मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन

0
2

मुंबई, दि. २४ : राष्ट्रीयस्तरावर प्रतिभेची मोहोर उमटवण्याची आपल्या चमकदार कामगिरीची परंपरा यंदाही मराठी चित्रपट क्षेत्राने कायम राखली आहे, याचा अभिमान आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये स्थान पटकावणाऱ्या चित्रपटांशी निगडीत सर्वच निर्माते-दिग्दर्शक, कलावंत, तंत्रज्ज्ञांचे कौतुक करून, त्यांचे अभिनंदन केले आहे.

            सन २०२१ करिताच्या ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये ‘गोदावरी (दि होली वॉटर)’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाकरिता निखिल महाजन यांना उत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार, ‘एकदा काय झालं’ या सलील कुलकर्णी दिग्दर्शित चित्रपटाला उत्कृष्ट मराठी चित्रपट, तर दिग्दर्शक शेखर बापू रणखांबे यांच्या ‘रेखा’ चित्रपटाला परीक्षकांचा विशेष पुरस्कार मिळाला आहे.

            या सर्वांचे अभिनंदन करताना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी म्हटले आहे की, मराठी चित्रपटसृष्टीला गौरवशाली परंपरा आहे. कला क्षेत्रातील आधुनिक प्रवाह, तंत्रज्ञानाचे बदल आत्मसात करून मराठी चित्रपटांनी नेहमीच विषयांच्या हाताळणीत वैविध्य राखले आहे. त्यामुळेच राष्ट्रीय पुरस्कारांच्या यादीत मराठी चित्रपटांनी नेहमीच चमकदार कामगिरी नोंदवली आहे. हीच परंपरा यंदाही पुरस्कार पटकावणाऱ्या चित्रपटांचे निर्माते-दिग्दर्शक, कलावंत आणि तंत्रज्ज्ञ यांनी आपल्या सांघिक प्रयत्नातून कायम राखली आहे, हे महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद आहे. ही परंपरा कला क्षेत्रातील होतकरूंसाठी प्रेरणादायी ठरेल, असेही नमूद केले आहे. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा राष्ट्रीय पुरस्कार पटकावणाऱ्या श्री. महाजन यांचे देखील मुख्यमंत्र्यांनी विशेष अभिनंदन केले आहे.

0000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here