मुंबई, दि. 21 : राष्ट्रीय हिताला बाधा पोहचविणाऱ्या तसेच राष्ट्रद्रोही कारवायांसाठी कारणीभूत ठरतील असे घटक जसे एअर मिसाईल, पॅराग्लाईडर्स, रिमोट कंट्रोल्ड मायक्रोलाईट एअरक्राफ्ट, ड्रोन, पॅरा मोटर्स, हँण्ड ग्लायडर्स हॉट एअर बलून इ. च्या उड्डाण क्रियांना 16 ऑगस्ट 2023 पर्यंत बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात बंदी घालण्यात आल्याचे पोलीस उपायुक्त, विशाल ठाकूर यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.
बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात कुठेही कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही, सामान्य जनतेला धोका उत्पन्न होणार नाही, अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना धोका निर्माण होणार नाही, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होवू नये याकरिता हे आदेश लागू आहेत. तथापि, ज्यांनी या कालावधीत पूर्व लेखी परवानगी घेतली आहे, अशांसाठी हा आदेश शिथिल असेल. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी पत्राद्वारे स्पष्ट केले आहे.
******
श्रद्धा मेश्राम/ससं/