मुंबई, दि. १७: प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (मध्य) येथे चारचाकी संवर्गातील खासगी परिवहनेत्तर वाहनांकरीता असलेली MH-01-EN ही मालिका संपुष्टात येत आहे. त्यामुळे या संवर्गातील वाहनांसाठी MH-01-ER ही आगाऊ स्वरूपात असलेली मालिका नियमित होईल. या नोंदणी क्रमाकांच्या मालिकेतील वाहन क्रमांक चारचाकी संवर्गातील परिवहनेत्तर वाहनांकरीता आरक्षित करण्यात येत आहे. यासाठी महाराष्ट्र मोटार वाहन नियमांतर्गत विहीत शुल्क आकारले जाणार आहे.
ज्या वाहन धारकांना आपल्या वाहनांसाठी या नविन क्रमाकांच्या मालिकेतून आकर्षक अथवा पसंतीचा नोंदणी क्रमांक आरक्षित करावयाचा असेल, त्यांना विहीत नमुन्यातील अर्ज, पत्त्याचा पुरावा, छायाचित्र ओळखपत्र, पॅनकार्ड, वाहन खरेदीची पावती आणि पसंतीच्या क्रमांकासाठीच्या REGIONAL TRANSPORT OFFICE MUMBAI (CENTRAL) किंवा प्रादेशिक परिवहन अधिकारी, मुंबई (मध्य) यांच्या नावे काढलेल्या विहीत शुल्काचा धनाकर्षासह १८ जुलै २०२४ रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (मध्य) येथे सादर करावा. विहीत शुल्क भरून नमुन्यातील अर्ज खिडकी क्रमांक ई- १८ वर मंगेश मोरे यांचेकडून प्राप्त करून घेता येईल.
एकाच नोंदणी क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास त्याच दिवशी दुपारी २ वाजता लिलाव पद्धतीचा अवलंब करून नोंदणी क्रमांक जारी करण्यात येईल. सदर आरक्षित केलेल्या वाहनक्रमांकाची वैधता 30 दिवसांकरीता असते. सदर क्रमांकावर 30 दिवसांच्या आत वाहन नोंदणी होणे आवश्यक असते. वाहन क्रमांक आरक्षित केल्याच्या पावतीची नोंद वाहनाच्या डेटा एंट्रीच्या वेळी वाहन 4.0 प्रणालीमध्ये घेतल्यास त्या वाहनास आरक्षित केलेला क्रमांक प्राप्त होतो, असे प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (मध्य)चे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सुधीर जायभाये यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळवले आहे.
०००