कर्मचारी व कामगार संघटना यांच्यात सुसंवाद वाढवा – महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सूत्रधारी कंपनीचे संचालक विश्वास पाठक

मुंबई, दि. ११ : अन्न, वस्त्र व निवारा या माणसाच्या मूलभूत गरजांप्रमाणेच वीज ही मानवाची अत्यावश्यक मुलभूत गरज बनली आहे. या महत्त्वाच्या सेवा क्षेत्रात काम करताना वीज कंपन्यांतील मानव संसाधन व कामगार विभागाने सातत्याने कर्मचारी व कामगार संघटना यांच्यात सुसंवाद वाढविला पाहिजे, असे महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सूत्रधारी कंपनीचे संचालक विश्वास पाठक यांनी सांगितले.

महापारेषणच्या वतीने महानिर्मिती, महापारेषण व महावितरण या तीनही वीज कंपन्यांतील मानव संसाधन व कामगार विभागाच्या अधिकाऱ्यांची दोन दिवसीय सक्षमीकरण परिषद (मल्हार-२०२३) रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, भाईंदर येथे आयोजित केली आहे. त्या परिषदेत श्री. पाठक बोलत होते. यावेळी व्यासपीठावर महापारेषणचे संचालक (मानव संसाधन) सुगत गमरे, महावितरणचे संचालक (मानव संसाधन) अरविंद भादीकर, महानिर्मितीचे कार्यकारी संचालक (मानव संसाधन) धनंजय सावळकर, महापारेषणचे मुख्य व्यवस्थापक सुधीर वानखेडे, महावितरणचे मुख्य महाव्यवस्थापक (मा.सं.) भूषण कुलकर्णी उपस्थित होते.

श्री. पाठक म्हणाले की, भारताचा वेगाने विकास होत आहे. वीज क्षेत्रातही आमुलाग्र बदल होत आहेत. महानिर्मिती, महापारेषण व महावितरण या तीनही कंपन्या महत्त्वाच्या आहेत. यामध्ये मानव संसाधन विभागाची भूमिका खूप मोठी व व्यापक आहे. त्यासाठी त्यांनी वेगळा विचार केला पाहिजे. खासगी वीज कंपन्यांशी स्पर्धा करताना आपण अधिकारी, कर्मचारी व कामगार संघटनेमध्ये सुसंवाद ठेऊन पारदर्शी कारभार ठेवला पाहिजे.

परिषदेच्या सुरूवातीला महापारेषणचे संचालक श्री. गमरे यांनी प्रास्ताविकातून परिषदेमागची भूमिका विशद केली. तीनही कंपन्यांमध्ये मानव संसाधन व कामगार अधिकाऱ्यांशी समन्वय रहावा, यासाठी ही परिषद आयोजित केल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार व्यवस्थापक महेश आंबेकर यांनी मानले.

००००

मनीषा सावळे/विसंअ/