महापुरुषांचे कौशल्य विचार’ पुस्तकाचा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील अभ्यासक्रमात समावेश – कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई, दि.८:  महापुरुषांचे कौशल्य विचार’ या पुस्तकाचा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील अभ्यासक्रमामध्ये समावेश करण्यात येणार असल्याची माहिती कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली.

महाराष्ट्र हा महापुरुषांच्या कर्तृत्वाने, प्रेरणेने आणि विचाराने समृद्ध आहे महापुरुषांनी आपल्या काळात समाज जीवनामध्ये कौशल्य विकासाचे तत्व यशस्वीपणे अंगीकारले होते, अशा महापुरुषांच्या कौशल्य विषयक अप्रतिम ध्येय धोरणाची ओळख व महात्म्य आजच्या तरुण पिढीला विशेषत: कौशल्य शिक्षण घेणाऱ्या तरुणांना होणे गरजेचे आहे यासाठी “महापुरुषांचे कौशल्य विचार” यासाठी महापुरुषांच्या कौशल्य विषयक कार्याचा, धोरणाचा व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमांमध्ये समावेश केल्यास निश्चितच व्यवसाय शिक्षण अधिक समृद्ध होऊन विद्यार्थ्याचे कौशल्य निपुण होण्यासाठी नवी प्रेरणा मिळणार आहे अशी माहिती मंत्री श्री. लोढा यांनी दिली.

महापुरुषांच्या विचारांवर आधारित अभ्यासक्रम तयार करण्यासाठी संचालनालयस्तरावरुन समिती गठित करण्यात आली होती. या गठित समितीमार्फत पाच महापुरुषांच्या विचारांवर आधारित “महापुरुषांचे कौशल्य विचार” निदेशक हस्तपुस्तिका तयार करण्यात आली आहे. या पुस्तिकेचा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील अभ्यासक्रमात समावेश करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

ज्ञान आणि कौशल्य हे शिक्षणाचे दोन मूलभूत घटक आहेत. ज्ञान हे विषयाचे सखोल अध्ययन, विश्लेषण व चिंतनातून अभिव्यक्त होते तर कौशल्य हे ज्ञानाचे व्यवहार्य व उपयुक्त स्वरूपातील रूपांतरण असते. ज्ञानाव्दारे जीवनाला सार्थक दिशा प्राप्त होत असते आणि कौशल्याच्या निपुणतेमुळे जीवन सुखद आणि संपन्न बनवता येते.

औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या सद्य:स्थितीतील अभ्यासक्रमाव्यतिरिक्त “महापुरुषांचे कौशल्य विचार” या निदेशक हस्तपुस्तिकेचा अभ्यासक्रमात समावेश करण्यात येणार आहे. संचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय स्तरावर गठित समितीने तयार केलेल्या २० तासांच्या महापुरुषांचे कौशल्य विचार पुस्तकाचा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील अभ्यासक्रमात समावेश करण्यात येणार आहे.

शिल्पनिदेशक पदावर नियमित असलेल्या कर्मचाऱ्यांना प्रथमतः या अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण द्यावे. आवश्यकता असल्यास, सद्य:स्थितीत Employability Skill हा विषय हाताळणाऱ्या तासिका तत्वावरील शिक्षकांकाडून अभ्यासक्रम शिकविण्यात यावा असे निर्देश दिले आहेत. “महापुरुषांचे कौशल्य विचार” पुस्तकाची छपाई शासकीय मुद्रणालयाकडून करण्यात यावी असा शासन निर्णय कौशल्य,रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाने निर्गमित केला आहे.

0000

संध्या गरवारे/विसंअ