मुंबई, दि. 14 : कोरोनाच्या समस्येमुळे महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठीचे नवीन विधेयक अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडणे शक्य न झाल्याने त्यासाठी दोन दिवसांचे विशेष अधिवेशन घेण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना करण्यात येईल, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज विधानसभेत निवेदनाद्वारे दिली.
यासंदर्भात निवेदन करताना गृहमंत्री श्री. देशमुख म्हणाले, महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी व महिला सुरक्षा सक्षमीकरणाच्या हेतूने नवीन विधेयक आणण्याचा राज्य शासनाचा मानस आहे. आंध्र प्रदेशने पारित केलेल्या दिशा कायद्याची माहिती घेण्यासाठी आम्ही या राज्याचा दौरा केला.
नवीन कायदा आणून गुन्ह्याचा लवकरात लवकर तपास होऊन आरोपीला शिक्षा व्हावी या उद्देशाने नवीन कायदा शासन करणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात हे नवीन विधेयक सादर करून नवीन कायदा पारित करण्याचे नियोजन होते. या प्रस्तावित विधेयकातील तरतुदीसंदर्भात विधी व न्याय, महिला व बालकल्याण, वित्त या विभागांचे अभिप्राय आवश्यक आहेत. मात्र देशात आणि राज्यात आकस्मिकपणे उद्भवलेल्या कोरोना विषाणूच्या समस्येमुळे अधिवेशनाचा कालावधी कमी करावा लागला असून त्यामुळे प्रस्तावित महिला विषयक कायदा विधानमंडळासमोर मांडणे शक्य होत नाही.
त्यामुळे हे विधेयक दोन्ही सभागृहासमोर सादर करुन त्यावर सदस्यांना मते मांडता यावी यासाठी कोरोनाची समस्या नियंत्रणात येताच विधानमंडळाचे विशेष अधिवेशन घेण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना करणार असल्याचे, गृहमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
००००
अजय जाधव/विसंअ/14.3.2020