मतदार यादीत नाव नसलेल्या पात्र व्यक्तींनी नाव नोंदणी करावी

0
2

मुंबई शहर जिल्हाधिकारी संजय यादव यांचे आवाहन 

मुंबई,दि. 18 : भारत निवडणूक आयोगाच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमानुसार जिल्ह्यात 6 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.  दि. 1 जुलै 2024 रोजी वयाची 18 वर्ष पूर्ण होणाऱ्या व मतदार यादीत अद्यापपर्यंत नाव न नोंदविलेल्या नागरिकांनी त्वरित आपले नाव मतदार यादीत नोंदवून लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मुंबई शहर जिल्हाधिकारी  संजय यादव यांनी केले आहे.

विशेष मोहिमेत  दि. 20 ऑगस्ट पर्यत नागरिकांनी मतदार नोंदणी करावी

दि. 1 जुलै 2024  या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम (2) मुंबई शहर  जिल्ह्यातील  विधानसभा मतदारसंघात  विशेष मोहीमेव्दारे राबविण्यात  येत आहे. प्रारूप यादीमध्ये मतदारांनी आपले नाव आहे किंवा नाही याची खात्री करणे आवश्यक आहे. बऱ्याच वेळा ऐन मतदानाच्या दिवशी आपले नाव मतदार यादीमध्ये नाही अशी तक्रार अनेक मतदारांकडून केली जाते. तसेच मतदारांनी आपले नाव, पत्ता, लिंग, जन्म दिनांक, वय, ओळखपत्र क्रमांक, मतदारसंघ इत्यादी तपशील देखील अचूक असल्याबाबत खात्री करणे आवश्यक आहे.

दि. 1 जुलै 2024 रोजी किंवा त्याआधी 18 वर्षे पूर्ण झालेल्या नागरिकांना मतदार नोंदणी करता येणार आहे. तसेच ज्या मतदारांची नावे वगळली गेलेली आहेत अथवा ज्यांची नावे मतदार यादी मध्ये नाहीत अशा सर्व नागरिकांनी नमुना अर्ज क्रमांक 6 भरून आपली नावे मतदार यादीत समाविष्ट करावीत.तसेच मयत, कायमस्वरूपी स्थलांतरित यांची नाव वगळणी करिता नमुना -7,  पत्ता बदल करण्याकरिता नमुना 8 भरावा हे अर्ज आपल्या घराजवळील मतदार नोंदणी  अधिकारी, विधानसभा निवडणूक कार्यालयात उपलब्ध आहेत.  त्याच कार्यालयात अर्ज भरून जमा करायचे आहेत.

तसेच ऑनलाईन मतदार नोंदणी करण्यासाठी https://voters.eci.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी, आणि अधिक माहितीसाठी  हेल्पलाईन क्र. 1950 (टोल फ्री) वर संपर्क साधावा.असेही जिल्हाधिकारी संजय  यादव यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here