बालगृहांकडून अनाथ मुलांना सकारात्मक ऊर्जा देण्याचे काम – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

0
41

नाशिक, दि. 4 जानेवारी, 2024, (जिमाका वृत्तसेवा) :- अनाथ झालेले, एखाद्या गुन्ह्यात दोषी ठरलेले किंवा नैसर्गिक आपत्तीत हरवलेले अशा मुलांचे पुनर्वसन निरीक्षण व बालगृहात होत असते. परिस्थितीने पोरकं केल्यानंतर बालगृहांसारख्या संस्था मुलांना मायेचा आधार देऊन सकारात्मक ऊर्जा देण्याचे काम करतात, असे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी केले.
उंडवाडी रोड येथील निरीक्षण व बालगृहातील सभागृह व संस्थेच्या कार्यालयाचे उद्घाटन मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी मंत्री कुमारी तटकरे बोलत होत्या. यावेळी माजी आमदार जयंत जाधव, महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या सदस्य सायली पालखेडकर, महिला व बाल विकास विभागाचे उपायुक्त चंद्रशेखर पगारे, जिल्हा महिला बाल विकास अधिकारी सुनील दुसाने, बाल सरंक्षण अधिकारी समीरा येवले, निरीक्षणगृह व बालगृहाचे मानद सचिव चंदुलाल शाह यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, बालगृहातील मुले मुली उपस्थित होते.


महिला व बालविकास मंत्री कुमारी तटकरे म्हणाल्या की, अनाथ मुलांसाठी मुला-मुलींच्या निरीक्षणगृह व बालगृहाचे मानद सचिव चंदुलाल शहा यांचे कार्य  नक्कीच प्रेरणादायी आहे. गेल्या काही वर्षापासून निवारासाठी अधिक जागा मिळाली पाहिजे यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे लोकवर्गणीतून जमा केलेल्या 1 कोटी 15 लाख रुपये खर्च करून मुला- मुलींच्या निवारासाठी 4400 चौरस फुटांचे दोन हॉल आज उपलब्ध झाले. तसेच या सुवर्णक्षणाचे साक्षीदार होत असताना सभागृहाचे लोकार्पण माझ्या हस्ते झाले यामुळे मला विशेष आनंद होत आहे.
आज या संस्थेमध्ये जवळपास 55 मुले-मुली वास्तव्य करत आहेत. या मुलांसाठी वाढीव सुविधा देण्या संदर्भातला प्रस्ताव नव्याने सादर करावा. तसेच या संस्थेसाठी मुले व मुलींसाठी स्वतंत्र निवासी अधीक्षक देण्याबाबतचा प्रस्तावही लवकर पाठवण्यात यावा त्यावर शासन पातळीवर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासनही मंत्री आदिती तटकरे यांनी यावेळी दिले.
निरीक्षण व बालगृहाचे मंत्री तटकरे यांनी केले कौतुक
मुला मुलींच्या निवाऱ्यासाठी नव्याने उभारण्यात आलेले सभागृहाचे काम अतिशय दर्जेदार असून अपेक्षेपेक्षा जास्तीत जास्त सोयी सुविधा देण्याचे काम संस्थेचे मानद सचिवांनी केलेले आहे. या संस्थेच्या निरीक्षणातून असे लक्षात आले की, ही संस्था येथील मुला मुलींना घरासारखे वातावरण देऊन त्यांच्यावर चांगले संस्कार करत असल्याची भावनाही महिला व बालविकास मंत्री कुमारी तटकरे यांनी व्यक्त केली.
निरीक्षण व बालगृहाचे मानद सचिव चंदुलाल शहा यांनी आपल्या प्रास्ताविकातून संस्थेच्या विकासासाठी आवश्यक बाबींची माहिती मंत्री महोदयासमोर मांडली. तसेच यावेळी मंत्री महोदयांनी संपूर्ण परिसराची पाहणी करून समाधान व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here