उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळ स्पर्धेत अधिकाधिक मंडळांनी सहभाग घ्यावा- उपमुख्यमंत्री

0
3

पुणे, दि. २८: राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागाकडून उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. अधिकाधिक मंडळांनी या स्पर्धेत सहभाग घ्यावा, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

उपमुख्यमंत्री श्री.पवार आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयात गणेशोत्सव नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. बैठकीस आमदार माधुरी मिसाळ, विभागीय आयुक्त सौरभ राव, पोलीस आयुक्त रितेश कुमार, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले, गणेशोत्सव साजरा करताना वाहतुकीला अडथळा येणार नाही याची गणेश मंडळांनी दक्षता घ्यावी. मेट्रो प्रशासनाने उत्सव काळात मेट्रो सेवा रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवण्याबाबत विचार करावा. गणेश मूर्तीच्या उंचीवर शासनाने कोणतीही मर्यादा घातलेली नाही, मात्र गणेश मूर्ती विसर्जन करताना प्रदूषण होणार नाही आणि उत्सवाचे पावित्र्य जपले जाईल याची दक्षता घ्यावी. गणेश मूर्ती संकलनात जनतेच्या भावनांना धक्का लागणार नाही याकडेही लक्ष द्यावे.

धनकवडी भागातील मंडळांनी एकत्रितरित्या विसर्जन मिरवणूक काढण्याचा सुरू केलेला उपक्रम अनुकरणीय असून इतरही मंडळांनी तसा प्रयत्न करावा. पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने रस्त्यावरील उघडे चेंबर्स बंद करण्याची कारवाई त्वरित करावी. मिरवणूक मार्गावरील रस्त्यातील खड्डे बुजविण्याचे कामही उत्सवापूर्वी करण्यात यावे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी काही भागातील मार्गावर असलेली एकतर्फी वाहतूक शक्य असल्यास दुतर्फा सुरू करण्यात यावी. मानाच्या गणपतींसोबत इतरही मंडळांसोबतही खेळीमेळीचे वातावरण ठेवत त्यांच्या समस्या प्रशासनाने दूर कराव्यात. पुण्यातील गणेशोत्सव हा राज्याचा उत्सव समजून सर्वांनी यात सहकार्य करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केले.

पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, गणेश मंडळांकडून महानगरपालिकेने कमानीसाठी कोणताही कर आकारू नये. महापालिका प्रशासनाने गणेश मंडळांशी समन्वय साधून त्यांच्या समस्या दूर कराव्यात.  प्रशासनाने नियंत्रण मनोरे स्थापित करून त्या माध्यमातून नियोजनावर लक्ष ठेवावे. पोलीस मित्रांना प्रशिक्षित करून त्यांची मदत घेण्याचा प्रयत्न करावा.गणेश मंडळाने स्वतः नियमावली तयार करून प्रशासनाला सहकार्य करावे. तसेच सर्वांनी मिळून उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

पोलीस आयुक्त रितेश कुमार म्हणाले,  गणेशोत्सवासाठी वाहतूक नियमन, पार्किंग व्यवस्था, सीसीटीव्ही कॅमेरे याबाबत योग्य ते नियोजन करण्यात येत आहे. गणेशोत्सवासाठी व्हाट्सअँप ग्रुप तयार करण्यात येणार आहे. गणेशोत्सवासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार असून कुठलाही अनुचित प्रकार होणार नाही यासाठी काळजी  घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

श्री.चौबे यांनी पिंपरी चिंचवड शहरात करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती दिली.

आयुक्त विक्रमकुमार यांनी गणेश मंडळांना ५ वर्षासाठी परवानगी देण्यात आल्याचे सांगितले. उत्सवादरम्यान वाहनतळासाठी अतिरिक्त व्यवस्था करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

यावर्षीच्या गणेशोत्सवासाठी जिल्हा प्रशासनाने २३, २४, २६, २७ आणि २८ सप्टेंबर रोजी ध्वनिक्षेपक, वापरासाठी रात्री १२ वाजेपर्यंत शिथिलता देण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

सहपोलिस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी बैठकीचे प्रास्ताविक केले. मागील वर्षी ३ हजार ५६६ गणेश मंडळांची नोंदणी झाली होती. यावर्षीही तेवढ्याच प्रमाणात गणेश मंडळाद्वारे गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

बैठकीला विविध गणेश मंडळांचे प्रतिनिधी, विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

अशी आहे गणेशोत्सव स्पर्धा

सहभागी होणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची पुरस्कारासाठी निवड दहा निकषांच्या आधारे करण्यात येईल. १० निकषांसाठी एकूण १५० गुणांक आहेत. पर्यावरणपूरक मूर्ती, पर्यावरणपूकर सजावट, ध्वनीप्रदुषणविरहीत वातावरण, समाजप्रबोधनात्मक सजावट/देखावा, स्वातंत्र्याच्या चळवळीसंदर्भात, छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त सजावट/देखावा, मंडळामार्फत करण्यात येणारे सामाजिक कार्य,  शैक्षणिक, आरोग्य आदीसंबंधी कार्य, पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धांचे आयोजन, पारंपरिक, देशी खेळांच्या स्पर्धा, गणेश भक्तांना पुरविण्यात येणाऱ्या प्राथमिक सुविधा आदी निकषानुसार गुण देण्यात येणार आहेत.

अर्जाचा नमुना पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या mahotsav.plda@gmail.com या ईमेलवर ५ सप्टेंबरपर्यंत अर्ज ऑनलाईन सादर करणे अपेक्षित आहे. ८  सप्टेंबरपूर्वी अकादमीमार्फत जिल्हानिहाय अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयास उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

पुणे जिल्ह्यातून ३ गणेशोत्सव मंडळाची निवड व शिफारस समितीमार्फत राज्य शासनाकडे करण्यात येईल. राज्यस्तरावर प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाची निवड करण्यात येणार आहे. राज्यस्तरीय पहिल्या क्रमांकास ५ लाख रुपये, द्वितीय क्रमांकास २ लाख ५० हजार रुपये आणि तृतीय क्रमांकास १ लाख रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झालेल्या तीन मंडळांशिवाय अन्य गणेशोत्सव मंडळांना प्रत्येकी २५  हजार रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात येईल.

0000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here