ई-चलनाचा दंड सुलभरित्या भरण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्यावी

मुंबई, दि. 19 : कर्तव्यदक्ष नागरिक म्हणून वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे. आपल्याकडून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन झाल्यानंतर ई-चलन कारवाई झाली आहे किंवा कसे, हे जाणून घेण्यासाठी तसेच ई-चलनचा दंड सुलभरित्या भरण्यासाठी किंवा ई-चलन संदर्भात काही तक्रार असल्यास https://mahatrafficechallan.gov.in  या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन गृह विभाग आणि वाहतूक पोलीस विभागाने केले आहे.

रस्त्यावर होणारे अपघात टाळण्यासाठी शासन सर्व प्रकारच्या उपाययोजना करीत आहे. वाहनचालकांनी नियमांचे पालन करून वाहने चालवणे आवश्यक आहे. वाहनचालकांनी स्वयंशिस्त पाळल्यास अपघात होणार नाहीत. रस्ता सुरक्षा ही निरंतर चालू राहणारी प्रक्रिया असून, महाविद्यालय व विद्यापीठ परिसरात दर महिन्याला रस्ता सुरक्षा सप्ताह पाळण्याचे ठरविण्यात आले आहे.

प्रत्येक नागरिकाने जुने वापरते वाहन खरेदी करण्यापूर्वी त्यावर झालेली ई-चलन कारवाई, ई-चलनाचा भरणा झाल्या बाबतची माहिती, याची खात्री करावी. वाहन चालक ज्या रस्त्यावरून वाहन चालवित आहे, त्या रस्त्यावरील वेग मर्यादेची खात्री करून वाहनाची वेग मर्यादा पाळावी, अन्यथा ई चलन कारवाई होवू शकते. वाहन चालवित असताना आपण नेहमी सी. सी. टी. व्ही. कॅमेऱ्याच्या निगराणी खाली आहात याची दक्षता घ्यावी.

वाहतुकीचे नियम पाळा, अपघात टाळा

सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, सर्वांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे. योग्य पध्दतीने सीट बेल्ट लावणे, दुचाकीस्वारांनी हेल्मेट वापरणे, लेनची शिस्त पाळणे यासारख्या बाबींचा अवलंब करावा, जेणेकरून ई-चलनाव्दारा होणारी कारवाई टाळता येईल.सध्या वाहतूक नियमांचे उल्लंघन करणा-या वाहनांवर ई-चलनाद्वारे कारवाई महाराष्ट्र पोलीसांकडून करण्यात येत आहे. त्यांना सहकार्य करावे.

महामार्ग सुरक्षा पथकाचे ट्विटर अकाउंट @HSPMaharashtra या नावाने चालू करण्यात आले असून, महामार्ग सुरक्षा पथकामार्फत #MahaRastaSuraksha, #MahaRoadSafety, #Highwaysafety या हॅशटॅगच्या माध्यमातून राज्यातील वाहतुकीबाबतच्या घडामोडीबाबतची माहिती दिली जात असल्याचे गृह विभाग आणि वाहतूक पोलीस विभागाने कळविले आहे.

०००

राजू धोत्रे/विसंअ/