गडचांदूर येथे उद्या रोजी प्रधानमंत्री जनजाती आदिवासी महान्याय अभियानाचे आयोजन

0
7

चंद्रपूर, दि. 14 : देशातील आदिम जमातींच्या विकासाकरिता ‘प्रधानमंत्री जनजाती आदिवासी महान्याय अभियान’ अर्थात पी. एम. जनमन या योजनेची सुरुवात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 15 नोव्हेंबर 2023 रोजी क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांचे जयंतीचे औचित्य साधून करण्यात आली आहे. यात देशातील 75 आदिम जमातींमधील 7 लाख कुटुंबांतील 28 लाख आदिम लोकांना 11 विविध मूलभूत सेवा प्रदान करण्यात येणार आहे. पंतप्रधानांचे प्राधान्यक्रमात असलेल्या या योजनेच्या अंमलबजावणीकरिता केंद्र शासनाने अकरा प्राथम्य क्षेत्र निश्चित केले असून त्यामध्ये नऊ विविध मंत्रालयांचा समावेश केला आहे.

राज्यातील कोलाम, कातकरी व माडीया गोंड या आदिम जमाती असून त्यापैकी  चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोलाम ही आदिम जमात प्रामुख्याने जिवती, कोरपणा, राजूरा व वरोरा ह्या तालुक्यांत वास्तव्यास आहे.

कोलाम जमातीच्या विकासाकरिता व “पंतप्रधान-जनमन” या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपूर या कार्यालयाने संबंधित अन्य विभागांच्या समन्वयाने जिल्हयातील कोलाम या आदिम जमातींच्या नागरिकांकरिता त्यांच्या वस्त्या व पाड्यांवर जाऊन दिनांक 03 जानेवारी 2024 पासुन विविध शिबीरांचे आयोजन केले आहे.

प्रधानमंत्री जनमन अभियानाच्या अनुषंगाने दिनांक 15 जानेवारी 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे टू-वे कनेक्टीव्हीटीद्वारे आदिम जमातीच्या जनतेशी थेट संवाद साधणार आहेत. चंद्रपूर जिल्ह्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन बालाजी सेलीब्रेशन हॉल ॲन्ड लॉन, गडचांदुर येथे करण्यात आले असून त्या ठिकाणी कोलाम जमातीच्या लोकांना विविध दाखल्यांचे आणि योजनांच्या लाभाचे वितरण करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमाचे यू-ट्यूब चॅनलद्वारे थेट प्रक्षेपण देखील होणार आहे.

योजनेची उद्दिष्टे : आदिम कोलाम जमातीच्या नागरीकांना नवीन आधार कार्ड, घरकुल, जातीचे दाखले, बँक खाते, किसान क्रेडीट कार्ड, आयुष्यमान भारत कार्ड, किसान सन्मान योजना, उत्पन्न दाखला, अधिवास प्रमाणपत्र, संजय गांधी निराधार योजना, आरोग्य तपासणी अशा विविध सुविधा व दाखले या अभियानांतर्गत देण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण 8504 एवढे विविध दाखले काढण्यात आले असून इतर अनुषंगीक 4281 सेवा प्रदान करण्यात आल्या आहेत.

आदिम जमातीतील कुटुंबांना पक्के घर देणे, नल से जल योजनेअंतर्गत स्वच्छ पिण्याचे पाणी पुरविणे, पाडे / वस्त्यांना पक्क्या रस्त्याने जोडणे, प्रत्येक घराला मोफत विद्युत मीटर देऊन वीजपुरवठा करणे, पोषण आहार आणि आरोग्य सुविधा पुरविणे, वस्त्या / पाडे मोबाईल आणि इंटरनेट सेवेने जोडणे, बेरोजगारांसाठी कौशल्य विकासाच्या योजना राबविणे, विद्यार्थ्यांकरीता वसतिगृह सुविधा देणे, उपजीविकेच्या साधनांची निर्मिती करणे, वैयक्तिक वन हक्क दावे मंजूर करणे, वन हक्क दावेधारकांना पीएम किसान योजनेचा लाभ देणे, वस्त्यांवर बहुउद्देशीय केंद्र स्थापन करून त्यात अंगणवाडी  आणि आरोग्य केंद्र सुरू करणे, तेथे स्वतंत्र कर्मचारी नेमणे ही पीएम जनमन योजनेची मुख्य उद्दिष्टे आहेत.

 पालकमंत्र्यांची असणार उपस्थिती

जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार हे 15 जानेवारी रोजी होणाऱ्या पंतप्रधानांच्या थेट संवादाच्या कार्यक्रमाकरिता उपस्थित राहणार असून त्यांचे हस्ते आदिम कोलाम समाजबांधवांना विविध योजनांचे लाभ आणि दाखले वितरण होणार आहेत. तसेच सदर कार्यक्रमास जिल्हातील आमदार देखील उपस्थिती दर्शविणार आहेत.

 15 जानेवारी रोजी होणाऱ्या पंतप्रधानांच्या थेट संवादाच्या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या नेतृत्त्वाखाली मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, प्रकल्प अधिकारी मुरूगानंथम एम., राजुरा उपविभागीय अधिकारी रविंद्र माने यांच्यासह इतर अधिकारी परिश्रम घेत आहेत.

000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here