दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी पुरविण्यात येणाऱ्या सुविधांची विभागीय आयुक्तांकडून तपासणी

0
5

पुणे दि.६:  भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी शहरातील मतदान केंद्रांना भेटी देऊन दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी पुरविण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती घेतली.

डॉ.पुलकुंडवार यांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांशी मतदान केंद्रावरील सुविधांबाबत चर्चा केली. मतदान केंद्रांवर दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी मतदान केंद्राच्या दर्शनी भागात दिशादर्शक फलक लावावेत, त्याठिकाणी सुस्थितीतील रॅम्प, व्हील चेअर,  विश्रांती कक्ष, पिण्याच्या पाण्याची सुविधा, स्वच्छतागृह, प्रथमोपचार पेटी आदी सुविधा असाव्यात. मतदान केंद्र तळमजल्यावर असावे. तसेच मतदान केंद्रांवर त्यांच्यासाठी स्वतंत्र वाहनतळ असावे. दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना रांगेत न थांबवता मतदान करण्याची स्वतंत्र व्यवस्था असावी अशा सूचना डॉ. पुलकुंडवार यांनी दिल्या.

पुणे लोकसभा मतदार संघाअंतर्गत २०९-शिवाजीनगर विधानसभा मतदार संघातील भारत इंग्लिश स्कुल, सीओईपी इंजिनिअरिंग कॉलेज व विद्याभवन ज्युनिअर कॉलेज, मॉडेल कॉलनी तसेच २१४-पुणे छावणी विधानसभा मतदार संघाअंतर्गत संत गाडगेमहाराज विद्यालय, कोरेगाव पार्क, आगरकर मुलींची शाळा, सोमवार पेठ व जनता विद्यालय, ताडीवाला रोड आणि २१५-कसबा पेठ विधानसभा मतदार संघाअंतर्गत एसएनडीटी कन्याशाळा, नारायण पेठ, शेट हिरालाल सराफ हायस्कूल, बुधवार पेठ व पुणे महानगरपालिका शाळा क्रमांक ७ या ठिकाणी विभागीय आयुक्तांनी भेटी दिल्या.

यावेळी विभागीय उपायुक्त रामचंद्र शिंदे, पुणे महानगरपालिकेचे उपायुक्त राजीव नंदकर,  उपविभागीय अधिकारी सिद्धार्थ भंडारे आदी उपस्थित होते.

०००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here