मुंबई, दि.25: प्रजासत्ताक दिनानिमित्त उद्या २६ जानेवारी २०२५ रोजी मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथे सायंकाळी ५:३० वाजता ‘जश्न-ए-हिंदुस्तान’ या उर्दू मुशायरा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात उर्दू शायरी, गझल आणि सूफी संगीताचे सादरीकरण होणार असून, यामुळे उर्दू भाषा आणि सांस्कृतिक परंपरेला प्रोत्साहन मिळणार आहे.
या कार्यक्रमात देशातील अनेक प्रसिद्ध शायर आणि गायक सहभागी होणार आहेत. प्रख्यात गायक सलमान अली यांचे सूफी गायन आणि सिराज अहमद खान यांची गझल सादरीकरण कार्यक्रमाची विशेष आकर्षणे असतील. त्याचबरोबर मोनिका सिंग, शाहिद लतीफ, सिराज सोलापुरी, डॉ. क़मर सुरूर फारूकी, आणि नैम फ़राज़ हे मान्यवर शायरही सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध निवेदक डॉ. क़ासिम इमाम करतील.
कार्यक्रमात प्रवेश विनामूल्य असेल. हा कार्यक्रम सामाजिक माध्यमांवर आणि डिजिटल व्यासपीठांवर थेट प्रसारित केला जाईल, ज्यामुळे देश-विदेशातील रसिकही याचा आस्वाद घेऊ शकतील.
‘जश्न-ए-हिंदुस्तान’ हा कार्यक्रम उर्दू साहित्य आणि संस्कृतीसाठी महत्त्वाचा आहे.
०००