शासकीय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीत महसूल विभाग आघाडीवर- पालकमंत्री दादाजी भुसे

0
12

नाशिक, दिनांक 1 ऑगस्ट, 2023 (जिमाका वृत्तसेवा): जिल्ह्यातील सामान्य नागरिकांना महसूल विभागामार्फत सद्यस्थितीत विविध 132 योजनांचा लाभ देण्यात येत आहे. या योजनांच्या अंमलबजावणीसाठी महसूल विभाग आघाडीवर असून यापुढेही योजनांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी केले.

आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आयोजित महसूल दिनाच्या औचित्याने महसूल सप्ताहाचे उद्घाटन पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार सीमा हिरे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे (नाशिक), माया पाटोळे (मालेगाव) यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

पालकमंत्री दादाजी भुसे म्हणाले, लोकाभिमुख कामांचा निपटारा करण्यासाठी तसेच महसूल विभाग अधिक लोकाभिमुख होण्यासाठी यावर्षी आजपासून 7 ऑगस्ट पर्यंत महसूल सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रशासनात गतिमानता आणण्यासाठी बहुतांशी योजना या ई प्रणालीच्या माध्यमातून राबविण्यात येत आहेत. या ई प्रणालीमुळे वेळेसोबतच इतर अनुषंगिक साधन सामुग्रीची बचत होत आहे. गतिमान शासन व प्रशासनाच्या बळकटीकरणासाठी जिल्हा नियोजनाचा निधी काही प्रमाणात राखीव ठेवण्यात येणार आहे. ई प्रणालीच्या वापरासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या धर्तीवर राज्य शासन देखील नमो शेतकरी या योजनेच्या माध्यमातून वर्षाला सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट वर्ग करण्यात येणार आहे. यासाठी येत्या महिनाभरात या योजनेचा पहिला हप्ता थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार असल्याने पात्र लाभार्थ्यांची नोंद ई प्रणाली द्वारे करण्यासाठी ही योजना कृषि विभाग, महसूल व ग्रामविकास विभाग यांनी संयुक्तपणे मोहिमस्तरावर राबवावी, असेही पालकमंत्री श्री. भुसे यांनी यावेळी सांगितले.

सर्वांनी आपली कर्तव्ये जबाबदारीने पार पाडावीत : मंत्री छगन भुजबळ

महसूल विभाग हा राज्य शासनाचा अतिशय महत्वाचा विभाग असल्याने अधिकारी व कर्मचारी यांनी आपली कर्तव्ये अधिक जबाबदारीने पार पाडावीत, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

पृथ्वी ही श्रमिकांच्या खांद्यावर उभी आहे, असे तत्वज्ञान सांगणाऱ्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करून मंत्री छगन भुजबळ म्हणाले, प्रत्येक अधिकारी व कर्मचारी यांच्या कामावर शासनाचे कर्तृत्व अवलंबून आहे. महसूल विभाग हा राज्य शासनाचे नाक, कान व डोळे अशी महत्वाची भूमिका बजावित असल्याने सर्वांनी जनतेसाठी असणाऱ्या योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहचविण्यासाठी सहकार्याच्या भावनेतून काम करावे. तसेच येणाऱ्या अडचणींचा सामना करण्यासाठी सामुदायिक प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे सांगत मंत्री छगन भुजबळ यांनी सर्व महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना महसूल दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी महसूल दिनाच्या शुभेच्छा देतांना आजपासून सुरू करण्यात आलेला महसूल सप्ताह हा अतिशय स्तुत्य उपक्रम असल्याचे सांगितले.

जनतेची कामे वेळेत होण्यासाठी प्रशासनात ई प्रणालीचा वापर करण्यात येत असून या अनुषंगाने विभागीय आयुक्त कार्यालयात 100 टक्के ई ऑफीस सुरू करण्यात आले आहे. त्याच धर्तीवर जिल्हाधिकारी कार्यालयात देखील ई ऑफीस सुरू करण्यात येत असून गतिमान प्रशासनाकडे टाकलेले हे पहिले पाऊल आहे, असे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सांगितले. तसेच विभागात ई प्रणालीच्या माध्यमातून  प्रत्येक तालुक्यात एक हेल्पडेस्क तयार करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे ई पंचनामे करतांना अतिवृष्टीच्या बाबत येणाऱ्या अडचणी लक्षात घेवून प्रत्येक मंडळात पर्जन्यमापक यंत्रणा लावण्यात आली आहे, या यंत्रणेच्या मदतीने ई पंचनाम्याची प्रक्रीया सोपी होणार आहे. यासोबतच डिजिटल सातबारा, ई पीक पाहणी अशा विविध ऑनलाइन सेवांची देखील थोडक्यात माहिती विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिली.

कार्यक्रमा दरम्यान नाशिक तहसिल कार्यालयास एक व्हि.सी. यंत्रणा व संजय गांधी निराधार शाखेस संगणक संच यावेळी देण्यात आला. तसेच जिल्ह्यात ई शिधापत्रिका देण्याचे सुनिश्चित झाले असल्याने मान्यवरांच्या हस्ते समीर सुभाष हिंगणे, संदिप तुकाराम कांडरकर, विजय संभाजी चव्हाण, अभिषेक कैलास सातळे, स्वाती जयंत घोडके यांना प्रातिनिधीक स्वरूपात ई शिधापत्रिकांचे वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे जिल्हा नियोजन निधीतून जिल्ह्यातील 12 तहसिल कार्यालयांसाठी वाहनांचे लोकार्पण करण्यात आले.

कार्यक्रमाच्या सुरूवातीला अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ व सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) दादाजी भुसे यांनी लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले.

त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. गेल्या वर्षभरात महसूल विभागाने केलेल्या कामांची माहिती जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी आपल्या प्रास्ताविकात दिली. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन नाशिकचे अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांनी तर उपस्थितांचे आभार मालेगावच्या अपर जिल्हाधिकारी माया पाटोळे यांनी मानले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here