नवीन सांस्कृतिक धोरण निश्चितीसाठी कालबद्ध कार्यक्रम – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

नवी दिल्ली, 14 :  मराठी भाषिक केवळ महाराष्ट्रातच नाही, तर देश-विदेशात वास्तव्यास असून मराठी संस्कृतीचे जतन व संवर्धन करीत आहेत तसेच अन्य भाषिकांपर्यंत आपली संस्कती पोहोचविण्याचे कार्य करीत आहेत. नवीन सांस्कृतिक धोरण निश्चितीसाठी कालबद्ध कार्यक्रम राबविण्यात येईल, असे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे सांगितले.

राजधानी स्थित महाराष्ट्र सदनच्या बॅंक्वेट हॉलमध्ये महाराष्ट्र सांस्कृतिक धोरण पुनर्विलोकन समितीची बैठक सांस्कृतिक कार्य संचालनालयाद्वारे आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी मंत्री श्री. मुनगंटीवार बोलत होते. यावेळी समितीचे कार्याध्यक्ष डॉ. विनय सहस्त्रबुध्दे, सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, संचालक विभिषण चावरे यांच्यासह समितीचे अशासकीय सदस्य, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, नवीन सांस्कृतिक धोरण तयार करताना कालबद्ध कार्यक्रम निश्चित करण्यात येईल. विविध 10 समित्यांचे प्रमुख व त्यांचे सदस्य सांस्कृतिक कार्यक्षेत्रात येणाऱ्या बाबींचा अभ्यास करून एक सर्वंकष धोरण निर्माण करीत आहेत. मराठी भाषिक हा महाराष्ट्राच्या बाहेरही अनेक वर्षांपासून राहत असून महाराष्ट्राच्या संस्कृतीचे जतन व संवर्धन करीत आहे. आवश्यकता असेल तिथे एकत्रित येऊन सामूहिक योगदानातून आपल्या सांस्कृतिक कार्याचे संरक्षण करतात.

नव्याने तयार होणारे सांस्कृतिक धोरण परिपूर्ण व सर्वंकष होण्यासाठी कारागिरी, मराठी भाषा/साहित्य/ वाचन संस्कृती/ग्रंथव्यवहार, दृश्यकला, गडकिल्ले व पुरातत्व, लोककला, संगीत, रंगभूमी, नृत्य, चित्रपट व भक्ती संस्कृती समिती, अशा दहा वेगवेगळ्या विषयांचा अंतर्भाव करण्यात आला आहे. सांस्कृतिक दृष्ट्या या महत्वपूर्ण विषयांचे कार्य व्यापक व परिणामकारक होण्यासाठी या समितीद्वारे त्या क्षेत्रांत येणा-या अडचणी, लोप पावत चाललेल्या रूढी, परंपरा, संस्कृतीची सध्याची परिस्थिती व यावर सूचवायच्या उपाययोजना याबाबत सर्व उपस्थित समितीतील अशासकीय सदस्यांनी यावेळी सादरीकरण केले.

छत्रपती शिवाजी महाराजांचे अध्यासन केंद्र उभारण्याबाबत चर्चा

छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या राज्याभिषेक वर्ष सोहळ्याच्या निमित्ताने जवाहरलाल नेहरू विद्यापीठ येथे छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्र व्हावे यासाठी मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी विद्यापीठाच्या कुलपती शांतीश्री पंडित यांच्यासमवेत चर्चा केली.

राजधानीतील विविध मराठी मंडळांसोबत धोरणाबाबत चर्चा

मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी राजधानीतील विविध मराठी मंडळांसोबत धोरणाविषयी चर्चा केली. व त्यांचे विचार जाणून घेतले. काही विशिष्ट योजनांच्या माध्यमातून मराठी पराक्रम, मराठी वारसा देशाच्या राजधानीपर्यंत पोहोचावा या हेतूने  प्रतिनिधींसोबत सविस्तर चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. दिल्लीस्थित बृह्ममहाराष्ट्र मंडळ, दिल्ली मराठी प्रतिष्ठान आदी मंडळांचे प्रतिनिधी उपस्थित होते. राज्याचे नवीन प्रस्तावित सांस्कृतिक धोरण सर्वंकष असेल आणि अन्य राज्ये महाराष्ट्राच्या सांस्कृतिक धोरणाचे अनुकरण करतील, असा विश्वास मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.