विमुक्त जाती, भटक्या जमातीच्या आश्रमशाळेतील शिक्षक व शिक्षकेतर  कर्मचाऱ्यांना नियमित वेतन द्यावे – मंत्री अतुल सावे

मुंबई, दि. २३ : राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमातीच्या आश्रमशाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दरमहा १ ते ५ तारखेपर्यंत नियमित वेतन अदा करण्यात यावे, असे निर्देश इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी संबंधित विभागाला दिले.

राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमातीच्या आश्रमशाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर मंत्री श्री. सावे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी संघटनेच्या विविध मागण्यांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली.

विजाभज अनुदानित, माध्यमिक, उच्च माध्यमिक कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक बाबी शालेय शिक्षण विभागाप्रमाणे करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. तसेच आश्रमशाळातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन दि.१ ते ५ तारखेपर्यंत नियमित अदा करून  वित्त आयोगातील फरक देण्यात यावा. तसेच अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करावे, असेही मंत्री श्री. सावे यांनी सांगितले.

या बैठकीला आमदार विक्रम काळे, इतर मागास व बहुजन कल्याण विभागाचे सचिव वीरेंद्र सिंह, उपसचिव कैलास सोळुंखे, उपसंचालक वासुदेव पाटील, लातूरचे उपसंचालक दि. व. राठोड, अमरावतीचे प्रादेशिक उपसंचालक विजय साळवे, नाशिकचे प्रादेशिक उपसंचालक भगवान वीर, आश्रमशाळा शिक्षक व शिक्षकेतर संघटनेचे राज्य अध्यक्ष बालाजी मुंडे, राज्य सरचिटणीस किशन पुंड, किरण पाटील, सुकुमार जगताप, कुलदीप जवंजाळ आदी उपस्थित होते.

0000

काशीबाई थोरात/विसंअ/