८५ वर्षांवरील ज्येष्ठांच्या गृह मतदान प्रक्रियेत निवडणूक पथकांनाही संवेदनांची अनुभूती

0
40

नागपूर, दि. 15 : आयुष्याच्या शेवटच्या पर्वात असणाऱ्या ज्येष्ठ वयोवृद्धांच्या मनातील भावविश्वाचे अनेक कंगोरे या लोकसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेतून समोर आले आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगातर्फे जे 85 वर्षांपेक्षा अधिक आहेत अशा ज्येष्ठ नागरिकांना आपल्या मताचा अधिकार बजावता यावा यासाठी गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेमुळे जे वयोवृद्ध अंथरुणाला खिळून आहेत अशांनाही लोकशाहीच्या या कर्तव्यतत्परतेत सहभागी  होता आले, याचे अधिक समाधान असल्याच्या प्रातिनिधीक प्रतिक्रिया मिळत आहेत.

ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल मारपकवार यांच्या मातोश्रींचे वय 98 वर्ष आहे. सरस्वती चिंतामणराव मारपकवार या आपल्या मुलासमवेत अंबाझरी परिसरात वास्तव्यास आहेत. गृह मतदानाची सुविधा निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिल्याचे समजताच आईलाही मतदानाचा हा आनंद घेता यावा यादृष्टीने आम्ही गृह मतदानाचा फॅार्म भरला. यावर निवडणूक विभागाने निर्णय  घेऊन आज तिच्या गृह मतदानासाठी विशेष पथक पाठवून मतदान करून घेतल्याबद्दल वेगळा आनंद झाल्याची प्रतिक्रिया विक्रम मारपकवार यांनी दिली.

वार्धक्य, आजारपणामुळे अनेक ज्येष्ठ मतदारांना त्यांचा मतदानाचा अधिकार बजावताना अडचणी निर्माण होतात. इच्छा असुनही त्यांना मतदानाच्या हक्कांपासून वंचित राहावे लागते. हे टाळण्यासाठी भारत निवडणूक आयोगाकडून  85 वर्षापुढील ज्येष्ठ मतदारांसाठी गृह मतदानाच्या माध्यमातून घरातूनच मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधेचा लाभ जिल्ह्यातील नागपूर आणि रामटेक या दोन्ही लोकसभा मतदारसंघातील 85 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक घेत आहेत.

85 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना व दिव्यांगांना मतदानाचा लाभ मिळावा व त्यांनाही मतदान करता यादृष्टीने दिनांक 14 ते 17 एप्रिल या नागपूर लोकसभा मतदारसंघात 85 वर्षांवरील 1 हजार 204 गृह मतदार तर रामटेक लोकसभा मतदारसंघात  85 वर्षांवरील 889 गृहमतदार आहेत.

दि. 14 एप्रिलपासून नागपूर पूर्व मतदारसंघातून सुरुवात झाली असून ही प्रक्रिया 17 एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे.

जिल्हा निवडणूक अधिका-यांची गृहमतदानस्थळी भेट

जिल्हा निवडणूक अधिकारी डॅा.विपीन इटनकर यांनी आज नागपूर लोकसभा मतदारसंघातर्गत होत असलेल्या विविध गृह मतदान स्थळांना भेट देत पाहणी केली. यावेळी त्यांनी मतदानाची गोपनीयता पाळून भारत निवडणूक आयोगाच्या गृहमतदानाच्या विविध दिशानिर्देशांचे पालन करण्याच्या सूचना संबंधित मतदान अधिकारी व कर्मचा-यांना केल्या. यावेळी नागपूर शहरचे उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे उपस्थित होते.

 

000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here