घेरावाडी आदिवासी पाड्यामध्ये आवश्यक मूलभूत सुविधांसह पुनर्वसनाबाबत ७ दिवसांत बैठक घेऊन कार्यवाही करावी – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई, दि. 25 : कर्नाळा (जि. रायगड) पक्षी अभयारण्यातील घेरावाडी या आदिवासी पाड्यामध्ये आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत आणि पुनर्वसनाबाबत वन विभागाने 7 दिवसांत बैठक घेऊन कार्यवाही करण्याच्या सूचना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या.

कर्नाळा पक्षी अभयारण्यातील घेरावाडी आदिवासी पाड्याचे पुनर्वसन, कर्नाळा पक्षी अभयारण्याचा निसर्ग पर्यटन आराखडा आदींच्या संदर्भात आज वनमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. आमदार महेश बालदी,  वन विभागाचे प्रधान सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) महीप गुप्ता यांच्यासह वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि घेरावाडी ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, घेरावाडी येथील आदिवासी बांधवांच्या मागणीनुसार तेथे रस्ते, वीज, पाणी या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. याशिवाय या आदिवासी बांधवांना पुनर्वसनाचे अन्य पर्याय समजावून सांगावेत. त्यापैकी, जो पर्याय स्थानिक नागरिक निवडतील, त्या पर्यायाची उपयुक्तता तपासावी. यासाठी वन विभागाच्या प्रधान मुख्य वनसंरक्षक आणि स्थानिक जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी एकत्र बैठक घेऊन यासंदर्भात काय पर्याय स्थानिकांना उपयुक्त ठरेल, याबाबत आढावा घ्यावा, असे सांगितले.

कर्नाळा पक्षी अभयारण्यात निसर्ग पर्यटनाच्या अधिक संधी

कर्नाळा पक्षी अभयारण्याचा विकास होणे आवश्यक आहे. त्यासाठी निसर्ग पर्यटन आराखड्याची अंमलबजावणी चांगली होणे आवश्यक आहे. या आराखड्यात प्रस्तावित केलेली कामे ही दर्जेदार असणे अपेक्षित आहे. ही कामे वेळेवर पूर्ण होणे तितकेच गरजेचे असल्याचे मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.

0000

दीपक चव्हाण/विसंअ/