मुंबई, दि,29 : मालाड सामान्य रुग्णालय येथे मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर व प्रसूतीगृहामुळे रुग्णांना निर्जंतुक वातावरण उच्च प्रतीची आरोग्य सेवा मिळणार असून, माता मृत्यू तसेच नवजात शिशू मृत्यूदराचे प्रमाण कमी करण्यास मदत होईल. तसेच आगामी तीन महिन्यात दहा डायलेसिस मशीन देखील बसवण्यात येणार आहेत अशी माहिती कौशल्य,रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली.
मालाड येथील सामान्य रुग्णालय येथे शस्त्रक्रिया गृह व प्रसूतीगृहाचे अत्याधुनिकरण या कामाचे उद्घाटन करताना पालकमंत्री श्री. लोढा बोलत होते. यावेळी खासदार गोपाळ शेट्टी, आमदार योगेश सागर, स्थानिक नगरसेवक, सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी, व इतर अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. लोढा म्हणाले, जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून या कामासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या सामान्य रुग्णालयात मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर व प्रसूतीगृह हे प्रतिजैविक व पृष्ठभाग (Antimicrobial surface) व निर्जंतुकीकृत हवा ( Laminar sterilized air flow) असल्यामुळे रुग्णांना कोणत्याही प्रकारे तीव्र संसर्ग आणि इतर रोगराईपासून प्रतिबंध करण्यास सहाय्य ठरणारी अशी ही यंत्रणा आहे. या नव्या सुविधेमुळे रुग्णांना निर्जंतुक वातावरण, उच्च प्रतीची आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहे. देशात माता व नवजात शिशू मृत्युचे मुख्य कारण हे जंतूसंसर्ग (इन्फेक्शन्स) आहे. हा धोका कमी करून मॉड्यूलर प्रसूतीगृह हे जंतूसंसर्गाचा धोका कमी करून माता मृत्यू तसेच नवजात शिशू मृत्यदराचे प्रमाण कमी करण्यास साह्यभूत ठरेल. राज्य शासनाचे एकमेव सामान्य रुग्णालय मुंबई उपनगरात कार्यरत असून ते अद्ययावत मॉड्युलर ऑपरेशन थिएटर व मॉड्युलर प्रसूतीगृह याने सुसज्ज करण्यात आल्याचे मंत्री श्री. लोढा यांनी सांगितले.
0000