रत्नागिरीला राज्यात प्रथम क्रमांकावर ठेवण्यासाठी महसूल विभाग काम करेल- पालकमंत्री उदय सामंत

0
12

रत्नागिरी, दि. १ (जिमाका) : छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या महसूल विभागाची पुढे लोकराजा राजश्री शाहू महाराजांनी आणखी विविधांगी रचना केली. याचा आदर्श घेऊन महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी विविध विभाग केले. राज्यात रत्नागिरी जिल्हा प्रथम क्रमांकावर राहील, असे साजेसे काम महसूल विभाग करेल, अशी खात्री पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.

जिल्ह्यात १ ते ७ ऑगस्ट महसूल सप्ताह विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहाचा शुभारंभ येथील अल्पबचत सभागृहात पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत करण्यात आला. याप्रसंगी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, प्रांताधिकारी जीवन देसाई, माजी जि.प. सदस्य महेश ऊर्फ बाबू म्हाप, माजी नगराध्यक्ष राहूल पंडित, जिल्हा नियोजन समितीचे निमंत्रित सदस्य प्रकाश साळवी आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले, जनतेला त्रास होणार नाही, अशा प्रकारची कार्यवाही महसूल विभागाकडून जिल्ह्यात केली जात आहे, याचा पालकमंत्री म्हणून मला सार्थ अभिमान आहे. आपण काय केलं, काय करणार आहोत, याचं आत्मचिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याचा आजचा दिवस आहे. शासन आपल्या दारी हा मोठा कार्यक्रम झाला. याच रत्नागिरी पॅटर्नवर राज्यात कार्यक्रम होत आहेत. यात महसूलचा सिंहाचा वाटा आहे. महसूल यंत्रणेने गावापर्यंत पोहचून लाभार्थी शोधले. त्याचं कौतुक मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केलं. त्यामुळे आता आपली जबाबदारी वाढली आहे. अशीच कार्यप्रणाली सुरु ठेवा.

माणसानं चांगलं काम केलं की, त्याचा मान वाढतो आणि खुर्चीचाही वाढतो. आज संकल्प करा, की नियमातलं काम होणार नसेल तर, त्याला तसे हसत सांगा. शांतपणे, नम्रपणे बोला. नियमामधील कामे पूर्ण करुन सर्वसामान्य जनतेचे आशीर्वाद मिळावा, असेही ते म्हणाले.

…मनावरील बोजा दूर करा

राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, मंत्री या सर्वांचा सातबारा तुमच्या हातात असतो. कोणावरही बोजा चढवू शकता, बाजूलाही करु शकता. माणसाच्या मनावरील बोजा दूर करा, येणाऱ्या सर्वसामान्यांशी शांतपणे, नम्रपणे बोला, असा मौलीक सल्लाही पालकमंत्री श्री. सामंत यांनी दिला.

जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनी महसूल विभागाच्या कामकाजाचा आढावा आपल्या भाषणातून दिला. ते म्हणाले, जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी महसूल अधिकारी, कर्मचारी झटत असतात. मागील वर्षी ११२ कोटींची वसुली केली आहे. २१९ अतिक्रमणे काढून पाणंद रस्ते मोकळे केले आहेत. अकृषक आकारणी १०० टक्के करण्यात आली आहे. सलोखा योजनेंतर्गत ५४ अर्जांपैकी १६ समुपदेशाने निर्गमित तर,  ३८ प्रकारणात कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. वारस नोंदीचा निपटारा करण्यासाठी विशेष मोहीम घेण्यात आली आहे.

यावेळी शैक्षणिक क्षेत्रात उत्तम गुण मिळविणाऱ्या पाल्यांचा तसेच कोतवाल, पोलीस पाटील, वाहनचालक, तलाठी, महसूल सहाय्यक, मंडळ अधिकारी, लघुलेखक, तहसीलदार, उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. तहसीलदार तेजस्विनी पाटील यांनी सर्वांचे आभार मानले.

क्षणचित्रे :-

— शहापूर दुर्घटनेतील मृतांना श्रध्दाजंली वाहण्यात आली.

–पुष्पगुच्छाऐवजी शब्दसुमनांनी स्वागत करण्याचे पालकमंत्र्यांचे आवाहन.

–शहरातील वाईट प्रथा ठेचणाऱ्या पोलीसांचे पालकमंत्र्यांकडून कौतुक

–हसत हसत कार्यवाही करणाऱ्या  पोलीस अधीक्षकांचे दिलखुलास कौतुक

–अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करण्यासाठी पालकमंत्र्यांचा आग्रह.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here