पात्र शेतकऱ्यांना कृषी योजनांचा लाभ देण्यासाठी अनुषंगिक बाबींची पूर्तता तातडीने करावी- पालकमंत्री दादाजी भुसे

नाशिक, दि. 1 ऑगस्ट, 2023 (जिमाका वृत्तसेवा) :
जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना कृषी योजनांचा लाभ प्रदानासाठी आवश्यक असलेल्या
अनुषंगिक बाबींची पूर्तता कृषी विभागाने मोहीम स्तरावर तातडीने पूर्ण करावी, अशा
सूचना राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री
दादाजी भुसे यांनी दिल्या.
आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात पीएम किसान सन्मान योजना व
नियमित पीककर्जाची फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोहत्सानपर अनुदान योजना बाबतच्या
आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे,
जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, जिल्हा
उपनिबंधक सहकारी संस्था, नाशिक फयाज मुलाणी, उपिभागीय कृषी अधिकारी गोकुळ
वाघ, लिड बँक मॅनेजर राजेश पाटील, तहसिलदार परमेश्वर कासुळे यांच्यासह तालुका कृषी
अधिकारी उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री दादाजी भुसे म्हणाले, पीएम किसान सन्मान योजनेद्वारे दर चार
महिन्यांनी दोन हजार रूपये केंद्र शासनाच्या वतीने शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले
जातात. पुढील महिन्यांत राज्य शासनाच्या वतीने पीएम किसान योजनेच्या धर्तीवर नमो
शेतकरी योजनेच्या माध्यमातून सुद्धा दोन हजार रूपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले
जाणार आहेत. अंदाजे 2 लाख शेतकऱ्यांची या योजनेच्या लाभासाठी आवश्यक असलेल्या
कागदपत्रांची अद्याप पूर्तता होणे बाकी आहेत. या 2 लाख शेतकऱ्यांना लाभ प्रदानासाठी
आधार लिंकींग, ई-केवायसी, मयत शेतकऱ्याचे वारस त्याचप्रमाणे निकषानुसार पात्र परंतु
ज्यांची नोंदणी झालेले नाही असे शेतकरी यानुसार वर्गवारी करण्यात यावी. महसूल
सप्ताहाच्या निमित्ताने स्थानिक पातळीवर कृषी अधिकारी व कर्मचारी यांना कामासाठी
गावनिहाय याद्या सोपवून एक आठवड्याच्या आत ही पूर्तता करण्याचे निर्देश आज
पालकमंत्री दादाजी भुसे यांनी बैठकीत दिले.

यावेळी पालकमंत्री दादाजी भुसे यांनी उपस्थित जिल्हा अग्रणी बँक मॅनेजर यांच्याकडून
बँकाकडून नियमित कर्जफेड करणारे शेतकरी, पहिल्या हप्त्याचा लाभ मिळालेले शेतकरी,
शेतकऱ्यांना प्रदान झालेल्या लाभाबाबत आढावा घेतला. यावेळी बँक अधिकाऱ्यांची
एकत्रित बैठक अयोजित करण्याबाबत पालकमंत्री श्री.भुसे यांनी सूचना दिल्या.