ललित कला अकादमीचे विभागीय केंद्र महाराष्ट्रात सुरु करण्यासाठी केंद्र व राज्याकडे पाठपुरावा करण्याचे राज्यपालांचे आश्वासन

मुंबई, दि. 20 : नवी दिल्ली येथील ललित कला अकादमीचे विभागीय केंद्र महाराष्ट्रात लवकरात लवकर सुरु व्हावे यासाठी आपण व्यक्तिशः लक्ष घालू तसेच केंद्र आणि राज्य शासनाकडे पाठपुरावा करु, असे आश्वासन राज्यपाल रमेश बैस यांनी दिले. सर ज.जी. उपयोजित कला महाविद्यालय येथील प्राध्यापक डॉ. गजानन शेपाळ यांच्या वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या दृश्यकला विषयक लेखांचे संकलन असलेल्या ‘रंगसभा’ या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल श्री. बैस यांच्या हस्ते महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडले, त्यावेळी ते बोलत होते.

राज्यपाल श्री.बैस म्हणाले, सर्जनशील आणि सांस्कृतिक उद्योग क्षेत्र जगातील अर्थव्यवस्थेत सर्वाधिक गतीने वाढणारे क्षेत्र आहे. कलात्मक वस्तूंचा जागतिक व्यापार सातत्याने वाढत आहे व या क्षेत्रात रोजगाराच्या प्रचंड संधी निर्माण होत आहेत. या संधींचा कलाकारांनी लाभ घ्यावा. कला, शिल्पकला, वारसा, संगीत या क्षेत्रात खासगी क्षेत्राने देखील गुंतवणूक करावी. राज्यातील कला महाविद्यालयांमध्ये हजारो विद्यार्थी कला शिक्षण घेत आहेत. या महाविद्यालयांचे बळकटीकरण करून त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण केले पाहिजे. या दृष्टीने कला संस्थांमधील शिक्षकांची रिक्त पदे भरण्याबाबत आपण शासनाला सूचना करू, असेही राज्यपालांनी सांगितले.

आदिवासी समाज तसेच ग्रामीण भागात लोक घरी चित्र लावतात किंवा रांगोळी काढतात. त्याचप्रमाणे शहरातील लोकांना देखील आपल्या घरी, भिंतींवर कलाकृती असावी असे वाटते. मात्र कलाकृती जनसामान्यांना परवडणाऱ्या असल्या पाहिजेत. तसे झाल्यास कलेचे लोकशाहीकरण होईल, असे राज्यपालांनी सांगितले.  गजानन शेपाळ यांनी राज्यातील अनेक ज्ञात व अज्ञात दृश्य कलाकारांना तसेच कला संस्थांना आपल्या लिखाणाच्या माध्यमातून प्रकाशात आणल्याबद्दल राज्यपालांनी त्यांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाचे आयोजक असलेल्या मराठी वृत्तपत्रलेखक संघ मुंबईने अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण केल्याबद्दल राज्यपालांनी संस्थेचे अभिनंदन केले.

प्रकाशन सोहळ्याला ललित कला अकादमीचे माजी अध्यक्ष डॉ. उत्तम पाचरणे, मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईचे अध्यक्ष रवींद्र मालुसरे, ज्येष्ठ पत्रकार विवेक सबनीस, उपयोजित कला महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. संतोष क्षीरसागर तसेच कला क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

०००

Maharashtra Governor releases Gajanan Shepal’s book ‘Ranga Sabha

Mumbai 20 : Maharashtra Governor Ramesh Bais released the book ‘Rang Sabha’ authored by Prof Ganajan Shepal at Sir J J School of Applied Art in Mumbai on Sat (19 Aug).

Speaking on the occasion, the Governor said he will put his best efforts to establish the Sub Centre of Lalit Kala Academy in Maharashtra. The Governor said the Creative and Culture Industry is among the fastest growing industries in the world having immense potential for job creation. In this connection, he called for efforts to strengthen art institutions in the State.

Former Chairman of Lalit Kala Academy Dr Uttam Pacharne, author Dr Gajanan Shepal, President of Marathi Vruttapatra Lekhak Sangh Mumbai Ravindra Malusare, senior journalist Vivek Sabnis and invitees were present.

The book ‘Rang Sabha’ is a compilation of the published articles of Dr Shepal, covering the life and work of 100 visual artists and art institutions.

000