राज्यात मोठ्या क्षेत्रावर बांबू लागवड होण्यासाठी सांघिक प्रयत्न करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन

0
2

मुंबई, दि. १४ : राज्यात जास्तीत जास्त क्षेत्रावर बांबू लागवड होण्याकरिता विविध विभागांनी समन्वयाने आणि सांघिकरित्या प्रयत्न करावेत, असे आवाहन करतांनाच पर्यावरण संवर्धन आणि शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी बांबू लागवड उपयोगी असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

आज मंत्रालयात आयोजित पहिल्या बांबू टास्क फोर्सच्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला उद्योग मंत्री उदय सामंत, राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, कृषी विभागाचे अतिरीक्त मुख्य सचिव, अनुपकुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव प्रविण दराडे, वन विभागाचे प्रधान सचिव वेणूगोपाल रेड्डी, रोहयो विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, आदिवासी विकास विभागाचे प्रधान सचिव विजय वाघमारे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, जगभरात प्रदूषणाची समस्या वाढत आहे, वातावरण बदलामुळे पुढील पिढ्यांसमोर मोठे संकट उभे टाकले आहे. पर्यावरण रक्षण आणि ऊर्जा संकटाचा मुकाबला करण्यासाठी बांबू लागवड हा महत्त्वाचा पर्याय ठरणार आहे. तसेच बांबूची वाढत्या मागणी लक्षात शेतकऱ्यांनी बांबू लागवड केल्यास त्यांना मोठा आर्थिक फायदा मिळू शकणार आहे. तसेच शेतकऱ्यांनी बांबू क्लस्टर निर्माण करण्याचे आवाहन आपण केले आहे. त्याप्रमाणे शेतकऱ्यांना बांबू लागवड करण्याकरिता प्रोत्साहन देण्याचे आपले धोरण आहे. हे धोरण यशस्वी करण्यासाठी राज्यात बांबू लागवडीचे क्षेत्र वाढविण्यासाठी कृषी, वन, सामाजिक वनीकरण, पर्यावरण यासह सर्व विभागांनी सकारात्मक भावनेतून टीम म्हणून काम करावे. तसेच यासाठी आवश्यक निधी मनरेगाच्या माध्यमातून रोजगार हमी योजना विभागाकडून उपलब्ध करुन देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

बैठकीच्या सुरुवातीला बांबू लागवडीविषयी सादरीकरण करतांना श्री.पटेल यांनी सांगितले की, राज्यात येत्या ५ वर्षात १० लाख हेक्टर क्षेत्रावर बांबू लागवड करण्याचे मुख्यमंत्री शिंदे यांचे स्वप्न आहे. या स्वप्नपूर्तीसाठी बांबू टास्क फोर्सच्या माध्यमातून काम सुरु असल्याचे सांगितले.

0000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here