मुंबई शहर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघ मतमोजणीच्या तयारीचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

0
22

मुंबई, दि. ३१  :- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ साठी मुंबई शहर जिल्ह्यातील मुंबई दक्षिण व मुंबई दक्षिण मध्य या दोन्ही लोकसभा मतदारसंघात २० मे २०२४ रोजी मतदान घेण्यात आले. दि. ४ जून २०२४ (मंगळवार) रोजी मुंबईतील शिवडी येथील वेअर हाऊस, गाडी अड्डा येथे सकाळी ०८ वाजेपासून दोन्ही लोकसभा मतदारसंघांतील मतमोजणी होणार आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई शहर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी आज मतमोजणीच्या तयारीचा आढावा घेतला.

मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे झालेल्या या आढावा बैठकीला ‘३०-मुंबई दक्षिण मध्य’ लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी विकास पानसरे, ‘३१-मुंबई दक्षिण’ लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी रवि कटकधोंड, मुंबई दक्षिण विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. अभिनव देशमुख, पोलीस उपायुक्त (बंदर परिमंडळ) संजय लाटकर, सहाय्यक पोलीस आयुक्त (वडाळा विभाग) विजय भिसे, मुंबई राज्य वातावरणीय कृती कक्षाचे संचालक तथा समन्वय अधिकारी (स्ट्रॉंग रूम) अभिजीत घोरपडे, उपमुख्य अग्निशमन अधिकारी संतोष सावंत, सहाय्यक समन्वय अधिकारी (वेलफेअर) डॉ. धीरज पगार, मुंबई पोर्ट ट्रस्टचे उप वाहतूक व्यवस्थापक आय एस स्वामी, बृहन्मुंबई महानगरपालिका व दक्षिण विभागाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सतीश बडगिरे, सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता (विद्युत) नलिनी सुत्रावे, बृहन्मुंबई महानगरपालिका फ-दक्षिण विभाग घनकचरा विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. यादव म्हणाले की, शिवडी वेअर हाऊसमधील ‘३०-मुंबई दक्षिण मध्य’ व ‘३१-मुंबई दक्षिण’ या दोन्ही लोकसभा मतदारसंघांच्या मतमोजणीसाठी सुमारे ३५०० कर्मचारी कार्यरत असणार आहेत. तसेच या कर्मचाऱ्यांसह उमेदवार, निवडणूक मतमोजणी प्रतिनिधी, पोलिस उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे मतमोजणी केंद्रावर व केंद्राबाहेर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना श्री. यादव यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या.

मतमोजणी केंद्रावर पुरेशा प्रमाणात अग्निशमन बंब, अग्निशामक यंत्रणेने व्यवस्था चोख ठेवावी, मतमोजणीसाठी नियुक्त करण्यात आलेले कर्मचारी, बंदोबस्तासाठी नियुक्त पोलीस यांच्यासाठी मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी स्वतंत्र वैद्यकीय कक्ष तयार करावा, तसेच त्या ठिकाणी ०४ ॲम्बुलन्स व वैद्यकीय पथक नियुक्त करावे व केईएम हॉस्पिटलमध्ये १० बेड आरक्षित ठेवावेत, वैद्यकीय मदत वेळेवर मिळण्यासाठी स्वतंत्र वेल्फेअर अधिकारी नेमण्याचे निर्देश श्री. यादव यांनी दिले.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागाच्या अधिकाऱ्यांनी मतमोजणी केंद्राच्या ठिकाणचा परिसर मोहीम राबवून तात्काळ स्वच्छ करण्याबाबतची कार्यवाही करावी व मतमोजणी केंद्र परिसरातील स्वच्छतागृह स्वच्छ ठेवावी. मतमोजणी केंद्रावर नियमित, सुरळीत व अखंडित विद्युत पुरवठा सुरू राहावा, याची खबरदारी बेस्ट प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभाग (विद्युत) यांनी घेण्याच्या सूचनाही श्री. यादव यांनी यावेळी दिल्या.

०००