धुळे शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील वाईन शॉप स्थलांतरीत करावे – उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई

0
3

मुंबई, दि. 8 : धुळे शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील वाईन शॉप स्थलांतरीत करावे किंवा बंद करावे, अशी लोकभावना आहे. पुतळ्याचे पावित्र्य राखणे,  शहरातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती अबाधित ठेवणे व लोकभावना शासनासाठी अत्यंत महत्वाची आहे. कायद्यातील तरतुदीनुसार हे वॉइन शॉप स्थलांतरीत करण्याची तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी आज दिले. तसेच लोकभावना लक्षात घेता या दुकानाला पुढील 10 दिवस बंद करण्याचे आदेशही मंत्री श्री. देसाई यांनी दिले.

मंत्रालयात श्री. देसाई यांच्या दालनात धुळे शहरातील वाईन शॉपबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला धुळे शहरचे आमदार शाह फारूख अन्वर, सातारा जिल्हाधिकारी  जितेंद्र ड्रुडी,  उपायुक्त सुभाष बोडके, उपसचिव रवींद्र औटी, उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक, वाईन शॉप बंद करण्याबाबत आंदोलन करीत असलेल्या आंदोलकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. तर दुरदृश्य संवाद प्रणालीद्वारे धुळे जिल्हाधिकारी अभिनव गोयल, अपर पोलीस अधिक्षक किशोर काळे  सहभागी झाले होते.

संबंधित दुकान मालकाने स्वत: दुकानाचे स्थलांतर केल्यास सक्तीच्या स्थलांतरणाचा लाभ देण्याच्या सूचना देत उत्पादन शुल्क मंत्री श्री. देसाई म्हणाले की, धुळे पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी व उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक यांनी समन्वयाने दुकान मालकाकडून दुकानाचे नियमानुसार स्थलांतर करण्याची कार्यवाही करावी. दुकान मालक स्थलांतरास मान्य असल्यास सक्तीचे स्थलांतरणचा लाभ देण्यात यावा. धुळे शहरातील जनतेच्या भावना महत्वाच्या असून या दुकानाबाबत विभागाने तातडीने कार्यवाही करावी.

बैठकीनंतर उत्पादन शुल्क मंत्री श्री. देसाई यांनी उपोषण करणाऱ्या आंदोलकांशी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे चर्चा करीत आंदोलन स्थगित करण्याचे आवाहनही केले. बैठकीत जिल्हाधिकारी, धुळे श्री. गोयल यांनी माहिती दिली.

००००

नीलेश तायडे/विसंअ/

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here