीता ईएमएस 108 च्या 15 रुग्णवाहिका, आषाढी वारीसाठी 15 रुग्णवाहिका मंदिर परिसरामध्ये प्रशिक्षित मनुष्यबळासह तैनात ठेवण्यात आले होते.

०००

निलेश तायडे/विसंअ/