अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडून विभागाच्या कामाचा आढावा

मुंबई, दि. ०३ : डिसेंबर महिन्यातील धान्य वितरणाच्या अनुषंगाने राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे आज विभागाच्या कामाचा आढावा घेतला. डिसेंबर महिन्यात राज्यात प्राप्त नियतनाच्या एकूण 92.09% धान्याचे वितरण झाले असून, उर्वरित वितरणामध्ये आलेल्या अडचणींच्या अनुषंगाने आज धनंजय मुंडे यांनी सबंध राज्याच्या पुरवठा विभागाची ई-बैठक बैठक घेतली.

ई – पॉस मशीन वरील अडचणी, पोर्टलचे सर्वर डाऊन, यांसह विविध अडचणींची तसेच धान्य वितरणाची जिल्हा निहाय वस्तुनिष्ठ आकडेवारी धनंजय मुंडे यांनी त्या त्या जिल्ह्याच्या जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली. ठाण्यात सर्वाधिक ९८.५९ तर धुळे जिल्ह्यात सर्वात कमी 81.69 टक्के इतके धान्य वितरण डिसेंबर महिन्यात झाले असून ही आकडेवारी शंभर टक्क्यांकडे घेऊन जाण्यासाठी ऑनलाईन व अन्य तांत्रिक अडचणी दूर करण्यासंदर्भात धनंजय मुंडे यांनी विभागाला निर्देश दिले असून या संदर्भात सर्व संबंधितांची पुढील आठवड्यात आणखी एक बैठक घेणार असल्याचे मंत्री श्री. मुंडे यांनी विभागाला निर्देश दिले आहेत.

सर्वर डाऊन असणे, किंवा अन्य कारणांनी ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये विविध योजनेतील लाभार्थींना धान्य वितरण डिसेंबर महिन्यात होऊ शकले नाही, त्यांना या महिन्यांमध्ये मुदतवाढ देण्याबाबतचे प्रस्ताव तातडीने देण्याबाबतही मंत्री श्री. मुंडे यांनी संबंधित जिल्ह्यांना निर्देश दिले आहेत.

भंडारा जिल्ह्यातील उर्वरित साखर उपलब्ध करून देणे त्याचबरोबर नागपूर विभागातील पुरवठा निरीक्षक व अन्य रिक्त पदे भरून देण्याबाबतचा प्रस्ताव देखील स्वतंत्ररीत्या मागवण्याबाबत धनंजय मुंडे यांनी संबंधितांना या बैठकीत निर्देश दिले आहेत. एफसीआयकडे विविध करार काही दिले व अन्य असलेल्या मागण्यांच्या अनुषंगाने पुढील आठवड्यातील बैठकीमध्ये त्यावर निर्णय घेतला जाईल असेही मंत्री श्री. मुंडे यांनी यावेळी सांगितले.

विविध जिल्ह्यांमध्ये ज्या ठिकाणी धान्याचे रॅक उतरवले जातात, त्या भागातील रस्ते व अन्य सुविधांच्याबाबतही स्वतंत्र आढावा घेऊन निर्णय घेण्यात येईल असेही श्री. मुंडे म्हणाले आहेत. ई – पॉस मशीनवर डेटा उपलब्ध करून देणे, सर्वर डाऊन च्या समस्या यासह सर्वच्या सर्व तांत्रिक अडचणी तातडीने दूर करण्यासंदर्भात मंत्री श्री.मुंडे  यांनी स्वतंत्र निर्देश दिले आहेत.

या बैठकीस अन्न व नागरी पुरवठा विभागाचे सहसचिव, उपसचिव, शिधावाटप संचालनालयाचे नियंत्रक, पुरवठा विभागाचे सर्व उपयुक्त तसेच राज्यातील सर्व जिल्ह्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी व उपनियंत्रक आदी उपस्थित होते.

०००

दत्तात्रय कोकरे/विसंअ