मुलींसाठी सैनिकी सेवापूर्व प्रशिक्षण संस्था देशासाठी आदर्शवत ठरेल : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0
2

नाशिक, दि.15 जुलै (जिमाका वृत्तसेवा):राज्य शासनाने मुलींसाठी सुरू केलेली सैनिक सेवापूर्व प्रशिक्षण संस्था ही देशासाठी आदर्शवत ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज व्यक्त केला. येथील सैनिकी सेवापूर्व प्रशिक्षण संस्थेच्या उदघाटन प्रसंगी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते.

व्यासपीठावर उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ. ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, उद्योगमंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे, खासदार हेमंत गोडसे, आमदार नरेंद्र दराडे, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. माधुरी कानिटकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्ट. कमांडर ओंकार कापले, अर्जून पुरस्कार प्राप्त खेळाडू कविता राऊत, संस्थेच्या संचालिका मेजर (निवृत्त) सईदा फिरासत  आदिमान्यवरउपस्थितहोते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, महाराष्ट्रात मुलींसाठी अशा प्रकारची संस्था सुरू होणे ही गौरवास्पद बाब आहे. पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या प्रयत्नातून व पाठपुराव्यातून आज ही सैनिकी प्रशिक्षण संस्था उभी राहिली आहे. या संस्थेच्या माध्यमातून मुली देशसेवेसाठी सैन्यात दाखल होऊन त्यांना अधिकारी पदापर्यंत पोहचण्याची संधी प्राप्त होणार आहे. या मुलींना दर्जेदार सैनिकी प्रशिक्षण अनुषंगिक सेवासुविधा प्राप्त होण्यासाठी शासनाकडून निधीची कमतरता भासणार नाही. या संस्थेच्या मागे शासन खंबीरपणे उभे राहील, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सैनिकी शाळेच्या विद्यार्थिनींशी संवाद साधला.

दर्जेदार शिक्षणातून ध्येयपूर्ती साध्य होते : उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, दर्जेदार शिक्षणातून आपली ध्येयपूर्ती सिद्ध करण्यासाठी या संस्थेतून नक्कीच वाव मिळेल यात शंका नाही. आज मुली कोणत्याही क्षेत्रात मागे नाही. देशभक्तीची भावना मनात ठेवून मुलींनी या संस्थेत प्रवेश घेतला आहे, ही बाब सर्वांसाठी अभिमानास्पद आहे. महाराष्ट्राला स्त्रीशक्तीचा वारसा लाभला आहे. हाच वारसा या मुली पुढे घेऊन जातील. कोणत्याही क्षेत्रात शैक्षणिक गुणवत्ता असेल तर यशप्राप्ती नक्कीच होते. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून संस्थेला सर्वतोपरी मदत उपलब्ध करून दिली जाईल, असे श्री. पवार यांनी यावेळी सांगितले.

सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) दादाजी भुसे म्हणाले, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये मुलींना प्रवेश देण्यासाठी नाशिक येथे देशातील पहिले मुलींचे सैनिकपूर्व प्रशिक्षण सुरू झाले. ही राज्यासाठी अभिमानाची बाब आहे.

कार्यक्रमाचे प्रस्ताविकातसंस्थेच्या संचालिका मेजर (निवृत्त) सईदा फिरासत म्हणाल्या, मुलींच्या सैनिकी सेवापूर्व प्रशिक्षण संस्थेत प्रवेशासाठी महाराष्ट्रातून 4 हजार अर्ज प्राप्त झाले होते. त्यातून लेखी परीक्षेतून 150 मुलींच्या मुलाखतीतून अंतिम  30 मुलींची निवड झाली आहे. त्या मुली आज या संस्थेत प्रशिक्षण घेत आहेत. कार्यक्रमाला माजी सैनिक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0000000000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here