दरडग्रस्तांना उत्कृष्ट दर्जाची घरे उपलब्ध करुन द्या- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0
46

सातारा, दि.९: पाटण तालुक्यातील अतिवृष्टीमुळे बाधित आठ गावांच्या कायमस्वरुपी पुनर्वसनासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून १६० कोटी  रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला असून बाधितांना उत्कृष्ट दर्जाची घरे देण्यात यावीत, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या.

मोरगिरी, ता. पाटण येथे दरडग्रस्त कुटुंबांचे कायमस्वरुपी पुनर्वसन प्रकल्पाच्या भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस अधीक्षक समीर शेख उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, राज्यातील प्रत्येक घटक सुखी-समाधानी रहावा, यासाठी शासन प्रयत्नशील आहे. हे सरकार सर्वसामान्यांचे सरकार असून सर्व आपत्तीच्या प्रसंगी पाठीशी राहणारे सरकार आहे. संकटकाळात नेहमीच शासनाने मदतीचा हात दिला आहे. त्यामुळे दरडग्रस्त कुटुंबांना सर्व सुविधायुक्त घरे देण्यासाठी निधीची कमतरता भासणार नाही याची ग्वाही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिली. ते म्हणाले की, गेल्या दीड वर्षात शासनाने सर्व सामान्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत. राज्यात अनेक विकासाचे प्रकल्प सध्या सुरु असून शासनाने महिला सक्षमीकरणासाठी महिला धोरण जाहीर केले असून लेक लाडकी योजना, एसटी मध्ये ५० टक्के सवलत, महिला बचत गटांच्या खेळत्या भांडवलात वाढ दिल्याचे सांगून त्यांच्या उत्पादनांना विक्रीसाठी संधी उपलब्ध करुन द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

ते पुढे म्हणाले, सातारा जिल्ह्यात सुरु करण्यात आलेल्या गाळमुक्त धरण व गाळमुक्त शिवार उपक्रमामुळे कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात १० टीएमसीने वाढ होईल. सातारा जिल्ह्यात अनेक सोयी-सुविधा, प्रकल्प सुरु असून २२५ मॉडेल स्कुल, ८४  प्राथमिक आरोग्य केंद्रांचे अद्ययावतीकरण करण्यात येणार आहे. मुनावळे प्रमाणेच पाटणमध्ये करण्यात येणाऱ्या जलपर्यटन प्रकल्पासाठी ७० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याचे सांगून शिक्षण, आरोग्य आणि पर्यटनाला चालना दिल्यामुळे जिल्ह्यातील तरुणांना रोजगार उपलब्ध होईल. पर्यटनाला चालना देण्यासाठी ४२६ कोटी रुपये मंजूर केले आहेत. पर्यावरणाचा समतोल राखून सर्व प्रकल्प पूर्ण करावेत, असेही ते म्हणाले.

शासन आपल्या दारी उपक्रमाच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यातील  लाखो नागरिकांना लाभ मिळाला असून राज्यातील ४ कोटी लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे. राज्यात ७०० ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरु करण्यात आले आहेत.  महात्मा फुले जन आरोग्य योजनेतील लाभाची मर्यादा १.५० लाखाहून वाढवून ५ लाख रुपये करण्यात आली आहे. असे ते म्हणाले.

पालकमंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, अतिवृष्टीमुळे आंबेघर (खालचे, वरचे), ढोकावळे, मिरगाव, हुंबरळी, शिद्रुकवाडी, जितकरवाडी आणि काहीर या आठ भूस्खलनबाधित गावांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी  प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. या पुनर्वसनासाठी आवश्यक भूसंपादन करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून  निधी मंजूर करण्यात आला आहे. आठ गावांतील ४९९  कुटुंबांचे यामुळे कायमस्वरूपी पुनर्वसन होणार असून पुनर्वसित ठिकाणी अंतर्गत रस्ते, पिण्यासाठी स्वच्छ पाणीपुरवठा, ग्रामपंचायत कार्यालय, सार्वजनिक शौचालय, वैयक्तिक एकल विद्युत जोडणी, अंगणवाडी, खेळाचे मैदान, समाजमंदिर इत्यादी नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. असेही  मंत्री श्री. देसाई यांनी सांगितले.

महसूल अधिकाऱ्यांना वाहनांचे लोकार्पण

सातारा जिल्ह्यात राज्यात प्रथमच महसूल विभागातील अधिकाऱ्यांना देण्यात येणाऱ्या स्कॉर्पिओ वाहनांचे लोकार्पणही यावेळी करण्यात आले. या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकारी यांना देखील ईनोव्हा गाड्या देण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.

मल्हारपेठ पोलीस ठाणे प्रशासकीय इमारत व निवासस्थानांचे निवासस्थानांचे ई-लोकार्पण

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मल्हारपेठ पोलीस ठाणे प्रशासकीय इमारत व निवासस्थानांचे तसेच पाटण पोलीस ठाणे येथील अधिकारी-कर्मचारी यांच्या निवासस्थानांचे ई-लोकार्पण करण्यात आले.

यावेळी अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, रविराज देसाई , जयराज देसाई, उपविभागीय अधिकारी सुनील गाडे, जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

०००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here