जगन्नाथ शंकरशेट नाना चौक माध्यमिक शाळेतील कौशल्य विकास केंद्राचे लोकार्पण

मुंबई, दि. 15: मुंबई महापालिकेच्या 196 माध्यमिक शाळांमध्ये 294 कौशल्य विकास केंद्रांची उभारणी केल्यामुळे विद्यार्थ्यांना व्यवसायाभिमुख शिक्षण घेता येणार आहे. तसेच आगामी काळात राज्यातील 28 हजार ग्रामपंचायतींमधील प्रायोगिक तत्त्वावर 500 गावात कौशल्य विकास केंद्र लवकर सुरू करणार असल्याची घोषणा कौशल्य, उद्योजकता व नाविन्यता विभाग मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केली.

महापालिकेच्या 196 माध्यमिक शाळांमध्ये कौशल्य विकास केंद्राची उभारणी करण्यात येणार आहे. त्याचा पथदर्शी प्रकल्प ग्रँट रोड येथील जगन्नाथ शंकरशेट नाना चौक माध्यमिक शाळेत उभारण्यात आला आहे.याचे लोकार्पण मंत्री श्री. लोढा, शालेय शिक्षण, मराठी भाषा मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत झाले. त्यावेळी मंत्री श्री.लोढा बोलत होते.

यावेळी बृहन्मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल, कौशल्य विकास विभागाचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह,कौशल्य विकास आयुक्त डॉ. एन. रामास्वामी, व्यवसाय व शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे संचालक डॉ. दिगंबर दळवी यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री.लोढा म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रथम कौशल्य विकास केंद्र 2014 मध्ये सुरू केले. नोकरीसाठी कोणापुढेही हात पसरावे लागू नयेत यासाठी देशातील युवा पिढीने कौशल्ययुक्त शिक्षण घेणे गरजेचे आहे. शासन फक्त प्रशिक्षण देणार नसून त्यांना उद्योग उभा करण्यासाठी अर्थसाह्य देखील करणार आहे. त्याचबरोबर राज्यातील नाका कामगारांनाही शासन प्रशिक्षण देणार असून त्यांचे कौशल्य वाढवण्यावर भर दिले जाणार आहे.राज्यातील एक लाख नाका कामगारांना याचा लाभ होईल. त्याचबरोबर राज्यातील ग्रामपंचायत मध्ये देखील शेतीवर आधारित कौशल्य शिकवण्यात येतील. प्रायोगिक तत्त्वावर राज्यातील 28 हजार ग्रामपंचायतींपैकी 500 गावात स्किल सेंटर सुरू करण्यात येतील. महाराष्ट्रातील 458 आयटीआय व 127 पॉलिटेक्निक मध्येही स्किल सेंटर सुरू केले आहेत, असेही मंत्री श्री. लोढा म्हणाले.

मंत्री दीपक केसरकर म्हणाले, कौशल्य विकास केंद्रांच्या माध्यमातून शालेय शिक्षणाला वेगळी जोड देण्यात येणार आहे. येत्या काळात प्रत्येक विद्यार्थी हा शाळा महाविद्यालयातून शिक्षणासह कौशल्य अवगत करूनच बाहेर पडणार आहे. त्यामुळे या मुलांसमोर रोजगाराच्या असंख्य संधी असतील. कारण येत्या काळात कामगारांचे महत्त्व वाढणार आहे. ज्या मुलांकडे तंत्रशिक्षण असेल त्यांना ही संधी आपोआप मिळणार आहे. मुलांनी जर विद्यार्थीदशेपासूनच कौशल्य शिक्षणाकडे लक्ष केंद्रीत केले, तर त्यांचा विकासही वेगाने होणार यात शंका नाही, असा विश्वास श्री. केसरकर यांनी व्यक्त केला. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. त्यामुळे आपल्याला मुंबई स्वच्छ, सुंदर ठेवायची असल्यास बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करणे हे प्रत्येक मुंबईकरांचे कर्तव्य आहे, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.

प्रास्ताविक करताना महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल म्हणाले की, आज जागतिक कौशल्य विकास दिवस आहे. या महत्त्वाच्या दिवशी आपण ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार मुंबईतील २५० माध्यमिक शाळांमधील ४२ हजार विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विकास शिक्षण देण्यात येणार आहे. आजच्या या लोकार्पण सोहळ्यातून आपल्याला हा टप्पा गाठण्यासाठी उर्जा मिळाली आहे, असे श्री. चहल यांनी नमूद केले.

अपर मुख्य सचिव आशीष कुमार सिंग यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, शाळांमध्ये असलेल्या रिकाम्या वर्ग खोल्यांमध्ये कौशल्य विकास केंद्रे सुरू करावीत. तसेच इयत्ता चौथीपासून विद्यार्थ्यांना कौशल्य विकासाचे धडे द्यायला हवेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

सहआयुक्त अजित कुंभार यांनी आभार मानताना कौशल्यावर आधारित शिक्षण काळाची गरज असल्याचे नमूद केले.

सर्व मान्यवरांनी कौशल्य विकास केंद्राचे मुख्य नियंत्रण कक्ष आणि प्रशिक्षण केंद्राला भेट दिली. मध्यवर्ती कौशल्य विकास केंद्राची उभारणी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे अधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

विद्यार्थ्यांना व्यवसायाभिमुख शिक्षण मिळणार

महाराष्ट्र राज्य कौशल्य, उद्योजकता, नाविन्यता विभाग, शालेय शिक्षण विभागआणि मुंबई महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रँट रोड येथील जगन्नाथ शंकरशेट नाना चौक माध्यमिक शाळेत पथदर्शी तत्त्वावर विद्यार्थ्यांना व्यावसायिकाभिमुख शिक्षण मिळणार आहे. यामध्ये १० अभ्यासक्रम शिकविले जाणार असून प्रयोगशाळाही विकसित करण्यात आली आहे.

शालेय विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या कौशल्य विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारने पावले उचलली आहेत. या धोरणाचा एक भाग म्हणून नवीन शैक्षणिक धोरणाअंतर्गत सरकारी माध्यमिक शाळांमध्ये कौशल्य विकास केंद्र उभारण्यात येणार आहे. यामध्ये आर्टीफिशियल इंटेलिजन्स, फॅशन डिझायनिंग, फिल्ड टेक्निशियन्स (होम अप्लायन्सेस), फिल्ड टेक्निशियन्स (ए.सी.), रोबोटिक्स, प्लंबिंग, फूड अँड बेव्हरेजेस सर्विस असिस्टंट, स्टोअर ऑपरेशन असिस्टंट, मल्टिस्किल टेक्निशियन असिस्टंट आणि मेडिकल रेकॉर्ड असिस्टंट/ जनरल ड्यूटी असिस्टंट आदी दहा अभ्यासक्रम शिकविले जाणार आहेत.

 

*****