मुंबई, दि. 19 : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येणाऱ्या एसटी प्रवासाच्या सवलत स्मार्ट-कार्ड योजनेला एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री अॅड. अनिल परब यांनी दिली.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बसस्थानकावर अनावश्यक गर्दी होऊ नये यासाठी 65 वर्षावरील जेष्ठ नागरिकांना देण्यात येणाऱ्या एसटीच्या सवलत स्मार्ट-कार्डची मुदत दि. 31 मार्च ऐवजी एक महिना वाढवून दि. 30 एप्रिल 2020 अशी करण्यात आली आहे. त्यामुळे स्मार्टकार्ड घेणाऱ्या ज्येष्ठांनी या 31 मार्चपर्यंत स्मार्ट कार्ड घेण्यासाठी घाई आणि गर्दी करू नये, असे आवाहन श्री. परब यांनी केले आहे.
सध्या एसटी महामंडळाच्या 250 आगारामध्ये तसेच महामंडळाने अधिकृतपणे नेमलेल्या खाजगी वितरकामार्फत ज्येष्ठ नागरिकांना आधार क्रमांकाशी संलग्न असलेली स्मार्ट कार्ड देण्यात येत आहेत. परंतु कोरोना विषाणूच्या संभाव्य संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आता या योजनेला तात्पुरती स्थगिती देण्यात आली असून दि. 1 एप्रिलनंतर उर्वरित ज्येष्ठ नागरिकांना स्मार्ट कार्ड देण्याची व्यवस्था पूर्ववत करण्यात येईल तोपर्यंत जुन्या पद्धतीनुसारच ज्येष्ठ नागरिकांना एसटीतून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे, असेही श्री.परब यांनी सांगितले.
0000
काशीबाई थोरात/विसंअ/19.3.2020