सातारा दि. 25, (जि.मा.का.) – मेंढपाळ समाजातील लोकांवर काहीवेळा विनाकारण हल्ले केले जातात. याविषयीची पोलीस विभागाने गंभीर दखल घ्यावी, अशा सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक सभागृहामध्ये धनगर समाजाच्या जिल्हास्तरीय प्रलंबित मागण्यांबाबत आढावा बैठक संपन्न झाली. त्यावेळी त्यांनी या सूचना केल्या. या बैठकीस आमदार गोपीचंद पडळकर, आमदार जयकुमार गोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधिक्षक समीर शेख, अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, परिविक्षाधिन जिल्हाधिकारी श्री चंद्रा, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांच्यासह धनगर समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
मेंढपाळांवर होणाऱ्या हल्ल्यांची सत्यता पडताळून पहावी अशा सूचना देऊन पालकमंत्री पुढे म्हणाले, याबाबत गांभीर्याने दखल घेऊन पोलीस विभागाने योग्य ती कार्यवाही करावी. चुकीचे हल्ले होणार नाहीत याची खबरदारी घ्यावी. वन क्षेत्रामध्ये मेंढ्या चरण्यासाठी जागा उपलब्ध करुन देण्याबाबत प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवावा. यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत धनगर समाजाला जास्तीत जास्त लाभ देण्याबाबत प्रयत्न करावेत. याबाबत येणाऱ्या अडचणी जिल्हा परिषद अधिकारी व समाज कल्याण अधिकारी यांनी सोडवाव्यात. या योजनेचा निधी वितरीत झालेला नाही. त्याची सविस्तर टिपणी सादर करावी. याविषयी राज्य स्तरावर पाठपुरावा करण्यात येईल. कराड येथे समाजाच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेले उपोषण स्थगित करावे. समाजाच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे चर्चा करून पाठपुरावा करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी धनगर समाजाच्या प्रतिनिधींनी राज्य शासनाने राज्यामध्ये धनगड समाज नसून फक्त धनगर समाज आहे, याबाबत शासन निर्णय काढावा अशी मागणी केली.
00000