‘अमृतवृक्ष आपल्या दारी’ योजनेंतर्गत विभागीय आयुक्तालयात वृक्षारोपण; अधिकारी-कर्मचाऱ्यांनी लावले आपल्या आईच्या नावाने रोपं

0
5

अमरावती, दि. 12 : केंद्र व राज्य शासनाकडून बांबू शेतीला प्रोत्साहन दिले जात आहे. राज्यात सर्वत्र 15 जून ते 30 सप्टेंबर हा काळ वन महोत्सवाचा काळ म्हणून दरवर्षी साजरा करण्यात येतो. या कालावधीत वृक्ष लागवडीसाठी लोकांना उद्युक्त करण्याच्या दृष्टीने शासनामार्फत सवलतीच्या दराने रोपांचा पुरवठा करण्यात येतो. केंद्र सरकारच्या ‘एक पेड माँ के नाम-Plant4Mother’ या संकल्पनेच्या धर्तीवर ‘अमृतवृक्ष आपल्या दारी’ ही योजना राज्यात सर्वत्र राबविण्यात येत आहे. वृक्ष लागवडीच्या या चळवळीमध्ये प्रत्येक नागरिकाने स्वयंस्फुर्तीने सहभागी होऊन पर्यावरण संवर्धनासाठी योगदान द्यावे, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी आज येथे केले.

वनमहोत्सव : ‘अमृतवृक्ष आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत विभागीय आयुक्त कार्यालयाच्या परिसरात डॉ. पाण्डेय यांच्या हस्ते त्यांच्या आईच्या नावाने (सौ. रेनू नरेंद्रनाथ पाण्डेय) बांबू रोपाची लागवड करण्यात आली. याप्रसंगी मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. यावेळी ‘एक झाड आईच्या नावे’ उपक्रमांतर्गत उपायुक्त संजय पवार, गजेंद्र बावने, रमेश आडे, संतोष कवडे, राजेंद्र फडके, हर्षद चौधरी, सहाय्यक आयुक्त श्यामकांत मस्के, वैशाली पाथरे, नायब तहसीलदार संजय मुरतकर, श्री. अडसूळे आदींच्या हस्ते त्यांच्या आईच्या नावे बांबू रोपांचे आयुक्तालयाच्या परिसरात रोपण करण्यात आले. ‘एक झाड आईच्या नावे’ उपक्रमांतर्गत विभागीय आयुक्तालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या हस्ते 110 बांबू रोपांची लागवड करण्यात आली.

विभागीय आयुक्तालयाच्या परिसरात डॉ. पाण्डेय यांच्या मार्गदर्शनात महिला व पुरुष अधिकारी- कर्मचाऱ्यांनी वृक्षारोपणाच्या कार्यक्रमात उत्साहाने सहभाग घेत रोपांची लागवड केली. रोपांची लागवड होत असताना प्रत्येकाने आपल्या आईच्या नावे असलेले झाडं जिवंत राहण्यासाठी जोपासना करावी, असे आवाहन विभागीय आयुक्तांनी संबंधित कर्मचाऱ्यांना केले.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत विभागात बांबू लागवड अभियान राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत 10 गुंठ्यांपासून 1 हेक्टरपर्यंत बांबू लागवड करता येत असून त्यासाठी शासनाकडून सात लाख रुपयाचे अनुदान दिले जाते. बांबू हे शेतकऱ्यांसाठी बुहउद्देशीय उपयोगी पीक आहे. या माध्यमातून शेतकरी बांधवांना शेतीपूरक जोडधंदा उपलब्ध होवू शकतो. बांबू लागवडीमधून किमान हेक्टरी उत्पादन 100 टन व भाव प्रति टन किमान 4000 मिळतो. त्यासाठी विभागातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी मनरेगा बांबू लागवड योजनेचा लाभ घेऊन आर्थिक स्थैर प्राप्त करावे, असे आवाहन विभागीय आयुक्तांनी यावेळी केले.

यावेळी सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी बांबू रोपांची लागवड करुन झाडासोबत सेल्फी घेवून वन महोत्सव साजरा केला.

0000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here