नागपूर दि. ६ : प्रशासकीय सुविधेच्या दृष्टीने एक व्यापक दुरदृष्टी ठेऊन नागपुरमध्ये आपण राज्यपातळीवरील अव्वल दर्जाचे विविध कार्यालय व सुविधा निर्माण केल्या. येथील पोलीस आयुक्त कार्यालय याचा आदर्श मापदंड आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली साकारत असलेले मानकापूर येथील अद्ययावत क्रीडा संकुल हे त्याचेच प्रतिक आहे. आज आपण भूमिपूजन केलेले विभागीय आयुक्त कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयसुध्दा राज्यातील एक आदर्श व उत्कृष्ट संकुल ठरेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
नागपूरच्या प्रशासकीय सुविधेत भर घालणाऱ्या नवीन विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी कार्यालयाचे भूमिपूजन व कोनशिला अनावरण समारंभात ते बोलत होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित समारंभास आमदार परिणय फुके, आमदार प्रवीण दटके, मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दिक्षीत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, उपायुक्त प्रदीप कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कार्यालयाशी आम्ही गत अनेक वर्षांपासून विविध जबाबदाऱ्यांच्या माध्यमातून जोडल्या गेलो आहोत. इंग्रजांच्या काळातील ही इमारत आजच्या काळात अपूरी व गैरसोयीची झाली आहे. जिल्ह्यातील सर्वच क्षेत्रात झालेला विस्तार, वाढलेली लोकसंख्या व सर्वसामान्यांचे प्रशासनाशी निगडीत असलेले कार्य लक्षात घेता आजच्या काळातील उपलब्ध तंत्रज्ञानाचा योग्य सुवर्णमध्य साधण्यासाठी अद्ययावत अशा नवीन इमारतीची अत्यावश्यकता होती. त्या दृष्टीने विचार विनिमय करतांना विभागीय आयुक्त कार्यालयाच्या नवीन इमारतीचा विचार करण्यात येऊन हे दोन स्वतंत्र टॉवर असलेले संकुल उभारण्याचा निर्णय घेतल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर आणि संपूर्ण टिमने यासाठी वेळोवेळी दाखवलेली तत्परता महत्वाची राहिली या शब्दात त्यांनी गौरव केला. संपूर्ण टिमचे त्यांनी अभिनंदन केले.
महसूल विभागाशी समाजातील प्रत्येक घटकाचे काम पडते. लोकांना चांगल्या सुविधेसह त्या वेळेत आणि विनासायास सुविधा मिळण्यासाठी कार्य पध्दतीत आधुनिकता आणल्याशिवाय पर्याय नाही. यासर्व सुविधा नवीन इमारतीमध्ये असल्याने महसूल विभाग अधिक गतीमान होईल, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. जनतेला उत्तम सेवा हे चांगल्या प्रशासनाचे द्योतक असते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्यातील प्रशासनाला गतीमान करण्यासाठी ज्या सुविधा उपलब्ध केल्या त्याचे त्यांनी कौतुक केले.
00000