मुंबई, दि.७ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मिती ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘जागतिक महिला दिनानिमित्त’ ‘राज्य पाणी व स्वच्छता मिशन’ अंतर्गत जल जीवन मिशनच्या अतिरिक्त अभियान संचालक सुषमा सातपुते यांच्या विशेष मुलाखतीचे प्रसारण होणार आहे.
‘दिलखुलास’ कार्यक्रमात सोमवार दि. १०, मंगळवार दि. ११ आणि बुधवार दि. १२ मार्च २०२५ रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्युज ऑन ‘ए आयआर’ या मोबाईल ॲपवर सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदक सुषमा जाधव यांनी ही मुलाखत घेतली आहे.
महिलांच्या दैनंदिन जीवनात ‘पाण्याला’ अनन्यसाधारण महत्त्व असून महिला सबलीकरण आणि जलसंवर्धन हे परस्परांशी जोडले गेलेले विषय आहेत. घरातील स्वच्छता, अन्न तयार करणे, शेतीकाम आणि कुटुंबाच्या आरोग्यासाठी पुरेसे आणि शुद्ध पाणी मिळणे अत्यावश्यक आहे. महिलांसाठी सुरक्षित आणि सहज पाणी उपलब्ध करून देणे ही काळाची गरज असून पाण्याचे संवर्धन आणि शुद्ध पाणीपुरवठा यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने योगदान दिले पाहिजे. राज्यातील प्रत्येक नागरिकाला शुद्ध पुरेसे पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी शासन स्तरावर सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. यासाठी राज्य पाणी व स्वच्छता मिशन तसेच जल जीवन मिशनसारखे अनेक महत्वाचे प्रकल्प पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या माध्यमातून हाती घेण्यात आले आहेत. या प्रकल्पांतर्गत राज्यात कोणते उपक्रम सुरू आहेत, त्यांची अंमलबजावणी कशा प्रकारे करण्यात येत आहे तसेच महिलांनी हे प्रकल्प यशस्वी करण्यासाठी कशा प्रकारे सहभाग घेणे आवश्यक आहे, याबाबत अतिरिक्त अभियान संचालक सातपुते यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून माहिती दिली आहे.
०००