उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कलादिग्दर्शक नितीन देसाई यांना श्रद्धांजली

0
3

मुंबई, दि. 2 :- “कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्या आत्महत्येची बातमी ऐकून धक्का बसला. महाराष्ट्राच्या कला, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील अनेकांशी निकटचे, मित्रत्वाचे संबंध असलेल्या नितीन देसाईंचं अशा पद्धतीनं अचानक निघून जाणं अनाकलनीय, अविश्वसनीय, मनाला चटका लावणारं आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नितीन देसाई यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन श्रद्धांजली वाहिली आहे.

नितीन देसाई कलादिग्दर्शनाच्या क्षेत्रात सर्वोच्चस्थानी होते. कलादिग्दर्शक असण्याबरोबरच निर्माता, दिग्दर्शक, अभिनेते म्हणूनही त्यांनी कर्तृत्वाचा ठसा उमटवला होता. ‘1942 अ लव्ह स्टोरी’, ‘हम दिल दे चुके सनम’, ‘माचिस’, ‘देवदास’, ‘लगान’, ‘जोधा अकबर’ यांसारख्या सुपरहिट सिनेमाचे कला दिग्दर्शन त्यांनी केले. चारवेळा सर्वोत्कृष्ट कलादिग्दर्शनासाठीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळवला. जागतिक दर्जाच्या एनडी स्टुडीओ निर्मितीतून सौंदर्यदृष्टीचं, कलागुणांचं, ध्येयवेडाचं दर्शन घडवलं.

हिन्दी चित्रपटसृष्टी आणि कलेच्या क्षेत्रात नितीन देसाईंसारखा मराठी तरुण आपलं स्वतंत्र स्थान निर्माण करुन आहे, याचा महाराष्ट्राला अभिमान होता. महाराष्ट्र शासनाच्या प्रत्येक उपक्रमाला त्यांचं मनापासूनचं सहकार्य असायचं. महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या सुवर्णममहोत्सवाच्या आयोजनात त्यांनी सर्वस्व झोकून काम केलं. प्रजासत्ताकदिनी कर्तव्यपथावर होणाऱ्या संचालनात महाराष्ट्राचा चित्ररथ तयार करण्यात त्यांची नेहमीच मदत व्हायची. हिन्दी चित्रपटसृष्टीसारख्या झगमगाटात राहूनही त्यांचं वागणं साधं, विनम्र होतं. त्यांच्या निधनानं भारतीय कलासृष्टीचं, महाराष्ट्राचं मोठं नुकसान झालं आहे. मी  नितीन देसाईंच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी असून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो, अशी प्रार्थना करतो,” अशी शोकसंवेदना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली आहे.

०००००००००००००००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here