जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून महिला बचतगटांच्या सक्षमीकरणासाठी निधी उपलब्ध करून देणार : पालकमंत्री दादाजी भुसे

0
3

नाशिक, दिनांक: 14  (जिमाका वृत्त): महिला बचत गट तयार करीत असलेल्या विविध उत्पादनांसाठी लागणारी अत्याधुनिक साधन-सामुग्री उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे प्रतिपादन पालकमंत्री दादाजी भुसे यांनी केले. आज येथील पंचायत समिती नाशिकच्या आवारात आयोजित उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत रानभाज्या महोत्सव व राखी महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी पालकमंत्री दादाजी भुसे बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर आमदार हिरामण खोसकर, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अर्जून गुंडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे, पंचायत समिती गट विकास अधिकारी सोनिया नाकाडे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री दादाजी भुसे म्हणाले, महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नत्ती अभियानातून अनेक दुर्गम भागात आदिवासी महिला व बचतगट यांना रोजगार निर्मितीस चालना मिळाली आहे. या बचत गटांना गरजेनुसार साहित्याची उपलब्धता व्हावी व उत्पादित मालाची विक्री होण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधीची उपलब्धता केली जाणार आहे. रानभाजी महोत्सवासोबतच आज राखी महोत्सव आणि बचतगटांनी तृणधान्यापासून तयार केलेले  पौष्टिक खाद्यपदार्थ व कलाकुसरीच्या वस्तूंचे स्टॉल्स येथे नाशिककरांना उपलब्ध झाले आहेत. वाढते प्रदूषण व रासायनिक खते, तणनाशकाच्या फवारणीद्वारे पिकविलेला भाजीपाला यामुळे होणाऱ्या दुष्परिणामास आपणास आज  सामोरे जावे लागत आहे. परंतु निसर्गात पिकलेला भाज्यांचे औषधी गुणधर्म आणि आरोग्याच्या दृष्टीने महत्त्व असाधारण स्वरूपाचे आहे. कोरोना काळात सर्वांना जीवनाचे महत्त्व समजले असून हे वर्ष जागतिक तृणधान्य वर्ष म्हणून जगभरात साजरे होत आहे. दैनंदिन आहारात पौष्टिक तृणधान्याचा समावेश आपण वाढविला पाहिजे, असे पालकमंत्री श्री. भुसे यांनी सांगितले.

मंत्री श्री.भुसे पुढे म्हणाले, रानभाजी महोत्सव हा आजपासून 31 ऑगस्ट पर्यंत सुरू राहणाार आहे. परंतु यांनतरही महिला बचतगटांनी तयार केलेले खाद्यपदार्थ,वस्तू यांच्या विक्रीसाठी जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांच्या आवारात महिला बचतगटांना स्टॉल्ससाठी प्रशासनाच्या माध्यमातून जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. यामुळे महिला बचत गटांना आर्थिक उभारी मिळण्यास नक्कीच मदत होईल यात शंका नाही. राखी पौर्णिमा हा पवित्र सण आहे. आज Bonding Stories या ब्रँण्डचे आनावरण झाले असून या ब्रँण्डच्या माध्यमातून कल्पकतेने तयार केलेल्या विविध प्रकारच्या राख्या व भेटवस्तू नाशिककरांना उपलब्ध झाल्या आहेत. सर्व नागरिकांनी या महोत्सवास भेट देवून आरोग्यवर्धक रानभाज्या व बनविलेल्या वस्तू खरेदी कराव्यात तसेच रानभाज्या बनविण्याची पाककृतीची माहिती जाणून घ्यावी, असे आवाहन पालकमंत्री दादाजी भुसे यांनी केले.

मालेगावच्या पॉवर लूम उत्पादनास मुल्यवर्धनातून बळकटी देण्यास प्रयत्न करणार : राधाकृष्ण गमे

विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यावेळी बोलतांना म्हणाले, मालेगाव शहरात अनेक पॉवर लूम्स आहेत. त्यातून तयार होणारे कापड उत्पादन हे स्थानिक बाजरपेठ नसल्यामुळे विक्रीसाठी बाहेर पाठविले जाते. परंतु  जिल्ह्यातच या कापड उत्पादनास विक्री व्यवस्था तयार केली तर  लूम कारागीर हे मुख्य प्रवाहात येऊन त्यांचेही जीवनमान उंचावण्यास नक्कीच हातभार लागणार आहे. त्यामुळे या उत्पादनास जिल्हास्तरावर मुल्यवर्धनातून बळकटी देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे विभागीय आयुक्त श्री. गमे यांनी यावेळी सांगितले.

जिल्ह्यात आज आपण रानभाजी महोत्सवाचे तिसरे वर्ष साजरे करीत आहोत. बचतगटांच्या उत्पादनांची ऑनलाईन विक्री करतांना बचतगटांनी आवश्यक परवाना प्राप्त करून घ्यावा. त्यासोबतच बचतगटांनी खाद्यपदार्थांच्या पॅकेटसवर त्यात वापरलेले विविध अन्नपदार्थ, त्यातून मिळणारे उष्मांक व त्याची वापर करण्याची वैधता दिनांक हे नमूद केल्यास निश्चितच ग्राहकांची विश्वासार्हता वाढून उत्पादनवाढीस चालना मिळेल असा विश्वास विभागीय आयुक्त श्री. गमे यांनी यावेळी व्यक्त केला. बचतगटांनी पाणवेलींपासून तयार केलेल्या वस्तूंना बाजरपेठ मिळण्यासाठी  प्रशासनाकडून विशेष प्रयत्न करण्यात येणार आहे. यामुळे नदी प्रदुषणासही आळा बसून बचतगटांना उभारी मिळणार असल्याचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी यावेळी सांगितले.

जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, रानभाजी महोत्सव व प्रदर्शनाच्या आयोजनात उमेदची भूमिका निश्चितच महत्वाची असून हा उपक्रम स्तुत्य आहे. जागतिक स्तरावर हे वर्ष तृणधान्य वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. बचतगटांच्या माध्यमातून प्रक्रिया उद्योगातून अनेक पदार्थ तयार करून विक्री केले जात आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातही या उत्पादनांच्या विक्रीसाठी जागा उपलब्ध करून देणार असल्याचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी सांगितले.

सुरवातीला पालकमंत्री दादाजी भुसे यांनी रानभाजी महोत्सवाचे फित कापून उदघाटन केले. पालकमंत्री दादाजी भुसे, आमदार हिरामण खोसकर, विभागीय राधाकृष्ण गमे यांनी महोत्सवात उभारलेल्या विविध स्टॉलल्सला भेट दिली. यावेळी पौष्टिक तृणधान्य व रानभाज्या पाककृती पुस्तिका व रानभाज्यांच्या विविध रेसीपीच्या क्युआर कोडचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यासोबतच TATVA (तत्व) ब्रँण्ड, Bonding Stories ब्रॅण्ड आणि Goda valley kart या पोर्टलचे आनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमांचे प्रास्ताविक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी केले. दुर्मिळ रानभाज्या व त्यातील औषधी गुणधर्माचे महत्त्व शहरी भागातील नागरिकांना कळावे, त्यांची चव घेता यावी याकरिता आजपासून 31 ऑगस्ट पर्यंत नाशिक पंचायत समितीच्या आवारात सकाळी 10.00 ते दुपारी 4.00 यावेळेत रानभाज्या महोत्सव व राखी महोत्सव सुरू राहणार असून नागरिकांनी महोत्सवास भेट द्यावी, असे आवहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी प्रास्ताविकात केले. यावेळी आमदार हिरामण खोसकर व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

0000000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here