सार्वजनिक बांधकाम विभागात देश उभारणीची मोठी ताकद – मंत्री रवींद्र चव्हाण 

उत्कृष्ट अभियंते, कर्मचारी व प्रकल्‍पांचा केला सन्‍मान 

नागपूर दि. १५: सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंते हे देशाच्‍या परमवैभवासाठी आवश्‍यक असलेली व्‍यवस्‍था उभी करत असतात. संपूर्ण देशाची जबाबदारी त्‍यांच्‍या खांद्यावर असते. त्‍यामुळे हा विभाग म्‍हणजे देश उभारणीसाठीची मोठी ताकद आहे, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले.

सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अभियंता दिनानिमित्त राज्‍यस्‍तरीय उत्कृष्ट अभियंता पुरस्कार २०२३-२४ वितरण सोहळा रविवारी सुरेश भट सभागृहात उत्‍साहात पार पडला. त्‍यावेळी मंत्री श्री. चव्हाण बोलत होते.

मंचावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अप्पर मुख्य सचिव श्रीमती मनीषा पाटणकर-म्हैसकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (रस्ते) सदाशिव साळुंखे, सचिव (इमारती) संजय दशपुते, सचिव सतीश कोळीकर, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे सचिव सतीश चिखलीकर, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सह व्यवस्थापकीय संचालक राजेश पाटील तसेच, पायाभूत विकास महामंडळ सचिव विकास रामगुडे, सार्वजनिक बांधकाम नागपूर प्रादेशिक विभागाचे मुख्य अभियंता दिनेश नंदनवार, अधिक्षक अभियंता जनार्दन भानुसे व राज्‍यभरातील बांधकाम विभागाचे पदाधिकारी, अभियंते उपस्थित होते.

मान्‍यवरांच्‍या हस्‍ते उत्‍कृष्‍ट कार्य करणारे अभियंते, वास्‍तुशास्‍त्रज्ञ, अतांत्रिक संवर्गातील कर्मचारी यांचा कुटुंबियांसह सत्‍कार करण्‍यात आला. यावेळी उत्‍कृष्‍ट प्रकल्‍प पुरस्‍कार वितरित करण्‍यात आले.

मंत्री श्री. चव्‍हाण यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा ‘इन्‍फ्रास्‍ट्रक्‍चर मॅन’ असा उल्‍लेख करताना त्‍यांच्‍या या विभागातील कार्याचा गौरव केला. मंत्री श्री. चव्‍हाण म्‍हणाले की, अभियंता म्‍हणून कर्तव्‍य करत असताना कामामधील त्रुटी शोधून, त्‍यावर उपाय योजणे, नियोजन व नंतर निर्मिती करणे हेच ध्‍येय समोर असले पाहिजे. परिवर्तनाच्‍या दिशेने जाणे फार गरजेचे असून गतिमान पद्धतीने काम करण्‍याला प्राधान्‍य दिले गेले पाहिजे. तरच भविष्‍यात यश प्राप्‍त होईल. प्रकल्‍प व्‍यवस्‍थापन व त्‍याचे लाभ समाजापर्यंत पोहोचवण्‍याच्‍या दिशेने विभाग काम करीत असून तंत्रज्ञानाचा योग्‍य वापर करून 100 टक्‍के पारदर्शकता आणण्‍याचा प्रयत्‍न केला जात आहे. त्‍यासाठी विभागातील सर्वांचे सहकार्य लागणार असून विभागाची मान उंचावण्‍यासाठी प्रत्‍येकाचे योगदान महत्‍त्वाचे ठरणार आहे, असे ते म्‍हणाले. अभियंता दिनाला केवळ कार्यक्रम साजरा न करता तो कर्तव्‍य दिवस म्‍हणून पाळावा, असेही आवाहन त्‍यांनी यावेळी केले.

यावेळी चंद्रपूर जिल्‍ह्यातील प्रकल्‍पाची माहिती देणाऱ्या कॉफीटेबल बुकचे प्रकाशन तसेच, दिनेश नंदनवार यांचा सत्‍कार मान्यवरांच्‍या हस्‍ते करण्‍यात आला. परिसरात भ‍रविण्‍यात आलेल्‍या प्रदर्शनाचे उद्घाटनदेखील मंत्री श्री. चव्हाण हस्‍ते करण्‍यात आले. त्‍यांनी प्रदर्शनाची पाहणी केली व कौतुक केले. आसावरी गलांडे-देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले तर जनार्दन भानुसे यांनी आभार मानले.

उत्‍कृष्‍ट प्रकल्‍प पुरस्‍कार 

उत्‍कृष्‍ट पूल – अंभोरा येथील वैनगंगा नदीवरील अत्‍याधुनिक पूल

उत्‍कृष्‍ट इमारत – पोरीबंदर येथील उत्‍पादन शुल्‍क विभाग मुख्‍यालय इमारत

उत्‍कृष्‍ट रस्‍ता – पुणे जिल्‍ह्यातील अष्‍टविनायक परिक्रमा मार्ग

०००