गृह मतदानासाठी घरी आलेल्या मतदान पथकांचे दिव्यांग, ८५ वर्षांवरील मतदारांनी मानले आभार

0
65

 

  • दिव्यांग, अंथरुणाला खिळलेल्या मतदारांना बजाविता आला अधिकार

  • मतदान करता आल्याने अनेकांच्या चेहऱ्यावर झळकले हास्य

लातूर, दि. 02 : मतदार यादीमध्ये नाव असलेल्या दिव्यांग आणि 85 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या मतदारांसाठी भारत निवडणूक आयोगाने गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार लातूर (अ.जा.) लोकसभा मतदारसंघातील गृह मतदानाला आज (दि. 2) पासून सुरुवात झाली. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी उदगीर विधानसभा मतदारसंघ क्षेत्रातील गृह मतदान प्रक्रियेची प्रत्यक्ष पाहणी केली. गृह मतदानासाठी घरी येणाऱ्या मतदान पथकांचे आभार मानत दिव्यांग आणि 85 वर्षांवरील मतदारांनी आपला हक्क बजाविला. वयोवृद्धता, दिव्यांगत्व यामुळे मतदान केंद्रावर जाणे शक्य होऊ शकले नसते, मात्र गृह मतदान सुविधेमुळे मतदान करता आल्याचा आनंद यावेळी अनेकांच्या चेहऱ्यावर झळकला.

 

टपाली मतपत्रिकेची सुविधा उपलब्ध होण्यासाठी दिव्यांग आणि 85 वर्षांवरील मतदारांकडून 17 एप्रिल 2024 पर्यंत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्यामार्फत 12 (डी) अर्ज भरून घेण्याची कार्यवाही करण्यात आली. त्यानुसार 85 वर्षांवरील 1 हजार 893 आणि 463 दिव्यांग मतदार असे एकूण 2 हजार 356 मतदार गृह मतदानासाठी पात्र ठरले. या मतदारांचे घरोघरी जावून मतदान करून घेण्यासाठी 130 मतदान पथके स्थापन करण्यात आली. प्रत्येक पथकात दोन मतदान अधिकारी, पोलीस कर्मचारी, व्हिडीओग्राफर आणि मायक्रो ऑब्झर्व्हर यांचा समावेश आहे. या मतदान प्रक्रियेमध्ये गोपनीयतेचा भंग होवू नये, यासाठी विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिल्या. त्यानुसार 2 मे रोजी गृह मतदान प्रक्रिया सुरु झाली आहे.

जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी स्वतः उदगीर विधानसभा मतदारसंघ क्षेत्रातील गृह मतदान प्रक्रियेची पाहणी केली. यावेळी उदगीर शहरातील 31 वर्षीय दिव्यांग पूजा कासले यांच्या घरी त्यांनी भेट दिली. दिव्यांगत्वामुळे मतदान केंद्रावर जाणे टाळणाऱ्या पूजा कासले यांनी यावेळी गृह मतदानाद्वारे पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजाविल्याचे सांगितले. तसेच या सुविधेमुळे मतदान करता आल्याचा आनंद व्यक्त केला. उदगीरचे उपविभागीय अधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सुशांत शिंदे, तहसीलदार राम बोरगावकर आदी यावेळी उपस्थित होते. करडखेल येथील पंढरी माणिक कसबे, दिलीप कसबे, तसेच लोहारा येथील मुक्ताबाई सोपानराव मोगले यांच्या गृह मतदानावेळी जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी उपस्थित राहून मतदान प्रक्रियेची पाहणी केली. तसेच मतदारांच्या गृह मतदानानंतरच्या भावना जाणून घेतल्या.

लातूर शहरातील औसा रोड परिसरातील श्रीमती गोदावरी कुलकर्णी यांचे वय 101 वर्षे आहे. अर्धांगवायूच्या झटक्यामुळे त्यांना गेली दोन वर्षे कोणतीही हालचाल करता येत नसल्याने अंथरुणावर पडून आहेत. त्यांना मतदान केंद्रावर घेवून येणे शक्य नव्हते, असे कुटुंबियांचे म्हणणे आहे. मात्र, गृह मतदान सुविधेमुळे यावेळी त्यांचे मतदान होवू शकल्याचे समाधान त्यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केले. यावेळी सहायक जिल्हाधिकारी नमन गोयल, लातूरच्या उपविभागीय अधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे, नायब तहसीलदार गणेश सरोदे उपस्थित होते.

लातूर येथील लेबर कॉलनी येथील 104 वर्षे वयाच्या अहेमद खुदबोद्दिन शेख यांनाही आता आजारपण आणि वृद्धावस्थेमुळे घराबाहेर पडता येत नाही. त्यामुळे यावेळी मतदानाचा अधिकार बजाविण्यासाठी ते मतदान केंद्रावर आले नसते, असे त्यांचे नातू अजीम सलीम शेख यांनी सांगितले. मात्र, गृह मतदान सुविधेमुळे त्यांना मतदानाचा हक्क बजाविता आला. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर हास्य खुलले. याच परिसरात राहणाऱ्या 87 वर्षीय किसनाबाई ताकपिरे यांनीही मतदान पथकाने घरी येवून आपले मतदान करून घेतल्याबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच यासाठी 12 (डी) अर्ज भरून घेतलेल्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्याचे मनोमन आभार मानले.

उर्वरित दिव्यांग, 85 वर्षांवरील मतदारांसाठी 4 मे रोजी मतदान पथके जाणार घरोघरी

 2 मे रोजी लातूर लोकसभा मतदारसंघात गृह मतदान प्रक्रिया सुरु करण्यात आली. याबाबत संबंधित मतदारांना बीएलओ मार्फत पूर्वसूचना देण्यात आली. पहिल्या दिवशी दुपारी 4 वाजेपर्यंत दिव्यांग आणि 85 वर्षांवरील सुमारे 1 हजार 389 म्हणजेच जवळपास 60 टक्के मतदारांनी आपला हक्क बजाविला. काही कारणांमुळे 2 मे रोजी घरी उपस्थित नसलेल्या पात्र मतदारांचे मतदान करून घेण्यासाठी 4 मे 2024 रोजी मतदान पथके पुन्हा त्यांच्या घरी जाणार आहेत. यादिवशी घरी उपस्थित नसलेल्या मतदारांचे मतदान नोंदविले गेले नाही, तर अशा मतदारांना मतदान केंद्रावर जावून मतदान करता येणार नाही. उदगीर विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात 3 मे आणि 4 मे या दिवशी मतदान पथके घरोघरी जाणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here