सांगली दि. 13 (जि.मा.का.) :- स्वच्छता हा आरोग्यसंपन्न जीवनाचा पाया आहे. यासाठी गावकऱ्यांनी स्वच्छतेची कास धरून वैयक्तिक स्वच्छतेबरोबरच परिसर व गावच्या स्वच्छतेला प्राधान्य देऊन आरोग्यसंपन्न गावे निर्माण करण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज येथे केले.
जिल्हा परिषदेच्या पद्मभूषण वसंतदादा पाटील सभागृहात आर. आर. (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्काराचे वितरण पालकमंत्री डॉ. खाडे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास खासदार संजय पाटील, आमदार सुमनताई पाटील, आमदार मानसिंगराव नाईक, मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमीसे, प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी अमित रंजन, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे यांच्या जिल्हा परिषदेतील खाते प्रमुख व जिल्ह्यातील पुरस्कार विजेत्या ग्रामपंचायतीचे सरपंच व सदस्य उपस्थित होते.
पालकमंत्री डॉ. खाडे म्हणाले, विकास कामांसाठी गावांना शासन स्तरावरून आता थेट निधी उपलब्ध होत असल्याने विकास कामांचे नियोजन गावांनी करावे. विकास कामांवर गावाचे लक्ष असल्यास विकास कामे दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण होतात व निधीचा विनियोग चांगल्या पद्धतीने होतो. विकास कामात गावे अग्रेसर ठेवून गावकऱ्यांनी गावाची वेगळी ओळख निर्माण करावी, असे आवाहन त्यांनी केले.
यापुढे विकास कामात स्पर्धा व्हावी. गावच्या विकासासाठी गावकऱ्यांनी हातात हात घालून काम करावे. विकासाला गती देणारे गाव म्हणून गावाचा लौकिक वाढवण्यासाठी सर्वांनी पुढे यावे, असे आवाहन खासदार श्री. पाटील यांनी यावेळी बोलतांना केले.
स्व. आर. आर. (आबा) पाटील यांनी ग्राम विकासामध्ये मोठे काम केले आहे. शासनाने त्यांच्या नावाने सुंदर गाव पुरस्कार सुरू केला आहे त्या बद्दल आमदार सुमनताई पाटील यांनी शासनाचे आभार मानले. गावच्या विकासाठी गावकऱ्यांनी मतभेद विसरून पुढे यावे असे आवाहन त्यांनी केले.
स्वच्छतेतून गावे समृद्ध होत आहेत यासाठी गावांनी मतभेद विसरून विकास कामासाठी एकत्र यावे, असे आवाहन आमदार मानसिंगराव नाईक यांनी यावेळी बोलताना केले.
मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी विकास कामात ग्रामपंचायती व ग्रामसभेची भूमिका महत्वाची असल्याचे सांगितले. शासन ग्राम विकासाच्या नव नव्या योजना राबवित आहे. सरपंच व सदस्यांनी शासनाच्या विकास योजनांची माहिती घेऊन या विकास योजना प्रभाविपणे राबवून गावाचा विकासाचा आलेख चढता ठेवावा असे आवाहन केले.
पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतीने स्वच्छता व्यवस्थापन, दायित्व अपारंपारिक ऊर्जा आणि पर्यावरण पारदर्शकता व तंत्रज्ञानाचा वापर अशा बाबीवर चांगले काम केले आहे, अशी माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे यांनी प्रास्ताविकात दिली.
नांगोळीच्या सरपंच व कौलगेचे सरपंच यांनी गावात केलेल्या विकास कामांची माहिती दिली.
या कार्यक्रमात आर. आर. (आबा) पाटील सुंदर गाव जिल्हास्तरीय पुरस्काराने नांगोळे, मिरजवाडी, बोरगाव या गावांना सन्मानित करण्यात आले. तर तालुकास्तरीय पुरस्काराने सन 2021-22 मध्ये नांगोळे ता. कवठेमंकाळ , कर्नाळ ता. मिरज, वांगी ता. कडेगाव, ढवळेश्वर ता. खानापूर, शिरगाव (वि) ता. तासगाव, सांडगेवाडी ता. पलूस आणि फाळकेवाडी ता. वाळवा आणि सन 2022-23 मध्ये खंडोबाचीवाडी ता. पलूस, कौलगे ता. तासगाव, पाडळीवाडी ता. शिराळा, हिवतड ता. आटपाडी, पद्माळे ता. मिरज, नागेवाडी ता. खानापूर, रावळगुंडवाडी ता. जत, मिरजवाडी ता. वाळवा आणि बोरगाव ता.कवठेमंकाळ या ग्रामपंचायतींना सुंदर गाव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात संत गाडगेबाबा व स्वर्गीय आर.आर. पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.