इंदापूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाच्या तयारीचा मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून आढावा

पुणे, दि. ०६: इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने २२ ते २६ जानेवारी २०२५ दरम्यान आयोजित राज्यस्तरीय कृषी- पशु प्रदर्शन, घोडे बाजार व डॉग शोच्या अनुषंगाने क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आढावा बैठक घेतली.

यावेळी आमदार ज्ञानेश्वर कटके, विभागीय कृषी सहसंचालक दत्तात्रय गवसाने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे, आत्माचे प्रकल्प संचालक सूरज मडके, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, इंदापूर तालुका कृषी अधिकारी योगेश फडतरे, पंचायत समितीचे कृषी अधिकारी अमर फडतरे, इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तुषार जाधव आदी उपस्थित होते.

मंत्री श्री. भरणे म्हणाले, बाजार समितीच्यावतीने भरविण्यात येणाऱ्या प्रदर्शनात शेतीशी निगडित नवीन तंत्रज्ञान, उद्योग तसेच नावीन्यपूर्ण उपक्रम याचे स्टॉल यावेत. त्यादृष्टीने कृषी विभागाने पंचायत समितीला सहकार्य करावे. इंदापूर तालुका हा शेतीतील प्रयोगांसाठी प्रसिद्ध आहे. नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्यास त्यांना लाभ होऊन जीवनात परिवर्तन होऊ शकते, असेही ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले, या प्रदर्शनात शासकीय अनुदान असलेल्या नवीन तंत्रज्ञानाची माहिती पोहचविण्यासाठी प्रयत्न करावेत. रोपवाटिकांमध्ये येणाऱ्या नवीन वाणांचाही समावेश स्टॉलमध्ये करण्यात यावा. नवीन तंत्रज्ञान विकसित केलेल्या कंपन्यांना आमंत्रित करावे. पशुपालनातील आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती होण्याच्यादृष्टीने पशुसंवर्धन विभागालाही सहभागी करुन घ्यावे, असेही श्री. भरणे म्हणाले.

यावेळी श्री. जगदाळे यांनी या प्रदर्शनाच्या अनुषंगाने माहिती दिली. जिल्हा बँकेच्यावतीने नवीन तंत्रज्ञानासाठी असलेल्या कर्जवाटपाच्या योजनांच्या माहितीचा तसेच डिजिटल बँकिंग, मोबाईल बँकिंग सुविधा आदींबाबत स्टॉल लावावा, अशा सूचना त्यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

श्री. गवसाने तसेच श्री. काचोळे यांनीही या प्रदर्शनाच्यादृष्टीने कृषी संबंधित नवीन तंत्रज्ञान असलेल्या संस्था, उद्योग, कंपन्यांशी संपर्क साधून त्यांचे स्टॉल लागतील यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे सांगितले.

याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते प्रदर्शनाच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.

०००