विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली विविध बैठका

मुंबई दि.6 : विधानसभा अध्यक्ष नाना पटोले  यांच्या अध्यक्षतेखाली भंडारा जिल्ह्यातील साकोली, लाखांदूर व लाखणी नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा योजना, आरोग्य विभागांर्तगत रूग्णवाहिका वाहन चालकांना राज्यस्तरावर समायोजन करणे, तसेच इतर समस्यांबाबत आढावा बैठक झाली. यावेळी सार्वजनिक आरोग्य विभागाचे  संबंधित अधिकारी तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी श्री पटोले यांनी पाणीपुरवठा योजनेचा आढावा घेताना सांगितले की, जनतेला पिण्याच्या पाण्याचा तुटवडा होणार नाही याची संबंधित अधिकाऱ्यांनी  दक्षता घ्यावी. व लवकरात लवकर आवश्यक पाणीपुरवठा करण्यासाठी योग्य ती कार्यवाही करावी. शहरासाठी स्वतंत्र नळपाणी पुरवठा योजना करावी असेही श्री. पटोले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले.

आरोग्य विभागाअंर्तगत रूग्णवाहिकांचा आढावा घेताना श्री पटोले म्हणाले की, रूग्णवाहिकेची वेळोवेळी तपासणी करून या रूग्णवाहिकेचा जनतेसाठी आवश्यक व सुयोग्य वापर करण्यात यावा. जनतेला सेवा देण्यासाठी शासनाने रूग्णवाहिका सुरू केली असून याचा आढावा संबंधित अधिकाऱ्यांनी घेऊन ग्रामीण भागातील या रूग्णवाहिकेची परिस्थिती जाणून घ्यावी अशा सूचना यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना श्री. पटोले यांनी दिल्या. बैठकीत आरोग्य विभागांतर्गत कार्यरत रूग्णवाहिका वाहन चालकांना राज्यस्तरावर समायोजन करणे, समान काम, समान वेतन देण्याबाबत  चर्चा करण्यात आली.