कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कायमस्वरूपी दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच बैठक – ग्रामविकास, पंचायत राज व पर्यटन मंत्री गिरीष महाजन

नाशिक, दिनांक: 25 ऑगस्ट, 2023 (जिमाका वृत्त): राज्य शासन नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी असून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कायमस्वरूपी दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार यांच्या समवेत लवकरच बैठक घेण्यात येईल. अशी माहिती ग्रामविकास, पंचायत राज व पर्यटन मंत्री गिरीष महाजन यांनी दिली.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयात कांदा प्रश्नाबाबात आढावा घेण्यासाठी श्री. महाजन यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, सहाय्यक निबंधक राजीव इप्पर, माजी आमदार संजय पवार, व्यापारी प्रतिनिधी सोहनलाल भंडारी, बाजार समिती प्रतिनिधी बाळासाहेब क्षीरसागर, संजय सोनवणे, यतिन कदम, नितिन करंजकर, कैलास भाबड,  एन. सी. सी. एफ. चे प्रतिनिधी एम परिक्षित, नाफेडचे प्रतिनिधी निखिल पाळदे यांच्यासह शेतकरी, व्यापारी व जिल्ह्यातील विविध बाजार समित्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

मंत्री महाजन पुढे म्हणाले की, यावर्षी पाऊस कमी पडल्यामुळे भविष्यात कांद्याचे उत्पादन कमी होणार आहे. त्याचबरोबर देशातील कांदा देशाबाहेर गेला तर देशात कांदा टंचाई भासून कांद्याची भाववाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही बाब लक्षात घेवून केंद्र सरकारने शेतकरी व ग्राहक हितास प्राधान्य देवून कांदा निर्यातीवर शुल्क लागु केले आहे. असे असले तरीही शेतक-यांचे नुकसान होवू नये याकरिता नाफेड व एन सी सी एफ यांच्यामार्फत 2410 रूपये प्रति क्विंटल दाराने शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करण्यात येत आहे. सध्या नाशिक जिल्ह्यात 40 कांदा खरेदी केंद्र सुरू असून अजून 10 खरेदी केंद्र वाढविण्याच्या सूचना नाफेड व एन.सी.सी.एफ यांना देण्यात आल्या आहेत.

त्याचसोबत यापूर्वी नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान लक्षात घेता कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 350 रूपये प्रति क्विंटल अनुदान राज्य शासनाने जाहीर केले आहे. या अनुदानापोटी राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 865 कोटी रूपयांचे अनुदान मिळणार असून त्यापैकी 465 कोटी रूपये वितरित करण्यास नुकतीच राज्य शासनाने मंजुरी दिली आहे तर उर्वरित अनुदानही लवकरात लवकर देण्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यात येणार आहे. तसेच कांदा प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार यांच्यासह अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे, कृषीमंत्री धनंजय मुंढे, जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसह शेतकरी, व्यापारी व बाजार समितीचे प्रतिनिधी यांची एकत्रित बैठक लवकरच मंत्रालयात घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी पिकविलेल्या कांद्याची दिर्घकाळ साठवणूक करता येण्यासाठी कांदाचाळीचे अनुदान वाढविण्याबाबत शासनस्तरावर विचार करण्यात येईल. त्याचबरोबर शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होवू नये यासाठी नाफेड व एन सी सी एफ चे अधिकारी यांनी विशेष दक्षता घेण्याच्या सूचनाही मंत्री गिरीष महाजन यांनी दिल्या. यावेळी मंत्री गिरीष महाजन यांनी कांदा उत्पादक शेतकरी, व्यापारी व बाजार समितीचे प्रतिनिधी यांच्याशी सविस्तर चर्चा करून त्यांच्याही समस्या जाणून घेतल्या.

000