एमआयटी-वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी येथे आयोजित सामाजिक नेतृत्व विकास कार्यशाळेचा राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत समारोप

0
3

जीवनात यशस्वी होण्यासाठी ध्येय ठरवून प्रयत्न करा- राज्यपाल

पुणे, दि. १४: जीवनात यशस्वी होण्यासाठी ध्येय निश्चित करुन ते साध्य करण्यासाठी प्रयत्न करा. अपयशाच्या वेळी  निराश न होता कसोशीने प्रयत्न केल्यास यश नक्की तुमचेच आहे, असे प्रतिपादन राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी केले.

महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी पुणे येथे आयोजित सामाजिक नेतृत्व विकास कार्यशाळेच्या समारोप कार्यक्रमात राज्यपाल  बोलत होते. यावेळी आयर्नमॅन मेजर जनरल विक्रम देव डोगरा, विद्यापीठाचे संस्थापक तथा अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड, कार्याध्यक्ष राहुल कराड, कुलगुरू डॉ. रवी चिटणीस आदी उपस्थित होते.

सामाजिक नेतृत्व विकास कार्यशाळा विद्यार्थ्यांमध्ये अनुकूल परिवर्तन घडवून आणण्याचे उत्तम माध्यम असल्याचे सांगून राज्यपाल म्हणाले, युवकांनी आयुष्यात ध्येय निश्चित करावे आणि त्याकडे सुसंगत वेगाने जावे. कधीही हार मानू नका, जे प्रयत्न सोडतात त्यांना यश मिळत नाही.  जीवनात यशस्वी व्यक्तीमत्त्वाचा आदर्श पुढे ठेऊन वाटचाल केल्यास यश नक्कीच मिळेल.

ते म्हणाले, विद्यापीठातील शैक्षणिक सोयीसुविधांचा वापर करून, खूप शिक्षण घ्या. विद्यापीठातून बाहेर पडल्यानंतर आपल्याला लोकांची मदत करायची आहे, या भावनेने वाटचाल करा. भ्रष्टाचार हा कर्करोगासारखा असून आपल्या विकासात खूप मोठा अडथळा ठरत आहे. त्यामुळे भ्रष्टाचाराला मुळापासून काढून फेकण्यासाठी कार्य करायचे आहे असे ध्येय मनाशी बाळगून वाटचाल करा. आजूबाजूच्या परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता ठेवा, प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याची जिज्ञासा ठेवा, इतरांचे ऐकून घेण्यासाठी कायम संयम ठेवावा, असा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

डॉ. विश्वनाथ कराड म्हणाले, विद्यार्थ्यांनी आपल्याला भविष्यात देशाचे नेतृत्व करायचे आहे हे लक्षात ठेऊन विद्यापीठीय अभ्यासक्रमासोबतच आजूबाजूच्या चांगल्या गोष्टींचे शिक्षण घेऊन वाटचाल करावी. स्वामी विवेकानंद यांच्यासारख्या थोर व्यक्तिमत्त्वाचा आदर्श समोर ठेऊन वाटचाल केल्यास, आपल्या प्रश्नांची उत्तरे मिळतील आणि यशस्वी व्हाल, असेही ते म्हणाले.

विक्रम देव डोगरा म्हणाले, प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या आयुष्यात कुठेतरी अपयश येऊन गेलेले असते. त्यामुळे अपयशाला घाबरू नये. आपल्याला यशस्वी व्हायचे आहे, याचे उद्दिष्ट समोर ठेऊन प्रयत्न करा. त्यानंतर तुम्ही यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही.

राहुल कराड यांनी सामाजिक नेतृत्व विकास कार्यक्रमाची माहिती देऊन विद्यापीठाच्या विविध उपक्रम आणि कार्यक्रमांची माहिती दिली. कुलगुरू डॉ. चिटणीस यांनी प्रास्ताविक केले. यावेळी विद्यापीठात नव्यानेच प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांना शपथ देण्यात आली.
0000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here